रायगडचे पालकमंत्रिपद कोणाला मिळणार?आदिती तटकरे की, भरत गोगावले? कोण मारणार बाजी?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात रविवारी रायगड जिल्ह्याला भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्या रूपाने दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. यामुळे रायगडात महायुतीची ताकद आणखी वाढली आहे.
आदिती तटकरे, भरत गोगावले  (डावीकडून)
आदिती तटकरे, भरत गोगावले (डावीकडून)
Published on

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच विस्तारात रविवारी रायगड जिल्ह्याला भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्या रूपाने दोन मंत्रिपदे मिळाली आहेत. यामुळे रायगडात महायुतीची ताकद आणखी वाढली आहे. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मिळविण्यावरून गोगावले आणि तटकरे यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

आता सर्वांनाच उत्सुकता आहे ती जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची ज्येष्ठतेनुसार पालकमंत्रिपदी भरत गोगावले विराजमान होणार की खा. सुनील तटकरे हे राजकीय कुरघोडी करून पुन्हा पालकमंत्रिपद आदिती तटकरे यांना मिळवून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे यांना भरत गोगावले, आ. महेंद्र दळवी, आ. महेंद्र थोरवे या तिन्ही शिवसेनेच्या आमदारांनी कडाडून विरोध केला होता. त्यावरून खा. सुनील तटकरे आणि आ. भरत गोगावले यांच्यात राजकीय वादविवाद झाले होते. पण नंतर राजकीय बदलानंतर महायुती सरकारच्या काळात शिवसेनेचे उदय सामंत हे रायगडचे पालकमंत्री झाले, आता त्याच मुद्द्यावरून पुन्हा राजकीय संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी पार पडला. यामध्ये मागील सरकारामधील राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे या महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री होत्या. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आणि पुन्हा महिला बालकल्याण विभागाचे मंत्रिपदी नियुक्ती झाली आहे.

रायगडला प्रथमच दोन कॅबिनेट

मागील अडीच वर्षांपासून मंत्री बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेचे आ. भरत गोगावले यांनाही मंत्री करून त्यांची स्वप्नपूर्ती करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या रायगडच्या राजकीय इतिहासात प्रथमच दोन कॅबिनेट मंत्रिपदे जिल्ह्याला मिळाली आहेत. दोन मंत्र्यांमुळे रायगडचा विकासाचा मार्ग आता खुला झाल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. मात्र पालकमंत्रिपदाचा तिढा अजून सुटलेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in