पालघर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापन वानगाव उपविभाग अंतर्गत येणाऱ्या साखरे धरणाच्या पाण्याची पातळी मार्चपासूनच कमी झाल्याने या धरणांतर्गत येणाऱ्या बाडा पोखरण पाणीपुरवठा योजना, नगरपरिषद तसेच मोठमोठ्या प्रकल्पांना पाणी कपातीच्या फटका बसणार असल्याचे दिसून येते.
४.०७ दशलक्ष घनमीटर क्षमतेच्या वानगावयेथील साखरे धरण सन १९६८ ला बांधलेला आहे. या धरणात पावसाळ्याच्या चार महिन्यांत प्रचंड पाणीसाठा साठवून या धरणातून डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील बाडा पोखरण पाणीपुरवठा योजनेतील २९ गावांना, तारापूर अणुशक्ती केंद्र १ व २, तारापूर अणुशक्ती प्रकल्प ३ व ४ , सी.आय.एस.एफ. वसाहत, वानगाव रेल्वे स्टेशन, आयटीआय वानगाव, तसेच मोगरबाव, केतखाडी, वावे-दाभाडी, दहिसर, कुडन, देलवडी, घिवली इत्यादी गावांना पाणीपुरवठा होत असतो.
परंतु सदर धरणात पावसाळ्यात साठवून ठेवलेले पाणी फेब्रुवारी अखेरपर्यंत चालत असते. यावर्षी देखील साखरे धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने जीवन प्राधिकरण विभागाने इरिगेशन विभागाच्या कॅनलमार्फत कवडास धरणातून पाणी घेतले आहे.
कवडासचा आधार
पाणी दिवसेंदिवस कमी पडू लागल्याने येत्या काही दिवसात पाणी कपातीचे संकट निर्माण होणार असल्याचे सांगितले जात आहे. याबाबतीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जल व्यवस्थापनचे उपअभियंता गणेश गायकवाड यांना विचारले असता साखरे धरणात पाणीसाठा कमी झाला असला तरी कवडास धरणातून आपण दोन-तीन वेळा पाणी घेतले आहे, गरज लागल्यास पुन्हा पाणी घेता येईल, असे देखील त्यांनी सांगितले.