दागिने चोरून पत्नी प्रियकराबरोबर फरार; अखेर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पत्नी प्रियकरासह घरातील ३० लाख ९० हजारांची रोख व दागिने घेऊन पळून गेल्या प्रकरणाच्या पतीच्या तक्रारींवर गेले काही महिने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवघर पोलिसांनी उशिराने का होईना, अखेर गुन्हा दाखल केला
दागिने चोरून पत्नी प्रियकराबरोबर फरार; अखेर पोलिसांनी दाखल केला गुन्हा

भाईंंदर : पत्नी प्रियकरासह घरातील ३० लाख ९० हजारांची रोख व दागिने घेऊन पळून गेल्या प्रकरणाच्या पतीच्या तक्रारींवर गेले काही महिने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या नवघर पोलिसांनी उशिराने का होईना, अखेर गुन्हा दाखल केला आहे; मात्र प्रियकराने अग्निशस्त्रे दाखवून धमकावल्याप्रकरणी कलम पोलिसांनी लावली नसल्याचे फिर्यादी पतीने म्हटले आहे.

मीरारोडच्या न्यू गोल्डन नेस्ट, मिठालाल जैन बंगल्यासमोर जानकी हाइट्स गणेश हंडगर (४८) हे ९४ वर्षांची आई ताराबाई, ५ वर्षांचा मुलगा गुरुत्व तसेच ३६ वर्षीय पत्नी बेबी उर्फ मुस्कान यांच्या सोबत राहतात. परंतु पत्नी मुस्कान हिचे सलमान खान नावाच्या व्यक्तीसोबत घरातच आक्षेपार्ह स्थितीत गणेश यांनी पकडल्याने त्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. जुलै २०२२ मध्ये मुस्कान ही सलमानसोबत घरातील बरेच सामान तसेच ३० लाख ९० हजार रुपयांचे दागिने व रोख चोरून पळून गेली. याबाबत गणेश यांनी नवघर पोलिसांना सातत्याने अनेक पुराव्यांसह तक्रारी अर्ज केले. सलमान याने तर कोणत्या पोलिसासोबत बोलणे करून देऊ. असे सांगत ८-१० पोलीस तुझ्या घरी पाठवू का? सांगत अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे घेऊन गणेश यांना अग्निशस्त्र दाखवून मारून टाकण्याची धमकी दिली. गणेश यांच्या फिर्यादीनंतर ५ जानेवारी रोजी नवघर पोलिसांनी मुस्कान व सलमानवर गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीच्या सांगण्यावरून पीडित पतीवरच खोटा गुन्हा

लेखी तक्रारी व पुरावे देऊन सुद्धा नवघर पोलीस गुन्हा दाखल करत नव्हते. उलट गणेश यांनी दिलेले पुरावे आरोपीला कळायचे. पोलिसांकडे सातत्याने जाऊन त्यांना वस्तुस्थिती सांगितली. आपले जबाब सुद्धा घेण्यात आले. पोलीस एकीकडे आरोपीला पाठीशी घालत असताना आपल्यावर मात्र आरोपींच्या सांगण्यावरून खोटा गुन्हा लगेच दाखल केला. अखेर आपल्याला मुंबई उच्च न्यायालयात नवघर पोलिसांच्या अन्यायाविरोधात न्याय मिळवण्यासाठी याचिका दाखल करावी लागली, असे गणेश यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in