

डॉ. सविता महाडिक
ज्योतिष भूषण
सिंह
‘विशिष्ट कायदेशीर यश मिळेल’
सिंह रास ही अग्नितत्त्वाची रास असून पुरुषप्रधान रास आहे. या राशीचा स्वामी सूर्य आहे. म्हणजेच या राशींच्या जातकांवर सूर्याचे कारकत्व दिसते. कोणत्याही प्रकारे माघार घेणे अथवा पराभव स्वीकारणे यांना मान्य नाही. पूर्ण आत्मविश्वासाने कार्य करतात. त्याचप्रमाणे कुटुंबवत्सल असतात. शूर, राजसी, राजप्रिय, शत्रूंना जिंकणारा, कमी भोगी, उत्साही, संतुष्ट, परदेशगमनाची आवड असणारा. या राशीचे चिन्ह सिंह आहे. त्यामुळे सिंहाच्या स्वभावातील काही गुणदोष या राशींच्या जातकांमध्ये आढळतात. या राशीच्या जातकांची पित्त प्रकृती असते.
शिक्षण : शिक्षणासाठी ग्रहमान अनुकूल असले तरी काही ग्रहांची हवी तशी साथ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आपणास अभ्यासासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे सातत्य व योग्य दिशेने असलेले प्रयत्न हेही महत्त्वाचे ठरतील. त्यामुळे आपल्याला अपेक्षित यश मिळू शकते. परदेशी जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त होतील. कला व क्रीडा क्षेत्रात आपणास उल्लेखनीय यश लाभणार आहे. भाग्यवृद्धीचे व प्रसिद्धीचे योग बनत आहेत, पण प्रयत्न मात्र प्रामाणिकपणे करावेत.
पारिवारिक : कुटुंबात रोजच्या जीवनात थोडा संथपणा येण्याची शक्यता आहे. पण आपल्या मार्गदर्शनाने व पुढाकाराने त्यामध्ये गती व प्रगती होईल. खर्चाचे प्रमाण वाढत राहिले तरी उत्पन्नही त्याच प्रमाणात मिळेल. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या गरजा आपण पूर्ण करू शकाल. कुटुंबातील सदस्यांत गैरसमज झाल्यास आपल्या सुसंवादाने प्रश्न सुलभरीत्या सोडवण्यात यश मिळेल व प्रश्न संपुष्टात येतील. मतभेद संपतील. आनंद निर्माण होईल. आपण आपल्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पूर्ण करू शकाल. त्यामुळे घरातील सर्वांच्या संबंधित गरजा पूर्ण झाल्याने कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण राहील. आपले प्रयत्न यशस्वी होतील.
नोकरी व्यवसाय धंदा : दीर्घकाळ रखडलेली कामे या कालावधीमध्ये पूर्ण करू शकाल. विशेषतः कायदेशीर स्वरूपाची कामे पूर्ण होतील. कोर्टामध्ये चाललेली प्रकरणे व त्याचा निकाल आपल्या बाजूने लागल्यामुळे उत्साहात भर पडेल. नवीन कामे हाती घ्याल, पण अति आत्मविश्वास टाळा. अनेक माध्यमातून धनागमन होईल. शुभ ग्रहांची साथ नक्कीच मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या स्वभावातील दिखाऊपणा कमी करावा लागेल तसेच इतरांच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना मानाचे स्थान द्यावे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रासह कुटुंबात वादविवाद टाळून शांतता टिकवण्यासाठी प्रयत्न करायला हवा. आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात जास्तीचे काम करावे लागेल. नोकरीमध्ये दबावाखाली काम करावे लागण्याची शक्यता. मानसिक त्रास होऊ शकतो. आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे. अडथळे आणि समस्या जरी आपल्यासमोर आल्या तरी आपण आपल्या धाडस व आत्मविश्वासाने त्यातून यशस्वी मार्ग काढू शकाल. कष्ट घेण्याची प्रवृत्ती आपल्या कामी येणार आहे.
