वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट पद्धतीने खाडी किनाऱ्याचे सुशोभिकरण होणार

मीरा भाईंदरचा हा खाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे.
वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट पद्धतीने खाडी किनाऱ्याचे सुशोभिकरण होणार

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील वरसावे पूल ते घोडबंदर गावाशेजारी खाडी किनारा विकसित करण्यासाठी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. पर्यटनाच्या दृष्टीने व शहराच्या सौंदर्यात भर टाकण्यासाठी हे खाडी किनारा सुशोभीकरण कामासाठी पहिल्या टप्प्यात राज्य सरकाने ५ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे,अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

मीरा भाईंदर शहराला लाभलेल्या खाडी किनाऱ्याचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास व्हावा, 'वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट' केली जावी अशी मागणी आमदार सरनाईक यांनी केली होती व राज्य सरकारकडे त्याचा पाठपुरावा सुरु ठेवला होता. या कामाचे डिझाईन , संकल्प चित्र तयार करण्यात आले आहे. परदेशात जसे 'वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट' करून परिसर सुशोभित केला जातो, त्या परिसरात नागरिकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा असतात त्याचपद्धतीने मीरा भाईंदरचा हा खाडी किनारा सौंदर्यीकरण करण्यासाठी हा आराखडा बनविण्यात आला आहे. त्यासाठी जवळपास १५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सुशोभिकरणाला मंजुरी देताना सरकारने कामासाठी ५ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या 'महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास' या योजनेअंतर्गत हा निधी वितरित करण्यात आला आहे. त्याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या कामात प्रकल्प खर्चाचा ७५ टक्के हिस्सा राज्य शासनाचा तर २५ टक्के हिस्सा महानगरपालिकेचा राहणार आहे. नुकताच आमदार सरनाईक यांनी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह घोडबंदर ते वर्सोवा खाडी किनाऱ्यावर जाऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी केली. खाडी किनाऱ्याजवळची जागा मेरी टाइम बोर्डाची असून लवकरात लवकर खाडी किनारा विकासाचे काम सुरु व्हावे, अशी अपेक्षा सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना सूचना देताना व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in