
ठाणे : ठाण्याचे भूषण व सांस्कृतिक ओळख असलेले समस्त नाट्यकलावंताचे हक्काचे व्यासपीठ ठरलेले राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यामध्ये ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना देत असतानाच कामाची गती वाढविण्याचे निर्देश खासदार नरेश म्हस्के मंगळवारी प्रशासनाला दिले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्टची सोय, नाट्य व सिनेमांसाठी लागणारी ध्वनी व्यवस्था, आरामदायी आसन व्यवस्था, अशा अत्याधुनिक सोयींनी ठाणेकरांसाठी सज्ज होत असून आतापर्यंत महापालिकेने केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच रंगकर्मींना गैरसोय होणार नाही, यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक असलेल्या बाबींचा अंतर्भाव करण्याच्या सूचनाही खासदारांनी यावेळी दिल्या.
संपूर्ण रंगायतनची पाहणीदरम्यान रंगायतनच्या पाठीमागच्या लॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या लिफ्टच्या जागेची पाहणी केली. रंगायतनच्या मुख्य सभागृहाची पाहणी करत असताना आसनव्यवस्था या आरामदायी असाव्यात. तसेच स्टेजवरची ध्वनी व्यवस्था सर्वोत्तम दर्जाची असावी, रंगमंचावरील ध्वनी व्यवस्था व प्रेक्षागृहातील ध्वनी व्यवस्था स्वतंत्र असल्या पाहिजेत, असेही खासदार म्हस्के यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे वातानुकूलित यंत्रणा ही दोन्ही ठिकाणी स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. प्रेक्षागृहात लाइट व्यवस्था, ध्वनी व्यवस्था यंत्रणेसाठी पुरेशी व्यवस्था करावी तसेच पीठाची उंची मर्यादित ठेवावी जेणेकरून पहिल्या रांगेतील प्रेक्षकांना त्याचा त्रास होणार नाही. तसेच प्रोजेक्टरची व्यवस्था करण्याबाबतही त्यांनी सूचित केले. नूतनीकरण करत असताना प्रेक्षागृहातील बाल्कनीमधून देखील संपूर्ण स्टेज दिसेल, अशी व्यवस्था केल्याबद्दल खासदारांनी समाधान व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी राम गणेश गडकरी रंगायतनच्या कामाची पाहणी केली. या दौऱ्यास महापालिकेचे नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवाणी, उपअभियंता आसावरी सोरटे कार्यकारी अभियंता भगवान शिंदे, आदी उपस्थित होते.
रसिकांना कर्तव्याची जाणीव असणे गरजेचे
रंगायतनमधील सर्व स्वच्छतागृहाची पाहणी करत असताना स्वच्छतागृहात कायम स्वच्छता राहील, या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. स्वच्छतेबाबत नाटकांसाठी येणाऱ्या नागरिकांनी देखील सजग राहणे गरजेचे आहे. नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांना प्रेक्षागृहात खाद्यपदार्थ आणू नयेत, अशा सूचना दिल्या जातात, परंतु प्रत्येक बाबींसाठी कडक नियम करणे शक्य नसते, यासाठी नाटकाला येणाऱ्या रसिकांनी देखील आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे खासदार म्हस्के यांनी नमूद केले.