वीजबिलाबरोबर अतिरिक्त सुरक्षेचा चटका

वीज वितरण कंपनीच्या दरवाढीचा वीज ग्राहकांना सतत सामना करावा लागत असतानाच मार्च महिन्याच्या वीजबिलाबरोबर अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले असल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
वीजबिलाबरोबर अतिरिक्त सुरक्षेचा चटका

जव्हार : उन्हाचा पारा चढला असताना महागाईने देखील उच्चांक गाठला आहे. रोजगाराची भीषण समस्या असणाऱ्या जव्हार सारख्या आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिक हे शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून महिन्याचे बजेट जेमतेम बसवित मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य ग्राहकांना आता वीज वितरण कंपनीने अतिरिक्त ठेवीचा चटका दिला आहे. वीज वितरण कंपनीच्या दरवाढीचा वीज ग्राहकांना सतत सामना करावा लागत असतानाच मार्च महिन्याच्या वीजबिलाबरोबर अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल दिले असल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मार्च महिन्यापासून वातावरणात बदल झाला असून उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे, त्यामुळे विजेचा वापर अधिक वाढला आहे.मात्र विजेचे दर वाढवून अतिरिक्त सुरक्षा रक्कमेची वीज बिले दिल्याने घरात राहीले तर आर्थिक भार वाढतो आणि बाहेर गेल्यास उष्माघात अश्या परिस्थितीत नेमके काय करावे अश्या द्विधा मनःस्थितीत येथील वीज ग्राहक सापडला आहे.

वीज वितरण कंपनीकडून सतत वीजदरात वाढ केली जाते. सर्वसामान्यांना विजेचा वापर परवडत नसल्याने ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. सध्या मार्च महिन्यात वापरलेल्या विजेच्या बिलांचे वाटप करण्यात आले असून, या बिलाबरोबरच अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे बिल देण्यात आले आहे. अतिरिक्त सुरक्षा बिले प्रत्येक ग्राहकांना वेगवेगळ्या रकमेची देण्यात आली आहेत.

या बिलामध्ये वीजपुरवठा सुरू केल्याची तारीख आणि अतिरिक्त बिलाची रक्कम देण्यात आली आहे. पूर्वीची सुरक्षा ठेवीची रक्कम दिली असून, त्यामध्ये वाढ करून इतर अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची बिले महावितरणकडून दिली गेली आहेत. प्रत्येक ग्राहकांकडून वेगवेगळी रक्कम आकारण्यात येत असून, शंभर, दोनशे रुपयापासून दोन- तीन हजार व त्याहून अधिक अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम आकारण्यात येत आहे.

महागाईने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या महागाईमुळे ग्रामीण आदिवासी भागातील ग्राहक वैतागले आहेत. सतत वेगवेगळ्या ठेवी. तसेच विजेची दरवाढ होत आहे. त्यामध्ये आता ही अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या नावाखाली वीज ग्राहकांची लूट केली जात आहे आहे.

- चित्रांगण घोलप, पालघर जिल्हाध्यक्ष, कोकण मराठी पत्रकार संघ

आदिवासी जनतेची लूट सुरू आहे. मला सुरक्षा ठेवीच्या नावाखाली नियमित बिल सोडून अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून अतिरिक्त बिल आले आहे. वीज वितरण कंपनीचा हा भोंगळ कारभार सुरू आहे. वीज ग्राहकांना कोणीच वाली उरला नाही. आधीच वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.

- सुरेश पवार, ग्राहक

महावितरण कंपनीच्या बदलत्या धोरणाबद्दल संभ्रम

सतत वाढत जाणारी विजेची बिले यामुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. वीज कनेक्शन घेताना सुरक्षा ठेव म्हणून काही रक्कम घेतली जाते. नंतर अतिरिक्त सुरक्षा ठेव कशी काय घेतली जाते. या विषयी वीज वितरण कंपनीच्या धोरणाबद्दल ग्राहकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in