जिल्ह्यात योजनांचा सुकाळ नि पाण्याचा दुष्काळ; हंडाभर पाण्यासाठी पायपीट, जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात तीव्र पाणीटंचाई

मार्च महिना उजाडताच ठाण्याच्या ग्रामीण परिसरात पाणीटंचाई डोके वर काढते. उन्हाची तीव्रता वाढत जाते तसतशी त्याची झळ गावातील वाड्या, वस्त्यांमध्ये प्रकर्षाने जाणवते.
जिल्ह्यात योजनांचा सुकाळ नि पाण्याचा दुष्काळ; हंडाभर पाण्यासाठी पायपीट, जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरात तीव्र पाणीटंचाई

ठाणे : मार्च महिना उजाडताच ठाण्याच्या ग्रामीण परिसरात पाणीटंचाई डोके वर काढते. उन्हाची तीव्रता वाढत जाते तसतशी त्याची झळ गावातील वाड्या, वस्त्यांमध्ये प्रकर्षाने जाणवते. शासनाने जलयुक्त शिवारसारख्या योजना राबवून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही. धरणांचा तालुका म्हणून शहापूर तालुक्याची ओळख आहे. ठाणे जिल्ह्यातील महानगरांची तहान भागविणारा शहापूर जिल्ह्यातील सर्वाधिक तहानलेला तालुका म्हणून ओळखला जातो, हा कमालीचा विरोधाभास अस्वस्थ करणारा आहे.

सर्वाधिक पाणीटंचाईचे चटके शहापूर तालुक्याला बसतात. मागील अनेक वर्षांपासून त्यात बदल झालेला नाही. यंदा देखील त्यात फरक पडलेला नाही. उन्हाळ्यात पाण्यासाठी शासनाचा टँकरवर अवलंबून असलेल्या शहापूरमध्ये आजच्या घडीला ४२ गावपाड्यांत १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पुढील तीन महिने उन्हाळ्याची तीव्रता वाढताच टँकरची संख्या देखील वाढणार आहे. या ठिकाणी दुर्गम परिसरात पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कसोटी लागते.

ठाणे जिल्ह्यात दरवर्षी मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईची समस्या भेडसावत असते. तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा व त्यासाठी प्रस्तावित उपाययोजनांचा आराखडा तयार केला होता. जिल्ह्याला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागते ते अगदी जून-जुलैपर्यंत ही पाणीटंचाईची झळ कायम असते.

ग्रामीण भागातील अनेक गावपाड्यांची पाणीटंचाई मुक्तीकडे वाटचाल सुरू झाल्याचा दावा सरकार कितीही करत असले तरी वास्तव वेगळेच आहे. ठाणे जिल्ह्यात जानेवारी ते जुलै असे जवळपास अर्धे वर्ष तीव्र पाणीटंचाई जाणवत असते. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा यंत्रणेमार्फत पाणीटंचाई कृती आराखडा तयार करून टँकर आणि बैलगाडीने पाणीपुरवठा केला जातो. अशा प्रकारे सध्या टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, मात्र मुख्यतः शहापूर तालुक्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू लागली आहे.

राज्य शासन दुर्गम भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही गावातील पाण्याची तहान कायम आहे. प्रशासनाच्या वतीने दरवर्षी पाणीटंचाई आराखडा तयार करून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जातो. मात्र गावांची संख्या त्यात वाड्या-वस्त्यांची संख्या त्याहून अधिक असूनही केवळ १५ टँकरच्या माध्यमातून गावांना पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. आजही ग्रामीण भागात महिला हंडे घेऊन कैक किलोमीटर पायपीट करत पाण्यासाठी वणवण फिरत असल्याचे चित्र अद्यापही बदलेले नाही हीच मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

गावपाड्यांच्या संख्येत वाढ

मागील वर्षी ऑक्टोबर २०२२ ते जून २०२३ या कालावधीसाठी ९७ गावे आणि २८९ पाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला; तर यंदाच्या वर्षी ऑक्टोबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीसाठी १३५ गावे आणि ३४५ पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत गावपाड्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे.

टँकर योजना

ठाणे जिल्ह्यातील पहिला टँकर शहापूर तालुक्यात सुरू करण्यात आला. सध्या फुगाळे, दांड, काळभोंड, कोथळे, माळ, विहिगाव, उमरावणे, उंबरखांड तर, नाराळवाडी, पारधवाडी, अघणवाडी, भुईपाडा, चिंतामणवाडी, कोळीपाडा, वारली पाडा आदी ४२ गावपाड्यांत १५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे, तर त्याखालोखाल कल्याण, अंबरनाथ यांचा समावेश होतो.

योजनांवर सर्वाधिक खर्च

उन्हाळा सूरू होण्यापूर्वीच शासनस्तरावर संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी अनेक उपाय योजण्यात येतात. तातडीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना आदी कामात खोलीकरण, गाळ काढणे, नवीन विंधन विहीर घेणे आणि विंधन विहिरीची दुरुस्ती आदी कामे हाती घेण्यात येत असतात. यामध्ये नळ पाणीपुरवठा योजनेसह पूरक नळ पाणीपुरवठा योजनेवर सर्वाधिक खर्च अपेक्षित धरण्यात येत असतो. त्यात जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेली कामे यांचा सकारात्मक परिणाम काही अंशी दिसत असला तरी त्यात अजून बदल अपेक्षित आहे.

logo
marathi.freepressjournal.in