
महिलांच्या असुरक्षितेचा प्रश्न हा आपल्याकडे नेहमीच काळजीचा विषय बनून राहिला आहे. एखादी घटना घडल्यानंतर काही दिवस माध्यमांच्या चर्चेचा विषय झाल्यानंतर पुन्हा त्याकडे एक गंभीर स्वरूप म्हणून वेळीच पाहणे गरजेचे आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील बाजारपेठेत २१ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला फरफटत नेण्याची एक चीड निर्माण करणारी घटना नुकतीच ठाण्यामध्ये घडली. सदर घटनेचा व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर ठाणेनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला मुंबईतील दिघा परिसरातून अटक केली. कटिकादला विरांगनेलू (३६) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही, माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे काटीकाडा याला अटक केली आहे.
पीडित मुलगी ठाण्यात राहते आणि ठाण्यातील एका महाविद्यालयात इयत्ता 11वीत शिकते. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ती मार्केटमधून पायी जात होती. त्याचवेळी आरोपी रिक्षाचालकही तिथे होता. त्याने तरुणीकडे पाहून अश्लील हावभाव केले आणि कमेंट केली. मुलीने धाडसाने रिक्षाचालकाला विचारले. त्यावेळी रिक्षाचालकाने रिक्षात बसून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने त्याला रिक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता रिक्षाचालकाने रिक्षा सुरू केली. त्याने तरुणीलाही काही अंतर पुढे नेले. मुलीच्या हाताला दुखापत होऊन ती रस्त्यावर पडली. त्यानंतर रिक्षाचालक स्टेशनच्या दिशेने फरार झाला.
पीडित मुलगी महाविद्यालयातून परतल्यानंतर तिने ठाणेनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. रिक्षाचालकाने केलेल्या या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या आरोपीच्या शोधासाठी ठाणेनगर पोलिसांनी तीन वेगवेगळी पथके तैनात केली होती. पोलिस सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषणावर अवलंबून होते. त्यावेळी ही रिक्षा नवी मुंबईतील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. खबऱ्याकडून माहिती मिळाल्यानंतर ही रिक्षा दिघा येथे आरोपी राहात असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला त्याच्या दिघा येथील राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली.