
ठाणे शहरात पार्किंगची समस्या अत्यंत बिकट झाली आहे, आता तर गाड्या पार्क करण्यासाठी शहरात पार्किंग प्लाझा नसल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या करण्यात येत आहेत, महापालिकेच्या पार्किंग धोरणाचे घोडेही लालफितीच्या कारभारात अडकले आहे. मात्र यातून मार्ग काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत, हा प्रश्न महापालिकेच्या अधिपत्याखाली असला तरी लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत असल्याने दिवसेंदिवस हा प्रश्न जटील होऊ लागला आहे. मात्र आता ठाणेकर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असल्याने या महत्वाच्या वाहतूक धोरणाला चालना मिळेल तसेच पार्किंगच्या समस्येवरही ते काहीतरी ठोस मार्ग काढतील अशी आशा ठाणेकरांना आहे.
ठाणे शहराचे नागरिकरण झपाटयाने वाढत असल्याने लोकसंख्येतही वाढ होत आहे. ठाणे स्टेशनकडे येणा-या वाहनधारकांची संख्या मोठया प्रमाणावर असून, दिवसेंदिवस पार्किग समस्या बिकट होत आहे, मंजूर विकास आराखड्यातील पार्किंगसाठी असलेले भूखंड विकसित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे शहरातील पार्किंगची परिस्थिती सध्या खूपचं भयावह आहे.
सध्या शहरात पोखरन रोड क्रमांक २ येथील आशर रेसिडन्सी मधील सुविधा भूखंडावर बिल्डरने पार्किंग प्लाझा बांधून दिला आहे. या ठिकाणी अवघी ६१ चारचाकी वहाने आणि ४४ दोन चाकी गाड्या पार्क करण्याची व्यवस्था आहे. मात्र हा पार्किंग प्लाझा शहराबाहेर आहे. गावदेवी मैदान परिसरात स्मार्टसिटी योजनेतून पार्किंग प्लाझाचे काम सुरु आहे. या ठिकाणी भुयारी पार्किंग उभारण्यात येत असले तरी त्या ठिकाणी मर्यादित गाड्यांचे पार्किग करण्यात येणार आहे. पालिकेच्या सर्वात जुन्या जवाहर बाग अग्निशमन केंद्राची धोकादायक इमारत पाडून त्या जागेवर पार्किंग प्लाझा उभारण्याचा निर्णय झाला होता. परंतू बीओटी तत्वावरील या प्लाझाचे काम कधी सुरू होणार आणि त्याचा फायदा नागरीकांना कधी होणार हेही गुलदस्त्यात आहे.
शहर विकास आराखड्यानूसार पार्किंग करता एकुण ३० आरक्षणे आहेत त्यापैकी मॉडेला मिल कंपनीच्या जागेवरील पार्किंग आरक्षणावर कॅन्सर हॉस्पिटल,नाट्यगृह विकसित करण्याचा प्रस्ताव आहे,कोपरी बस स्थानकाजवळील मध्य रल्वेची जागा.सर्वे २२३,२२० माजिवडा येथील खाजगी विकासकांनी विकास प्रस्ताव दाखल केले आहेत,नौपडा येथील मेंटल हॉस्पिटलचा भूखंड मोकळा आहे. फक्त ८ राखीव भूखंडावर पार्किंग होवू शकते तर तब्बल २२ भूखंडावर अतिक्रमणे असल्याने शहरातील पार्किंगचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र आहे. नौपाडा, घंटाळी, पांचपाखाडी, चरई, टेंभीनाका, जांभळी नाका, उथळसर, खोपट, गोखले रोड, स्टेशन रोड, आदी अनेक ठिकाणी दिवसेंदिवस वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंगची समस्या उग्र होत चालली आहे.
उड्डाणपुलाखाली अनधिकृत पार्किंग
उड्डाणपुलाखालील जागेचा अनधिकृत वाहन पार्किंगसाठी सर्रास वापर सुरु आहे. एमएसआरडीसी आणि एमएमआरडीए या महामंडळाने ही वाहन पार्किंग बंद करण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता मात्र त्यांना त्यात यश मिळालेले नाही. पुलाखालील अनधिकृत पार्किंग,भिकाऱ्यांचा वावर,समाजकंटकांकडून सर्रास गैरवापर होऊ लागला आहे. पालिका आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून शहरासाठी पार्किंग धोरण अपेक्षित आहे मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून ते लालफितीत अडकले आहे मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालफिती अडकलेले धोरण बाहेर काढतील आणि सर्वसामान्य ठाणेकरांना दिलासा देतील अशी अपेक्षा ठाणेकरांना आहे.