दुचाकी दुभाजकाला धडकल्याने तरुणाचा मृत्यू

अंबरनाथ शहरातील रस्त्यांचे जाळे जोडण्यासाठी आणि वाहतूककोंडी फोडण्यासाठी नगरपालिकेने अनेक पर्यायी रस्त्यांची कामे गेल्या काही वर्षांत हाती घेतली आहेत.
दुचाकी दुभाजकाला धडकल्याने तरुणाचा मृत्यू

उल्हासनगर : अंबरनाथ शहराची नवीन ओळख तयार झालेल्या पूर्व भागातील लोकनगरी ते गोविंद तिर्थपूल या भागाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यावर शुक्रवारी रात्री एक भरधाव वेगात असलेली दुचाकी दुभाजकाला धडकली. या धडकेत दुचाकीवर मागे बसलेल्या विशाल शर्मा तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाला आहे. गेल्या दोन वर्षांत या मार्गावर भरधाव वाहनांमुळे अपघाताच्या घटना सतत घडत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास बायपास मार्गावर लोकनगरी दिशेहून गोविंद तिर्थ पुलाकडे येत असताना, उल्हासनगर व्ही.टी.सी. ग्राऊंड परिसरात राहणारे ताहर शेख (२१) आणि त्याचे मित्र बायपास मार्गावर भरधाव वेगाने दुचाकी चालवत होते. यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ताहरची दुचाकी बायपास रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसलेला विशाल शर्मा (१८) हा रस्त्यावर फेकला गेला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीचालक ताहर हा दुभाजकावरील मातीत आणि झाडांमध्ये पडल्याने तो सुदैवाने बचावला आहे. अपघाताची ही दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या अपघातातील जखमी ताहर याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बायपास रस्त्यावर अपघातांचे सत्र सुरूच

अंबरनाथ शहरातील रस्त्यांचे जाळे जोडण्यासाठी आणि वाहतूककोंडी फोडण्यासाठी नगरपालिकेने अनेक पर्यायी रस्त्यांची कामे गेल्या काही वर्षांत हाती घेतली आहेत. त्यातूनच शहरातून लोकनगरी ते उल्हासनगरकडे जाण्यासाठी पालिकेकडून गोविंद तिर्थपूल ते लोकनगरी बायपास रस्ता तयार करण्यात आला. चार पदरी आणि अतिशय आकर्षक असा हा रस्ता शहरातील तरुणाईचे केंद्रस्थान बनला आहे. त्यामुळे संध्याकाळनंतर या रस्त्यावर तरुणाईची मोठी वर्दळ असते. गेल्या वर्षभरात अतिवेगाने वाहने चालवत आणि वाहनांची शर्यत लावतांना दुचाकी आणि चारचाकी वाहनांचे अनेक भीषण अपघात झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in