जंजिरा किल्ला जेट्टीचा मुहूर्त कधी? निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही

जंजिरा किल्ल्याच्या पाठीमागे जेट्टीची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने कोणालाही विश्वासात घेतलेले नाही.
जंजिरा किल्ला जेट्टीचा मुहूर्त कधी? निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही

मुरुड -जंजिरा : मुरुड तालुक्यातील सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना किल्ल्यावर चढता व उतरताना  सहज सोपे जावे यासाठी केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेअंतर्गत सदरील जेट्टी बांधण्यासाठी  ९३.५६ कोटी रुपये मंजूर झाले होते. जंजिरा किल्ल्यावर जेट्टी बांधण्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा गेले कित्येक महिने प्रत्यक्षात काम सुरू झालेले नाही. त्यामुळे असंख्य पर्यटक जीव धोक्यात घालून या किल्ल्यावर जात असताना सुद्धा कामाची सुरुवात न झाल्याने सदरचे काम होणार कि नाही? हा मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे. पावसाळा संपून तीन महिने लोटले, तरी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता या कामाकडे डोळसपणे पहाताना दिसत नाही.

 जंजिरा किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस पाण्याचा प्रवाह कमी असल्याने याच ठिकाणी जेट्टी बंधने हितावह ठरेल, असा अहवाल तद्न्य अधिकारी यांनी दिल्यानंतरच येथे पैसे मंजूर करण्यात आले होते. पैसे उपलब्ध आहेत निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ज्या कंपनीने काम घेतले आहे, त्या कंपनीने मात्र अद्यापर्यंत काम सुरू न केल्याने जेट्टी कधी होणार? हा प्रश्न येथे निर्माण झाला आहे. जेट्टीच्या कामाने अद्यापर्यंत वेग घेतलेला नाही.

 सागरी मंडळाने या कामासाठी निविदा सुद्धा जारी केली असून, नोव्हेंबर महिन्यात ही निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन संबंधित ठेकेदारास हे काम दिले जाऊन लवकरच या किल्ल्यावर जेट्टीच्या कामाची सुरुवात होईल, अशी माहिती महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डातील वरिष्ठ अधिकारी सुधीर देवरे यांनी नुकतीच दिली होती. परंतु प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

जंजिरा किल्ल्याच्या पाठीमागे जेट्टीची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने कोणालाही विश्वासात घेतलेले नाही. २५० फूट लांबीचा ब्रेकवॉटर ( भिंत ) ही स्थानिक मच्छिमार यांना अडचणीची ठरणार आहे. याच भागात स्थानिक मच्छिमार यांचा मासळीचा व्यवसाय चालतो. त्यामुळे स्थानिक मच्छिमार यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. स्थानिक बोटधारक व स्थानिक मच्छिमार याना विश्वासात घेऊन हे काम पूर्ण होणार आहे. परंतु कोणालाही न विचारता हे काम होत असेल, तर आमचा त्याला विरोध असणार आहे.

इस्माईल सिद्दिकी, उपसरपंच, राजपुरी ग्रामपंचायत

logo
marathi.freepressjournal.in