कळवा खाडी पुलाच्या एका मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात

गावदेवी येथील भूमिगत वाहनतळ आणि दादोजी कोंडदेव क्रीडांगण येथे सुरू असलेल्या नविन प्रकाश व्यवस्थेच्या कामाची पाहणी केली.
कळवा खाडी पुलाच्या एका मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात

ठाणे - कळवा परिसरातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी केली. त्यावेळी, एका मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असून उर्वरित दोन्ही मार्गिका ठरलेल्या मुदतीत पूर्ण होतील, हे कटाक्षाने पाहण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवीन कळवा पूल, के. व्हिला येथील ६७६ मीटरची मिसिंग लिंक असलेला उड्डाणपूल, गावदेवी येथील भूमिगत वाहनतळ आणि दादोजी कोंडदेव क्रीडांगण येथे सुरू असलेल्या नविन प्रकाश व्यवस्थेच्या कामाची पाहणी केली. शहर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगर अभियंता (विद्युत) शुभांगी केसवानी, क्रीडा विभागाच्या प्रभारी उपायुक्त मिनल पालांडे, कळवा पूल प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता धनाजी मोदे, के. व्हीला पूल प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता संजय कदम, गावदेवी वाहनतळ प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विकास ढोले आदी त्यांच्या प्रकल्पस्थळी उपस्थित होते.

कळवा पुलाच्या एका मार्गिकेची शिल्लक कामे तात्काळ पूर्ण करावीत. रंगरंगोटीची कामे ३० दिवसात झाली पाहिजेत. नविन पूल असल्याने प्रत्येक गोष्ट बारकाईने तपासून घ्यावी, असे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले. मार्गिका (लेन) दुभाजक पांढऱ्या पट्ट्या आयआरसी निकषांनुसार हव्यात. त्या सुबक पद्धतीने कराव्यात. दोन पट्ट्यांमध्ये पांढऱ्या रंगाचे शिंतोडे नकोत. सर्व कामे पूर्ण झाल्यावर रंगाचा शेवटचा थर (कोट) द्या, अशा सूचना आयुक्तांनी केल्या.

मध्यवर्ती कारागृहाकडील मार्गिका डिसेंबरपर्यंत तर साकेतकडील मार्गिका मार्च अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ते वेळापत्रक कटाक्षाने पाळावे. ज्या ठिकाणी तिन्ही मार्गिका एकत्र येतात तेथे अपघात होऊ नये म्हणून दुभाजक, ड्रम अशी जी त्या परिस्थतीला योग्य वाटेल ती उपाययोजना करावी, असेही आयुक्तांनी सांगितले.

नवीन कळवा पुल २.४ किमींचा आहे. त्याचे कार्यादेश २०१४ मध्ये देण्यात आले होते. त्यावर पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्गिका आहे. तसेच, खाडीवरील १०० मीटरचे बास्केट हॅण्डल ट्रस हे या पुलाचे वैशिष्ट्य आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in