येऊरमध्ये रात्रीचा धिंगाणा; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नियमांना हरताळ

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येणाऱ्या येऊर परिसरात रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरू असून, वनविभाग आणि ठाणे महापालिका प्रशासनाच्या वरदहस्ताने हॉटेल्स, धाबे आणि रिसॉर्ट्स बिनधास्तपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे.
येऊरमध्ये रात्रीचा धिंगाणा; संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नियमांना हरताळ
Published on

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात येणाऱ्या येऊर परिसरात रात्री उशिरापर्यंत धिंगाणा सुरू असून, वनविभाग आणि ठाणे महापालिका प्रशासनाच्या वरदहस्ताने हॉटेल्स, धाबे आणि रिसॉर्ट्स बिनधास्तपणे सुरू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. दरम्यान प्रशासनाने याबाबत तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.

येऊर परिसरात सुरू असलेल्या अवैध हॉटेल्स, धाबे आणि रिसॉर्ट्सवर वनविभाग व पालिका प्रशासनाने जर तत्काळ ठोस कारवाई केली नाही, तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल

स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग

केंद्र सरकारच्या २०१६ च्या परिपत्रकानुसार, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात अशा प्रकारच्या व्यवसायांना स्पष्टपणे बंदी घालण्यात आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमाभागात असलेल्या येऊरमध्ये मात्र या नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. संध्याकाळी सहा वाजल्यानंतर सामान्य नागरिकांना या परिसरात प्रवेश करण्यास मज्जाव असताना, दुसरीकडे पहाटेपर्यंत हॉटेल्स, रिसॉर्ट्समध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणात पार्ष्या, मद्यसेवन आणि अन्य अवैध प्रकार सर्रास सुरू असल्याचे महिंद्रकर यांनी सांगितले. या बेकायदेशीर धंद्यांवर वनविभाग किंवा महापालिकेकडून कुठलीही ठोस कारवाई होत नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

logo
marathi.freepressjournal.in