शुभ दिनांक : २,३,४,११,१३,१४,१८,१९,२१,२२,२६,२८,२९,३०
अशुभ दिनांक : ५,७,१५,१६,१७,२०
कन्या
‘फसवणुकीपासून सावध राहा’
कन्या रास ही अर्थत्वाची तसेच पृथ्वी तत्त्वाची ही रास आहे. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. कन्या रास ही सहाव्या स्थानाची द्योतक आहे. ही बौद्धिक राशी आहे. कन्या राशीचे चिन्ह कुमारी कन्या आहे. या राशीच्या जातकांना आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. कधी कधी इतरांच्या
सल्ल्याची आवश्यकता भासते. कार्यनिपुण, बुद्धिमान, विद्वान, असे जातक असतात. कन्या रास ही स्त्री राशी आहे. बंधुप्रिय, सात्विक, अनेक शास्त्र विचारत व सद्गुणयुक्त प्रमाणशीर शरीराचा असे जातकाचे वर्णन करता येईल. या राशीच्या जातकांची प्रकृती वातप्रकृती असते.
शिक्षण : सदरच्या कालावधीमध्ये आपल्याला अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. त्याचप्रमाणे सातत्य प्रयत्नपूर्वक ठेवावे लागेल. मन शांत ठेवून लक्ष केंद्रित करूनच अभ्यास करणे महत्त्वाचे ठरेल. इतरत्र वेळ वाया घालवू नये. अभ्यासासाठी पुरेसा वेळ देणे महत्त्वाचे ठरेल. म्हणजेच वेळेचे नियोजन उपयोगी पडेल. टेक्निकल शिक्षणात यश येणार आहे. परंतु आपले मन शांत ठेवले तर त्याचा जास्त उपयोग होईल. कला व क्रीडा क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे जरुरी ठरू शकते. त्याचप्रमाणे प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. म्हणजे अपेक्षित यश लाभेल.
पारिवारिक : परिवारात आपल्याला सध्याच्या काळामध्ये जास्त जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागण्याची शक्यता आहे. विशेषतः कुटुंबातील मुला-मुलींच्या गरजा वाढणार आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी जास्तीचा खर्च होऊ शकतो. त्याचप्रमाणे घरातील सदस्यांमध्ये लहानसहान कारणांवरून वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ज्या कारणांनी वादविवाद निर्माण होऊ शकतात अशा कारणांकडे प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. आर्थिक आवक चांगली राहणार आहे. त्यामुळे आपण सर्वांच्या गरजा पूर्ण करू शकाल. घरामध्ये समाधान राहील. त्याचप्रमाणे एखादे धार्मिक कार्यही घडू शकते. काही वेळेस धार्मिक ठिकाणी सहकुटुंब प्रवासाची शक्यता.
नोकरी-व्यवसाय-धंदा : आजूबाजूच्या वातावरणात अनुकूलता व्यापलेली अनुभवायला मिळेल. हातातली कामे अल्प प्रयत्नात होताना आढळून येतील. मोठे मजेदार ग्रहमान राहील. व्यवसाय-धंद्यात परिस्थिती उत्तम राहील, मात्र फसवणुकीची शक्यता आहे. कोणतेही लहान-मोठे व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे, तसेच कोणतीही नवीन लहान-मोठी गुंतवणूक करताना त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला उपयोगी पडेल. त्यामुळे तो घ्यायला विसरू नका. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. आपल्याला आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रात स्पर्धा निर्माण झालेली दिसेल. त्यामुळे आपले मन चिंतीत होण्याची शक्यता आहे, पण आपल्या कामांमध्ये सातत्य व नावीन्य ठेवले तर आपण स्पर्धेत जिंकू शकाल. हाती घेतलेले प्रत्येक काम प्रामाणिकपणे व वेळेवर करणे महत्त्वाचे राहील. वेळेचे नियोजन महत्त्वाचे ठरू शकते. मात्र कामाचं ताण येऊ शकतो. आपल्या कार्यक्षेत्रात लवचिक धोरण स्वीकारले तर त्रास खूपच कमी होईल.
शुभ दिनांक : २, ३, ४, ११, २१, २२, २३,२८,२९,३०
अशुभ दिनांक : ५,७,१५,१६,१७,२०