महिला मतदार ठरवणार रायगडचा खासदार, ७ मे रोजी होणार मतदान

रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख ५३ हजार ९३५ मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या ८ लाख १३ हजार ५१५ आहे, तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख ४० हजार ४१६ आहे.
महिला मतदार ठरवणार रायगडचा खासदार,
७ मे रोजी होणार मतदान

अलिबाग : देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मुंबईला लागून असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघासाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक असल्याने रायगडचा खासदार कोण होणार, हे महिला मतदार ठरवणार आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शनिवारी तयारीची माहिती दिली. रायगड जिल्ह्यात २३ लाख १६ हजार ५१५ मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ११ लाख ७८ हजार ५५ इतकी आहे तर महिला मतदारांची संख्या ११ लाख ३८ हजार ३७८ इतकी आहे.

शिवाय रायगडमध्ये ८२ तृतीयपंथी मतदार आहेत. रायगड जिल्ह्यातील सातपैकी कर्जत, उरण आणि पनवेल या तीन विधानसभा मतदारसंघांचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. उर्वरित अलिबाग, पेण, महाड आणि श्रीवर्धन तसेच गुहागर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ मिळून रायगड लोकसभा मतदारसंघ आहे.

जिल्ह्यात २६९४ मतदान केंद्रे असून त्यातील केवळ ६ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. तर रायगड लोकसभा मतदारसंघात २१८५ मतदान केंद्रे आहेत. जिल्ह्यात निवडणूक आयोगाने ७०५२ मतदान यंत्रे, ४ हजार ४५ कंट्रोल युनिट आणि ४ हजार २२२ व्हीव्हीपॅट यंत्रे उपलब्ध करून दिली आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी २७ हजार कर्मचारी उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

महिला मतदारांची संख्या अधिक

रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण १६ लाख ५३ हजार ९३५ मतदार आहेत. यात पुरुष मतदारांची संख्या ८ लाख १३ हजार ५१५ आहे, तर स्त्री मतदारांची संख्या ८ लाख ४० हजार ४१६ आहे. शिवाय ४ तृतीयपंथी मतदार आहेत. पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या २६ हजार ९०१ ने अधिक आहे. त्यामुळे दिल्लीतील लोकसभेत रायगडचा खासदार कोण पाठवायचा, हे महिला मतदार ठरवणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in