
डोंबिवली : मुसळधार पावसात पुन्हा डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसरात पाणी तुंबले. गुरुवारी सकाळ पासून दुकानदारांनी दुकानातील समान उचलण्यास सुरुवात केली होती. मात्र पावसाचा वाढता जोर वाढल्याने दुकानात पाणी शिरले. यावेळी नुकसान होऊ नये म्हणून दुकानदारांनी दुकाने बंद ठेवली. आज दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम असल्याने दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली. तर स्टेशन बाहेरील रिक्षा थांब्यावर रिक्षा उभ्या नसल्याने नागरिकांना काही अंतर पायी चालत स्टेशन गाठावे लागले.
गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस पडत असल्याने डोंबिवली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील रस्तावर पाणी तुंबले होते. त्यावेळी दुकानदारांनी खबरदारी म्हणून दुकाने बंद ठेवली होती. गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने पुन्हा हा परिसर जलमय झाल्याचे दिसून आलं. यावेळी स्टेशनबाहेर दिसणारी गर्दी पाणी तुंबल्याने तुरळक दिसली. फेरीवाल्यांनी कधी नव्हे ते या दिवशी आपले बस्तान मांडले नव्हते. दुकानही बंद करून दुकानदार पाणी ओसरण्याची वाट पाहत होते.
दरम्यान, नागरिकांना भरपावसात रिक्षा मिळत नव्हती. स्टेशनपर्यंत दुपारी रिक्षा जाणे मुश्किल असल्याने जवळील इंदिरा चौक येथे उतरून प्रवासी पाण्यातून मार्ग काढत पायी स्टेशन गाठत होते. आता दरवर्षी पावसात स्टेशन बाहेरील परिसर जलमय होणे नित्याचे झाले असल्याचे डोंबिवलीकरांचे म्हणणे आहे.