ठाणे शहरात कचऱ्यांपासून खत निर्मिती प्रकल्प लवकरच सुरु होणार

५ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज माध्यमांना दिली.
ठाणे शहरात कचऱ्यांपासून खत निर्मिती प्रकल्प लवकरच सुरु होणार

ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून दररोज घन कचराही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शहरामध्ये नवीन गृहसंकुलांचे विकास प्रकल्प व वाढती लोकसंख्येमुळे भविष्यात घनकचऱ्याची समस्या बिकट बनू शकते यासाठी या घन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता जिथला कचरा - तिथेच निचरा या पद्धतीने घन कचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया करण्यात येणार आहे.

ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाच्या हद्दीमध्ये १० ठिकाणी खत निर्मिती प्रकल्पासाठी जागा निश्चित झाल्या असून राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी पहिल्या टप्यात ५ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी आज माध्यमांना दिली.

ठाणे शहरातील प्रत्येक प्रभागसमिती क्षेत्रामध्ये प्रत्येकी एक कचऱ्यांपासून खत निर्मिती प्रकल्प उभारण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्याकरिता त्यांचा पाठपुरावा सुरु होता, त्याला अखेर यश आले असून राज्य सरकारकडून त्यांची मागणी मान्य करण्यात आली असून या कामासाठी निधीसह मंजुरी मिळाली आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घनकचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्राकडून सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे ठाणे महानगरपालिकेने कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प मुंब्रा येथे उभारला आहे. परंतू, एकाच ठिकाणी मोठा प्रकल्प चालवणे शक्य होणार नाही, शिवाय याठिकाणी शहरातून, शेकडो वाहनांमधून कचरा वाहतूक करताना अडचणी येतात. मोठे प्रकल्प चालविणे पालिकेला किंवा ठेवकेदाराला जड जाते. त्याचवेळी काही कारणास्तव मोठा प्रकल्प बंद पडल्यास प्रक्रिया थांबते. त्यामुळे शहरात विभागवार, प्रभाग समिती निहाय खत निर्मिती प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे. याबाबत महापालिकेने पुढाकार घेऊन हे विभागनिहाय प्रकल्प उभारले तर कचऱ्याची समस्या निकाली निघू शकते असे सरनाईक यांनी सांगितले.

शहरामध्ये घनकचरा दररोज वाढत असून तो डंपिंग करण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. तसेच जेथे कचरा टाकण्यात येतो तेथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे नागरिकांचा कचरा प्रकल्पाला विरोध असतो.

कचरा विघटन करून त्यापासून खत निर्मिती करण्याचे प्रकल्प तात्काळ मार्गी लागणे आवश्यक होते व राज्य सरकारकडून निधी मंजूर करून आणल्याने आता छोटे प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. माझी वसुंधरा या मोहिमेअंतर्गत झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम सुरु असून खत निर्मिती प्रकल्प उभारल्यास शहरातील पर्यावरणाच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल, असेही सरनाईक म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in