जमीन बळकावल्याप्रकरणी महिलेचा आत्मदहनाचा इशारा; शासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे

३४ वर्षांपासून पीडित दलित महिला मीनाबाई सदर जमिनीचा ७/१२ नावावर करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून प्रयत्न करीत आहेत.
जमीन बळकावल्याप्रकरणी महिलेचा आत्मदहनाचा इशारा;   शासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे
Published on

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील कुकसे-भोईरगाव हद्दीतील ६९ वर्षीय दलित महिला गेल्या दोन पिढ्यांपासून वडिलोपार्जित जमीन पतीसह कसत असलेली कब्जावहिवाटीची जमीन शासकीय अधिकारी आपसात संगनमताने साटेलोटे करून बळकवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पीडित वृद्ध महिलेने शासनाला आत्मदहनाचा इशारा सामाजिक माध्यमातून दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तलाठी सजा अर्जुनली हद्दीतील भोईरगाव येथील स.नं.१५,१६ जुना ५८ व ५७ आणि मौजे कुकसे येथील ५/१/ अ, ५/२ व जुना ५९/१,२ अशी एकूण साडे पाच एकर जमीन मूळ मालक मंगलदास दामोदर ठक्कर यांच्या मालकीची आहे. परंतु त्यांनी राजीनामा दिल्यानंतर सदर जमीन वाडवडिलांपासून भीमराव गणपत सोष्टे यांच्या नावावर आहे. गत दोन पिढ्यांपासून ते पत्नी मीनाबाई सोष्टे यांच्यासोबत ती जमीन कसत आहेत. यासह तलाठी दप्तरी पीकपाण्याची नोंदही त्यांच्या नावे आहे.

दरम्यान, ३४ वर्षांपासून पीडित दलित महिला मीनाबाई सदर जमिनीचा ७/१२ नावावर करण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून प्रयत्न करीत आहेत. मात्र शासनाचे अधिकारी आर्थिक साटेलोटे करून सदर जमीन विकासकांच्या घश्यात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप मीनाबाई यांनी केला असून याच जमिनीतील पोटहिस्से अन्य दोन व्यक्तींच्या नावे झाली आहेत, परंतु पीडिता दलित असल्याने सदर जमीन महिलेच्या नावे होत नसल्याचेही मीनाबाईंनी सांगितले आहे. जमीन बळकावण्यासाठी काही समाजकंटकांनी त्यांचे घर जाळून त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे नुकतेच हिवाळी अधिवेशनात दलित जमिनींवरील अतिक्रमण हटवू नये,असे आदेश महसूल विभागाने पारित केलेले असताना हा सर्व प्रकार खळबळजनक असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच सन २०१५ मध्ये पाठवलेले अर्ज २०२४ मध्ये निकाली काढण्यात येते ही बाबही मनात संभ्रम निर्माण करणारी दिसून येत आहे. तर सद्यस्थितीत या सर्व घोटाळ्याची दखल जनसामान्यांसाठी लढणाऱ्या एस.जी. लाईफ केअर फाऊंडेशन या संस्थेने घेतली असून पीडित दलित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.

- दत्ता श्रीरंग गायसमुद्रे, संस्थापक एस.जी. लाईफ केअर फाऊंडेशन

logo
marathi.freepressjournal.in