उल्हासनगर : एका बाजूला असह्य प्रसूती वेदना, दुसरीकडे रस्त्यावर वाहनांची न संपणारी रांग... रुग्णालय गाठण्यासाठी प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असताना वाहतूककोंडीने गर्भवती महिलेची वाट रोखली. अखेर रुग्णालयापर्यंत पोहोचण्याआधीच तिने रिक्षात बाळाला जन्म दिला.
मंगळवारी दुपारी गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला रिक्षातून उल्हासनगर-३ येथील रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र वाहतूककोंडी झाल्याने रिक्षा अडकून पडली. रुग्णालय गाठण्यापूर्वीच महिलेने रिक्षात बाळाला जन्म दिला. त्यानंतर माता आणि नवजात बाळाला तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले.
आपत्कालीन रुग्णांसाठी कोंडी ठरतेय जीवघेणी
डॉक्टर आणि परिचारिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून दोघांनाही तत्काळ उपचारासाठी दाखल केले. या घटनेमुळे उल्हासनगरमधील सातत्याने वाढणाऱ्या वाहतूककोंडीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः रुग्णवाहिका, गर्भवती महिला आणि अन्य आपत्कालीन रुग्णांसाठी ही कोंडी जीवघेणी ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.