
डोंबिवली : 'एस्क्यूज मी' या इंग्रजी शब्दावरून मोठा वाद झाल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेतील जुनी डोंबिवली येथे घडली. या प्रकरणी महिलेसोबत तिच्या पतीला तसेच दोन मैत्रिणींनींही भररस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीचा व्हिडीओ सामाजिक माध्यमात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवलीतील गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पूनम अंकित गुप्ता या सोमवारी त्यांच्या मैत्रिणीसोबत घराकडे जात होत्या.
इमारतीच्या बाहेरील रस्त्यावर उभे असलेल्या काही जणांना बाजूला होण्यासाठी त्यांनी 'एस्क्यूज मी' असे उद्गार काढताच पूनम आणि त्यांच्या मैत्रिणींना अनिल पवार, त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढबाले व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बचावासाठी पूनम व दुसऱ्या मैत्रिणी त्या ठिकाणी आल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.