दीपक गायकवाड / मोखाडा
मोखाडा तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व शालेय शिक्षण देण्याबरोबरच पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, माता मार्गदर्शन व संदर्भ सेवा मिळवून देणाऱ्या २०७ अंगणवाड्या आरोग्य सेवा मिळवून देण्याचे देखील कार्य करीत आहेत. परंतु यातील ३३ अंगणवाड्यांची अवस्था दयनीय झालेली असून २० अंगणवाड्या गळक्या तर १३ अंगणवाड्या मोडकळीस आलेल्या असल्याने 'गळकी झाली शाळा, आत्ता कुठे शिकशील बाळा'? असे म्हणण्याची वेळ तालुक्यातील हजारो बाळ-गोपाळांच्या पालकांवर आलेली आहे.
मोखाडा तालुक्यात एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या २०७ अंगणवाड्यांच्या माध्यमातून ९ हजाराच्या आसपास बाळगोपाळ पूर्व शालेय शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. एकूणच अंगणवाडींच्या थेट सेवेमुळे कुपोषणाचा टक्का घसरण्यास मदत मिळत आहे. परंतु अक्षर ओळख आणि कुपोषण मुक्तीचा कणा असलेल्या अंगणवाडी प्रकल्पाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळेच गळक्या अंगणवाडीमधून लहानग्यांना आता अंग चोरून पूर्व शालेय शिक्षण आणि आरोग्य सेवा मिळवावी लागत आहे.
इमारतीचा पाया खिळखिळा, नादुरुस्त स्वयंपाक गृह, संडास नाही, सांडपाणी व्यवस्थापन नाही, विद्युतीकरण नाही, रंगरंगोटी नाही अशा या इमारती सन २०२२ पासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तेंव्हापासून ही कामे प्रस्तावित असून जिल्हा प्रशासन मात्र आजही 'गांधारी' सारखे डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळ्याची भूमिका बेमालूमपणे वठवित आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
अंगणवाडीच्या माध्यमातून पुरक आहार, लसीकरण, अनौपचारिक शाळापूर्व शिक्षण जसे की पशू पक्षांची ओळख, रंगाची ओळख, त्याशिवाय आरोग्य शिक्षण व पोषण शिक्षण, बालकांची आरोग्य तपासणी इत्यादी महत्वपूर्ण कार्यक्रम राबवले जातात व त्यामुळे कुपोषणाचा टक्का घसरण्यास मदत मिळत आहे. मात्र ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांची गरज लक्षात घेऊन सर्व कर्तव्ये पार पाडणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असते.
जिल्हा प्रशासन गांधारीच्या भूमिकेत
तालुक्यातील शिवली १, वाशाळा पैकी वडपाडा, खोच पैकी शिरसोनपाडा १, सातूर्ली २, खोडाळा पैकी इंदिरानगर , तळ्याचीवाडी, सूर्यमाळ, केवनाळा, वरची पाथर्डी, बोटोशी गावठाण, आडोशी, शिरसगाव १, नाशेरा, जोगलवाडी, पाचघर, हट्टी पाडा, बोरीची वाडी, बोरशेती, किनीस्ते, गवळहरी पाडा, साखरी, पोशेरा पैकी कातकरी पाडा २, नावळ्याचा पाडा, घानवळ, जांभूळ माथा, हिरवे व हिरवे पैकी पिंपळ पाडा, चिकण पाडा, पांगरी १, भोवाडी या २० इमारतींची अवस्था दयनीय झाली आहे. सन २०२२ पासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. तेंव्हापासून प्रस्तावित असून जिल्हा प्रशासन मात्र आजही 'गांधारी' सारखे डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळ्याची भूमिका बेमालूमपणे वठवित आहे.
१३० अंगणवाडी स्वतःच्या मालकीच्या जागेत
यातील काही इमारती नव्याने प्रस्तावित केलेल्या आहेत. नावळ्याचा पाडा, घानवळ, जांभूळ माथा, पांगरी १,सायदे पैकी बोरशेती, नाशेरा व तळ्याची वाडी या ७ इमारतींचा समावेश आहे. मात्र जिथे दुरुस्तीच दोन वर्षांपासून रखडलेली आहे तिथे संपूर्ण काम कधी मार्गी लागेल, याबाबत सांशकताच आहे. तालुक्यात एकूण २०७ अंगणवाड्यांपैकी १३० अंगणवाडी या स्वत:च्या मालकीच्या जागेत उभ्या असून उर्वरित ६७ अंगणवाडी या जिल्हा परिषद शाळांच्या इमारतीमध्ये तर बहुतेक ठिकाणी भाडे तत्वाच्या इमारतीत किंवा खासगी खोल्यांमध्ये अंगणवाडी भरवली जात आहे.
संस्थांचे योगदान
किनीस्ते ग्रामपंचायत हद्दीतील ठाकूरपाडा, गवरचरी पाडा, किनीस्ते गावठाण या ३ इमारतींच्या दुरुस्तीचे काम स्पार्क फाऊंडेशन या संस्थेने हाती घेतले असून या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न सुटला असल्याचे येथील प्रतिष्ठित नागरिक मंगेश दाते यांनी सांगितले आहे.
संपूर्ण मोडकळीस आलेल्या इमारती
तालुक्यातील खोच पैकी पुलाची वाडी, सातूर्ली पैकी पळसुंडा, मोऱ्हांड्यापैकी मोरचुंडी व कोलद्याचा पाडा, गोमघर पैकी दुधगाव, कुर्लोद, उधळे, करोळ, बेरीस्ते पैकी ओसरवीरा, व धोडीपाडा, आसे पैकी कुडवा व कुंभीपाडा या १३ इमारती संपूर्ण मोडकळीस आलेल्या आहेत. २ वर्षांपासून जिल्हा स्तरावर हा प्रश्न प्रस्तावित आहेत. इमारतींच्या नुतनीकरणासाठी अंदाजे ४ ते साडेचार लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून इतर नादूरुस्त इमारतींच्या दुरुस्तीसाठीही अंदाजे १ लाखाचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. इतका अत्यल्प खर्च अपेक्षित असतांनाही इतर कामांसाठी लाखोंच्या घरात खर्च करणारे जिल्हा प्रशासन चिमुकल्याच्या शिक्षणाबाबत गांभीर्य नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.