
भिवंडी : तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागात मागील ३ ते ४ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात धुक्याची चादर पसरत असून धुक्यामुळे वाहनचालक, मॉर्निंगवॉकवाल्यांची तारांबळ उडत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या राज्यभर गुलाबी थंडीची लाट सुरू असून रात्री आणि सकाळच्या सुमारास वातावरणात चांगलाच गारठा निर्माण होत आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून सकाळी एक ते दोन तासांकरिता भिवंडी शहरासह ग्रामीणमध्ये धुक्याने रस्तेही व्यापले जात आहेत. त्यामुळे धुक्यातून वाट काढताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासह मॉर्निंगवॉक व कवायतीसाठी बाहेर पडणारे वयोवृद्ध, महिला वर्ग आणि खेळाडू यांची तारांबळ उडत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महामुंबईतील तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळे येथील थंडीत वाढ झाली असून अनेक ठिकाणी धुक्यांचे साम्राज्य पसरले आहे.