डोंबिवलीत होणार विश्वविक्रमी दीपोत्सव; श्रीराम मंदिर उत्सवाच्या निमित्ताने खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी रोजी डोंबिवलीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात १ लाख ११ हजार १११ दिव्यांमधून प्रभू श्री रामाचे चित्र साकारला जाणार आहे.
डोंबिवलीत होणार विश्वविक्रमी दीपोत्सव; श्रीराम मंदिर उत्सवाच्या निमित्ताने खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार
Published on

डोंबिवली : प्रभू श्री रामाच्या अयोध्येतील मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी होत असून, त्यानिमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघात विश्वविक्रमी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी रोजी डोंबिवलीतील ह.भ.प. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलाच्या मैदानात १ लाख ११ हजार १११ दिव्यांमधून प्रभू श्री रामाचे चित्र साकारला जाणार आहे. या दीपोत्सवाची विश्वविक्रम म्हणूनही नोंद केली जाणार आहे. यावेळी महाआरती केली जाणार असून, कल्याण लोकसभा मतदार संघात नऊ ठिकाणी आकर्षक अशी रोषणाई करण्यात येणार आहे. २१ जानेवारी रोजी होणारा या दीपोत्सवाची विश्वविक्रम म्हणून नोंद केली जाणार आहे. त्यासाठी तयारी करण्यात आली असून हा दीपोत्सव देशातील सर्वात मोठा दीपोत्सव ठरण्याची आशा आहे. इंडिया वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी या दीपोत्सवाच्या वेळी मैदानात उपस्थित राहतील. त्यामुळे या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. कार्यक्रमानिमित्त संपूर्ण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने मोफत डाळ आणि साखरेचे वाटप करण्यात येते आहे. लोकसभा मतदारसंघातील सुमारे पाच लाख कुटुंबापर्यंत या जीन्नसाचे वाटप केले जाते आहे. त्यात प्रभू श्री राम मंदिराची प्रतिकृती, पुस्तकांचे मंदिर, विविध दहा ठिकाणी विद्युत रोषणाई, रामायण कार्यक्रम अशा विविधा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याच निमित्ताने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीतील ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलाचा शेजारील मैदानात भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध ठिकाणी विद्युत रोषणाई

प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध शहरातील प्रमुख ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण मतदारसंघाला एक उत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. या मध्ये ९० फीट रस्ता खारेगाव कळवा, कळवा नाका, शिळफाटा जंक्शन, फडके रोड डोंबिवली, चक्की नाका कल्याण, गरडा सर्कल डोंबिवली, सावळाराम क्रीडा संकुल डोंबिवली, गोल मैदान, चालीय मंदिर, झुलेलाल मंदिर उल्हासनगर, बायपास रस्ता शिवमंदिर अंबरनाथ या ठिकाणी ही विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

८० वर्ष जुने श्री राम मारुती मंदिरात रंगरंगोटी, साफसफाईचे काम सुरू

डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील श्री राम मारुती मंदिराची स्थापना १९४० साली झाली होती. या मंदिराची रंगरंगोटी व साफसफाईचे काम सुरू आहे. सह्यादी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक दिवसांपासून या कामात गुंतले असून, २२ तारखेला या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सह्यादी समाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ मोरे, सचिव बाजीराव माने, उपाध्यक्ष समाधान लोकरे, सल्लागार भीमराव गुंड, धनाजी पवार, कल्याण डोंबिवली अध्यक्ष पोपट काळंगे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रतिक साळवी, संस्थेचे प्रवक्ते रमेश माने, खजिनदार ज्ञानेश्वर भोसले, उपखजिनदार सुनील पाटील, ठाणे जिल्हा खजिनदार भरत राजगुरू, आरोग्य कमिटी अध्यक्ष तानाजी पाटील, महिला अध्यक्ष सुलेखा गटकळ, सदस्य संजय घारगे, हनुमंत पवार, प्रकाश सापरा, सदस्य रुपेश वाडावडेकर, अविनाश बुद्रुक, उमाकांत निंबाळकर श्रीमंत मासाळ, निवास कवडे, बालाजी जाधव, नीरज भोसले, सचिन आलदर आदींनी डोंबिवली पूर्वेकडील बाजीप्रभू चौकातील श्री राम मारुती मंदिराची साफसफाई आणि रंगरंगोटी करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in