नागरिकांनी कामासाठी नेमका संपर्क साधावा कुठे?

सद्य:स्थितीत जव्हार तालुक्यातील अनेक कार्यालयांचे दूरध्वनी बंद असल्याचे दिसून येत आहे.
नागरिकांनी कामासाठी नेमका संपर्क साधावा कुठे?

जव्हार शहरातील सर्वच प्रकारच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये पूर्वी बीएसएनएल या सरकारी कंपनीचा दूरध्वनी वापरण्यात येत असायचा, यामुळे नागरिकांना कोणत्याही शासकीय कार्यालयातील माहिती प्राप्त करणे सहज शक्य होत असायचे, परंतु आता तहसील कार्यालयापासून तर एसटी डेपोपर्यंत सर्वच ठिकाणच्या दुरध्वनी बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत, असून कोणत्याही कामासाठी नेमका संपर्क साधायचा कुठे असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

सध्या मोबाईलचा काळ आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले आहेत. असे असले तरी कार्यालयीन कामासाठी दूरध्वनीचे महत्त्व नाकारून चालणार नाही. मात्र, सद्य:स्थितीत जव्हार तालुक्यातील अनेक कार्यालयांचे दूरध्वनी बंद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सामान्य नागरिकांची चांगलीच कोंडी होत आहे.एक काळ असा होता की, घरी दूरध्वनी संच असणे हे प्रतिष्ठेचे लक्षण समजले जात होते. मात्र, मोबाईलचे आगमन झाल्यानंतर या दूरध्वनी संचाकडे दुर्लक्ष झाले. जो तो मोबाईलच्या मागे लागला. परिणामी बहुतेकांनी घरगुती दूरध्वनी संच बंद केले. मात्र, प्रत्येक शासकीय कार्यालयांनी लोकांच्या तक्रारी किंवा तत्सम कामांसाठी आणि कार्यालयीन कामकाजासाठी दूरध्वनी ठेवले होते. ते दूरध्वनी संच आजही कायम असले तरी ते बंद अवस्थेत असल्याची चित्र आहे.

सर्वसामान्य नागरिकांकडे अधिकाऱ्यांचा मोबाईल क्रमांक कसा असणार? सुशिक्षित व्यक्ती कार्यालय प्रमुखाच्या मोबाईलवर फोन करून आपले गाऱ्हाणे मांडून आपले काम करून घेतीलही. पण सामान्य माणसाचे काय, असा प्रश्न विचारला जात आहे. सामान्य माणसांना कार्यालय प्रमुखांचे मोबाईल नंबर माहीत नाहीत. पण आजही अनेक कार्यालयांचे दूरध्वनी नंबर तोंडपाठ आहेत. याचा उपयोग करून ते या नंबरवरून काही कामांबाबत चौकशी करीत असले तरी हे नंबर बंद येत असल्याने त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in