कोल्हेधव ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; लाखो रुपयांचा खर्च बुडाला पाण्यात

गाव-पाड्यातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून ग्रामपंचायतींना वर्षाकाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला जातो. तरी देखील गाव-पाड्यातील पाणीटंचाईची समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. अशा मानवनिर्मित कृत्रिम पाणीटंचाईचे चटके गेल्या काही वर्षांपासून कोल्हेधव गावातील नागरिकांना सुध्दा सहन करावे लागत आहेत.
कोल्हेधव ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; लाखो रुपयांचा खर्च बुडाला पाण्यात

दीपक गायकवाड/ मोखाडा

तालुक्यातील गाव-पाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर लाखो रुपयांच्या निधीची उधळपट्टी केली जाते. काही वेळा पाणीपुरवठ्याची योजना सफल होते. तर गलथान काम आणि बोटचेपी धोरणामुळे सदर योजना वर्षभरातच बंद पडते. असाच काहीसा प्रकार आसे ग्रामपंचायतमधील कोल्हेधव या ६/७ घरांची वस्ती असलेल्या गावात झाला असून गेल्या पाच वर्षांत लाखो रुपयांचा निधी पाणीटंचाई निर्मूलनासाठी खर्च केलेला असताना ही कोल्हेधव ग्रामस्थांची पाणीटंचाईची समस्या संपुष्टात आलेली नाही.

ही वस्तुस्थिती आहे. गाव-पाड्यातील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाकडून ग्रामपंचायतींना वर्षाकाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर केला जातो. तरी देखील गाव-पाड्यातील पाणीटंचाईची समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. अशा मानवनिर्मित कृत्रिम पाणीटंचाईचे चटके गेल्या काही वर्षांपासून कोल्हेधव गावातील नागरिकांना सुध्दा सहन करावे लागत आहेत. अत्यल्प वस्ती असलेल्या कोल्हेधव गावात जेमतेम ३० ते ३५ माणसे राहतात. येथील नागरिकांना इतर मूलभूत सुविधांची तर वानवा आहेच, परंतु त्याहीपेक्षा पिण्यासाठी चांगले पाणी मिळावे, यासाठी गेल्या पाच वर्षांत १५ ते २० लाख रुपयांचा निधी हा केवळ पाणीटंचाई दूर करण्यासाठी खर्च करण्यात आला आहे. दरम्यानच्या अवधित पाणीटंचाईवर केलेला लाखो रुपयांचा निधी अक्षरशः पाण्यात गेला आहे.

ग्रामपंचायतीकडून विहीर बांधणे, जुन्या विहिरीची दुरुस्ती करणे यासह सौरऊर्जेवर चालणारी नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित करणे अशा पाणीपुरवठ्याच्या योजनांवर लाखो रुपयांचा निधी खर्च झालेला असताना ही पाणीटंचाई संपायला तयार नाही. त्यामुळे खर्च केलेला निधी गेला कुठे? हा संशोधनाचा विषय आहे.

या ठिकाणी बोअरवेलचे काम करणे अशक्य असून सद्यस्थितीत येथे तात्पुरत्या स्वरूपात २ ते २.५ लाख रुपये किमतीची योजना कार्यान्वित करण्याचे विचाराधीन आहे.

- अनंता मौळे सरपंच, ग्रामपंचायत आसे

पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव रखडला

कोल्हेधव गाव मोखाडा तालुक्यात येत असून पाणीपुरवठा करण्यासाठी तालुक्यातील मोरचोंडी, पिंपळगाव, बलद्याचापाडा, मार्गाने नाशिक जिल्ह्यातील आडगाव, काकडवळण या मार्गाने जवळपास चाळीस ते पन्नास किलोमीटरचे अंतर पार करून कोल्हेधव गावाला पाणी पुरविण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवणार आहे. असे करायचे झाल्यास एक टँकर, एक गाव आणि एकच फेरी अशा प्रकारे पाणीपुरवठा करावा लागणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे. परंतु या ठिकाणी पाणीपुरवठ्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली असल्याचे व त्यामुळे येथील पाणीपुरवठ्याचा प्रस्ताव बनवला नसल्याचे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in