बदलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित महिला व युवती मेळाव्यानिमित्त बदलापूरला येताना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रेल्वे प्रवास केला. मुंबई ते बदलापूर दरम्यानच्या या रेल्वे प्रवासात त्यांनी अनेक महिला प्रवाशांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्या मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बदलापूर शहराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, ठाणे ग्रामीण जिल्हा युवती अध्यक्षा प्रियांका दामले यांनी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बदलापूर पूर्वेकडील गुप्ते म्हसकर सभागृहात महिला व युवती मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात बचत गट, अंगणवाडी सेविका यांसह विविध क्षेत्रातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून हवी ती मदत केली जाईल असे आश्वासन आदिती तटकरे यांनी दिले. तसेच शहरात वर्षभर आशिष दामले व प्रियांका दामले यांच्या माध्यमातून महिलांसाठी स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने, होत असलेले शिबीर, उपक्रम याचे मूळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्कार व शिकवणीतून आलेले असल्याचे सांगत या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत, प्रियंका दामले यांनी महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या मागणीला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. केवळ लोणचे, पापड याचे उत्पादन हा विचार न करता कौशल्य विकास तसेच महिला व बाल विकास विभागमार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन महिलांच्या कौशल्य विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत आपण सकारात्मक असल्याची भूमिकाही तटकरे यांनी मांडली. अंगणवाडी सेविकांची मानधन वाढीची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. त्यानुसार मार्च २०२३ मध्ये त्यांना २० टक्के वाढ देण्यात आली आहे. स्मार्टफोनच्या मागणीची पूर्तता करत आहोत. इतर मागण्यांबाबतही शासन सकारात्मक असून या मागण्यांचीही पूर्तता होईल. अंगणवाडी सेविकांनी काम बंद ठेवण्याची भूमिका घेऊ नये.
- आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री