ठाणे शहरातील विहीरी पुनर्जीवित होणार,१०० हुन अधिक विहिरींची सफाई होणार

सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफ सफाई करून नैसर्गिक व पिण्यायोग्य पाणी निर्माण करणे
ठाणे शहरातील विहीरी पुनर्जीवित होणार,१०० हुन अधिक विहिरींची सफाई होणार

ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा असून अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पाणी बंद राहते किंवा एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. अशावेळी टॅंकरचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुर्नजीवित कराव्यात, या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपले जावेत, भविष्याच्या दृष्टीने हे पाणी उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफ सफाई करून नैसर्गिक व पिण्यायोग्य पाणी निर्माण करणे गरजेचे असल्यामुळे या विहिरी स्वच्छ करून त्याचा पुन्हा वापर झाला पाहिजे, अशी आमदार प्रताप सरनाईक यांची संकल्पना आहे. त्यासाठी सर्वच विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्याने त्याकरिता ते राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत होते.

अखेर, आमदार प्रताप सरनाईक यांच्या मागणीला यश आले असून राज्य सरकारने या कामास निधीसह मंजुरी दिली आहे. ठाणे शहरातील जवळपास १०० हुन अधिक विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या टप्यात ५ कोटी रुपये इतका निधी महापालिकेकडे वर्ग झाले असून हे काम लवकरच सुरु होईल, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. राज्य सरकारकडून या कामासाठी निधी मंजूर करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे.

आजच्या वाढत्या नागरीकरणात शुद्ध पाणी ही काळाची गरज आहे. शहरात अनेक ठिकाणी पूर्वीच्या विहिरी बुजवल्या गेल्या आहेत. काही विहिरी १०० वर्ष जुन्या आहेत. काही ठिकाणी विकासकांनी विहिरी आपल्या कामासाठी बुजवल्या आहेत. काही ठिकाणी कचराकुंडी म्हणून विहिरीचा वापर होतोय. काही भागात मूर्ती विसर्जनासाठी विहिरींचा वापर केला जातो. तर काही विहिरींमध्ये चक्क सांडपाणी सोडून विहिरी प्रदूषित केल्या गेल्या आहेत. अशा बहुतांश सगळ्या विहिरी घाण झाल्या असून पाण्याला दुर्गंधी येते. हे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद होत चालले आहेत. पाण्याचे महत्व ओळखून नैसर्गिक स्त्रोत टिकवून ठेवणे आणि विविध संवर्धन प्रकल्प हाती घेणे आवश्यक असून त्यामुळे आता सर्व विहिरींचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जिवंत केले जातील व या पाण्याचा उपयोग नागरिकांना दैनंदिन जीवनात कसा होईल हे पाहिले जाईल, सरनाईक म्हणाले.

ठाणे शहरातील ओवळा-माजिवडा मतदारासंघातील लोकमान्यनगर, उपवन, येऊर, माजिवडा, कासारवडवली, मोघरपाडा, घोडबंदर रोड येथील काही पट्टा हा आदिवासी भाग असून येथे अनेक वर्षांपूर्वी महापालिकेची पाणी योजना न्हवती. तेव्हा लोक पिण्यासाठी ह्या विहिरींचे पाणीच वापरायचे. त्यामुळे आता पुन्हा विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने स्वच्छता करून हे पाणी पिण्यायोग्य बनविण्यास प्राधान्य दिले जाईल. लोक पिण्यासाठी नाही तर रोजच्या इतर कामांसाठी हे पाणी वापरू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

विहिरींच्या संवर्धन प्रकल्पात सर्व विहिरींची खोदाई करून साफसफाई केली जाईल. विहिरी या पाण्याच्या स्थानिक नैसर्गिक स्त्रोत असल्याने त्यातील पाण्याचे झरे जिवंत केले जातील. जर कोणत्या विहिरीत सांडपाणी सोडले जात असेल तर ते बंद केले जाईल. म्हणजे विहिरींमधील जलप्रदूषण पूर्णपणे थांबवून तेथे विहिरीचे कठडे नव्याने बांधणे असेल किंवा आतून प्लास्टरिंग करणे असेल अशी सगळी कामे या संवर्धन प्रकल्पात केली जातील. यामुळे सर्व विहिरी स्वच्छ राहतील आणि पुर्नजीवित होतील, असे सरनाईक म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in