कचराकोंडीमुळे ठाण्याचा स्वच्छ सर्वेक्षण नंबर घसरणार? कोट्यवधीचा खर्च कचऱ्यात

ठाणे बदलत आहे... असे घोषवाक्य आणि तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे.
कचराकोंडीमुळे ठाण्याचा स्वच्छ सर्वेक्षण नंबर घसरणार? कोट्यवधीचा खर्च कचऱ्यात
(प्रातिनिधिक छायाचित्र)
Published on

ठाणे प्रतिनिधी : ठाणे बदलत आहे... असे घोषवाक्य आणि तब्बल ५ हजार कोटींपेक्षा अधिक बजेट असलेल्या ठाणे महापालिका क्षेत्रात कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. आता याच कचराकोंडीमुळे स्वच्छ सर्वेक्षणातील टक्का घसरू नये यासाठी धास्तावलेल्या ठाणे महापालिकेने केवळ ४५ दिवसांसाठी पावणेदोन कोटींचा खर्च करण्याची तयारी केली आहे.

मात्र हा खर्च कचऱ्यात जाणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.

शहरात कचरा साठून राहू नये आणि हे स्वच्छ सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या पाहणीमध्ये लक्षात येऊ नये यासाठी भाडेतत्त्वावर अतिरिक्त घंटागाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात ठिकठिकाणी साठलेल्या कचऱ्यामुळे एकीकडे ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात आले असताना केवळ स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पालिकेचा नंबर घसरू नये यासाठी पालिकेची धडपड सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कचरा टाकण्यासाठी ठाणे महापालिकेकडे जागाच उपलब्ध नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या मुद्द्यावरून आधीच ठाणे महापालिकेवर सर्वच स्तरावरून टीका होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे महापालिकेला कचऱ्याची समस्या सोडवता आलेली नाही. मात्र असे असताना स्वच्छ सर्वेक्षणात मात्र ठाणे महापालिकेचा दरवर्षी नंबर येत असल्याने याबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. शहरात एकीकडे कचराकोंडीचा परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र या कचराकोंडी स्वच्छ सर्वेक्षणात या वर्षीचा नंबर जाऊ नये यासाठी धास्तावलेल्या पालिका प्रशासनाने भाडेतत्त्वावर घंटागाड्या घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ स्वच्छ सर्वेक्षणातील रँक जाऊ नये यासाठी हा गाड्या केवळ ४५ दिवसांसाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे.

भाडेतत्त्वावर घेण्यात येणाऱ्या घंटागाड्यांमध्ये ३५ सहाचाकी आणि ४० चारचाकी वाहने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी ८५ लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. प्रभाग समिती निहाय हा खर्च करण्यात येणार आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी अधिकारी शहरात पाहणी करत आहेत. या पाहणी दरम्यान जर शहरात कचरा आढळून आला तर रँक जाण्याची भीती आहे. त्यामुळे पालिकेने कोट्यवधीचा खर्च करण्याची तयारी दर्शवली आहे.

काय आहे स्वच्छ सर्वेक्षण?

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशातील संपूर्ण शहरे स्वच्छ ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. स्वच्छ सर्वेक्षण ही स्पर्धा देशातील निवडक शहरांमध्ये दरवर्षी घेण्यात येते. स्वच्छ सर्वेक्षण २०२४ या स्पर्धेत एकूण ६३०० गुण ठेवण्यात आले आहे. तसेच शहरात कुठेही कचरा साठलेला किंवा कचराकुंड्या असता कामा नये, असे निकष ठेवण्यात आले आहे. हे निकष पूर्ण न करणाऱ्या महापालिकेचा रँक जाण्याची भीती असल्याने ठाणे महापालिकेची ही धडपड सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in