
ठाणे : येऊरच्या जंगलात बेकायदेशीररीत्या उभारण्यात आलेल्या टर्फवर ठाणे महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिकेने टर्फची जमीन उखडून काढली असून, संबंधित व्यावसायिकांवर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम (एमआरटीपी) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
या टर्फमुळे वन्यजीवांना प्रखर प्रकाशझोत व ध्वनिप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत होता. पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भागात उभारलेल्या या टर्फमुळे परिसंस्थेला धोका निर्माण झाला होता, असा आरोप पर्यावरणवाद्यांनी केला होता.
व्यावसायिकांनी २०२३ मध्ये सुमारे १० टर्फ उभारले होते. ते बेकायदेशीर असल्याने येऊर एन्व्हायर्नमेंटल सोसायटीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने जुलै २०२५ मध्ये सर्व टर्फ पाडण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. अखेर आयुक्त सौरभ राव यांनी याचिकाकर्ते रोहित जोशी यांच्यासोबत तातडीने बैठक घेऊन सर्व टर्फची जमीन उखडण्याचे, पाणी व वीजपुरवठा तोडण्याचे आणि संबंधितांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले. अखेर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले गेले आहेत.
या कारवाईमुळे येऊरमधील वन्यजीवांची तीव्र प्रकाशझोत व गोंगाटापासून सुटका झाली आहे.
रोहित जोशी, याचिकाकर्ते
महापालिकेच्या तक्रारीनंतर एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
राजकुमार वाघचौरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे
वन्यजीवांचेही मोठे नुकसान
दरम्यान, या टर्फवर खेळण्यासाठी प्रत्येक तासाला दीड ते दोन हजार रुपये आकारले जात होते. मागील काही वर्षांपासून येऊर परिसरात आदिवासींच्या जमिनींवर अनधिकृत बंगले, हॉटेल्स व टर्फ उभे राहिलेले आहेत.
रात्री-अपरात्री होणाऱ्या पार्थ्यांमुळे आदिवासी त्रस्त झाले होते, तर वन्यजीवांचेही मोठे नुकसान होत होते. या विरोधात आदिवासी व पर्यावरणवाद्यांनी अनेक आंदोलने केली.