
ठाणे : मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाखो तरुणांना कायमस्वरूपी रोजगाराची आशा दाखवली होती. मात्र ११ महिने प्रशिक्षणार्थी म्हणून काम करूनही या सुशिक्षित युवकांना सरकारने वाऱ्यावर सोडले. मागील काही महिन्यांत १३ आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही, त्यामुळे संतप्त प्रशिक्षणार्थींनी रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावीच ठाण्यात धडक दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘एकनाथ मामा, आम्हाला न्याय द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. ‘आठ दिवसांत ठोस निर्णय न घेतल्यास सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही,’ असा इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिला.
सरकारने पुन्हा शब्द पाळला नाही, तर दिवाळी काळी करणाऱ्या सरकारलाही दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनात सांगलीचे तुकाराम बाबा महाराज, संघटनेचे प्रकाश साबळे, ठाणे जिल्हाध्यक्ष निखिल म्हात्रे, मुंबई जिल्हाध्यक्ष काजल बुट्टे, लातूरचे अनिकेत मांदळे, जालना जिल्हाध्यक्ष सुखदेव भिसे, अकोल्याचे पवन भट, नंदुरबारचे निलेश वसावे, रायगडचे ऋषी पवार, साताऱ्याचे प्रवीण माने आदींसह राज्यभरातील हजारो प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
लाडका भाऊ योजनेवर संताप
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर युवांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी (लाडका भाऊ) योजना सुरू केली होती. या अंतर्गत दहा लाख तरुणांना शैक्षणिक पात्रतेनुसार प्रतिमहिना ६ ते १० हजार रुपये मानधन आणि सेवेत कायम करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ११ महिन्यांच्या कालावधीनंतर शासनाने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने सुमारे १ लाख ७५ हजार प्रशिक्षित युवक आज पुन्हा बेरोजगार झाले आहेत. आम्हाला फसवले, आमचे भविष्य अंधारात टाकले, असा आरोप करत या प्रशिक्षणार्थ्यांनी ठाण्यात आंदोलन पेटवले.
आठ दिवसांचे अल्टिमेटम
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष बालाजी पाटील-चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनकर्त्यांनी कायमस्वरूपी नोकरी, मानधनात दुप्पट वाढ आणि रोजगार हमी कायदा करण्याच्या मागण्या केल्या. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधून आठ दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती चाकूरकर यांनी दिली.