पाणीबिल थकविणाऱ्या ४८८ ग्राहकांची नळजोडणी खंडित; १६७ मोटर जप्त, २४ पंपरूम सील

जल देयके थकविणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई सुरू केली असून २३ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी या काळात ४८८ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत.
पाणीबिल थकविणाऱ्या ४८८ ग्राहकांची नळजोडणी खंडित; १६७ मोटर जप्त, २४ पंपरूम सील

ठाणे : जल देयके थकविणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारवाई सुरू केली असून २३ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी या काळात ४८८ नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. तर, १६७ मोटर जप्त केल्या असून २४ पंपरूम सील करण्यात आली आहेत. दरम्यान, थकीत घरगुती पाणी बिलांवर आकारण्यात आलेल्या प्रशासकीय आकारात १०० टक्के सवलत देण्याची योजना ३१ मार्चपर्यंत वाढविण्यास महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मान्यता दिली आहे.

ठाणे महापालिकेला सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण २२३ कोटी रुपयांची पाणी देयके वसूल होणे अपेक्षित आहे. त्यात, ८८ कोटी रुपयांची थकबाकी असून १३४ कोटी रुपये चालू वर्षाची पाणी देयके आहेत. त्यापैकी, २२ कोटी रुपयांची थकबाकी तर ५९ कोटी रुपये चालू वर्षाची देयके असे एकूण ८१ कोटी रुपये वसूल झाले आहेत. ३१ मार्चपर्यंत सुमारे १४१ कोटी रुपयांची वसुली करण्याचे आव्हान पाणीपुरवठा विभागासमोर आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणी देयकांची थकबाकी तातडीने वसूल करावी. तसेच, थकबाकी न भरणाऱ्यांचे नळ संयोजन खंडित करावे, असे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी गेल्या आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत दिले होते. त्यानुसार, प्रभाग समितीनिहाय कारवाई सुरू करण्यात आली आहे.

प्रशासकीय आकारात १०० टक्के सूट

जे घरगुती नळसंयोजन धारक ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत पाणीबिल, चालू वर्षाच्या बिलासह एकत्रित जमा करतील, त्यांना त्या थकित बिलावरील प्रशासकीय आकारातून १०० टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना ज्यांनी देयके यापूर्वीच जमा केली आहेत त्यांना, तसेच व्यावसायिक नळजोडणी धारकांसाठी लागू नाही.

प्रभाग समिती खंडित नळ जोडण्या

-नौपाडा-कोपरी - ८४

-उथळसर - ४९

-वागळे - ५४

-लोकमान्य - सावरकर नगर - ३७

-वर्तकनगर - ०९

-माजिवडा-मानपाडा - ०७

-कळवा - ४७

-दिवा - ७१

-मुंब्रा - १३०

-एकूण - ४८८

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in