

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
कुंभ
मनासारख्या घटना घडतील
कुंभ राशीत धनिष्ठा शततारका व पूर्वा भाद्रपदा ही नक्षत्र समाविष्ट असतात. धनिष्ठ नक्षत्राचा आराध्य वृक्ष शमी आहे. शमीच्या झाडाला काटे असतात, तसेच त्या झाडाला शेंगा पण येतात. शमीची पाने गणपतीला व शंकराला वाहतात. छोट्या काड्या हवनाला समिधा म्हणून वापरतात तसेच यज्ञासाठी अग्नी उत्पन्न करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे याला अग्नी गर्भा असेही म्हणतात. शमीमुळे अमंगळाचे मंगळ होते. या झाडाची पाने, शेंगा, साल, मूळ जवळ बाळगल्याने धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना त्याचा फायदा होतो. या झाडाचे औषधी गुणधर्मही आहे. सतत तारका नक्षत्राचा आराध्य वृक्ष कळंब आहे. या वृक्षाला नीव व हरिप्रिया अशी नावे आहेत. हा वृक्ष सर्वत्र आढळतो. या वृक्षाची साल ज्वरनाशक असते. या झाडाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. शतकारका नक्षत्राच्या व्यक्तींना पंचांग म्हणजे या झाडाचे पान, फूल, फळ, साल, मूळ हे जवळ ठेवल्याने अथवा बाळगल्याने सकारात्मकता निर्माण होऊन त्या व्यक्तीची प्रगती होते. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आम्र म्हणजे आंबा आहे. आंब्याला फळांचा राजा मानतात. आंबा रुचकर तर असतोच त्याची गोडी अवीट असते. कच्चा आंबा म्हणजे कैरी. कैरीचे अनेक उपयोग आहेत तसेच आंब्याचाही अनेक कारणांसाठी उपयोग होतो. या झाडाच्या फळांचे, पाने, मुळे यांचा सुद्धा अनेक कारणांसाठी उपयोग होतो तसेच त्याच्यामध्ये औषधी गुण आहेत. या झाडाच्या पंचांगाला पूर्व भाद्रपदा नक्षत्राच्या जातकांनी उपयोगात आणले तर त्यांची सकारात्मकता वाढते व प्रगती होते.
शिक्षण : शिक्षणासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कला, क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी होऊ शकते तसेच साहित्य क्षेत्रातही चांगला वाव आहे. परदेशासंबंधीच्या शिक्षणासाठी मात्र जास्त प्रयत्नांची आवश्यकता आहे. योग्य प्रयत्नांनी चांगले यश प्राप्त करू शकाल. सर्वसाधारण ग्रहमान शिक्षणासाठी अनुकूलता प्रदान करत आहे.
पारिवारिक : कुटुंबात आपली जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे तसेच जास्तीची कामे सुद्धा करावी लागतील. आर्थिक निर्णयात सावधगिरी वाढवणे गरजेचे आहे, तसेच आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील. जास्तीच्या खर्चाने बचतीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. घरातील सर्व कामे पूर्ण वेळेत होण्यासाठी सातत्य राहिले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली राहील.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : काही शुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे अनुकूलतेमध्ये भर पडेल. आपल्या आजूबाजूला अनुकूलता व्यापलेली आढळून येईल. थोड्याच कष्टामध्ये आपली महत्त्वाची कामे पूर्ण होत आहेत हे बघून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे उत्साह व आनंद होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. नवीन कामे हाती घ्याल. त्याचा पाठपुरावा चांगला कराल. बरेच दिवस मनामध्ये एखादी अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण होईल. चालू नोकरीमध्ये अपेक्षित घटना घडतील. पदोन्नती, वेतन वृद्धी होऊ शकते.
शुभ दिनांक : ७, ९, २४, २६, ३०, ३१
अशुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १७, १८, २२, २३
मीन
अचानक धनलाभाची शक्यता
मीन राशीमध्ये पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा रेवती ही तीन नक्षत्रे येतात. उत्तरा भाद्रपदाच्या नक्षत्राच्या व्यक्तींनी कडुलिंबाच्या वृक्षाचे पंचांग जवळ बाळगल्यास उत्तम सकारात्मकता लाभून जातकाची प्रगती होते. रेवती नक्षत्राचे आराध्य वृक्ष मोह आहे. यास मोहवा असेही म्हणतात. या वृक्षाची फुले गोड व थंड प्रकृतीचे असतात. अंतर साल पोटातील विकारासाठी याचा उपयोग होतो. त्याचे अनेक औषधी उपयोग आहेत. मधुकर वृक्ष म्हणजे ज्येष्ठमध याचा उपयोग स्वरयंत्रावरती अत्यंत उपयोगी आहे. रेवती. नक्षत्राच्या व्यक्तींनी मोह वृक्षाचे पंचक पान, फूल, फळ, साल, मूळ जवळ ठेवल्यास सकारात्मकता मिळून प्रगती होते.
शिक्षण : शिक्षणासाठी या महिन्यातील ग्रहमान आपणास अनुकूल आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये आपण शिक्षण घेत असाल तर त्यामध्ये अनुकूलता राहील, मात्र आपले प्रयत्न त्या दृष्टिकोनातून जरूर हवेत. अभ्यासाचा कंटाळा टाळावा लागणार आहे. आळस झटकून अभ्यासासाठी चांगले प्रयत्न करण्याची गरज आहे. वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते. इतरत्र वेळ घालवू नका. शिवाय अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे राहील. योग्य प्रयत्नांना चांगले यश मिळेल. भाषा साहित्यात चांगले यश मिळेल. कला व क्रीडा क्षेत्रातही अपेक्षित यश प्राप्त करू शकाल. परदेशासंबंधी प्रयत्न यशस्वी होतील पण या सगळ्याला योग्य प्रयत्नांची साथ ही हवीच हे लक्षात ठेवा.
पारिवारिक : कुटुंबातील सदस्यांमध्ये वैयक्तिक मतभेद असू शकतात. त्यामुळे कुटुंबातील शांतता व स्थिरता काही वेळेस कमी जास्त होऊ शकते. त्यासाठी आपल्याला योग्य ते प्रयत्न करावे लागतील. जास्तीच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. काही कारणांनी खर्चामध्ये वाढ होणार आहे. खर्च वाढल्यामुळे आर्थिक नियोजनाची गरज भासू शकते. नियोजनाला महत्त्व द्या.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : या महिन्यात आपल्याला अचानक धनलाभाची शक्यता आहे. व्यावसायिक जुनी वादग्रस्त येणे वसूल होतील. पूर्वी कोणाला तरी दिलेली रक्कम परत मिळू शकते. भागीदारीच्या व्यवसायामध्ये भागीदाराबरोबर काही मतभेद झालेले असतील तर ते या कालावधीमध्ये संपुष्टात येतील व पूर्वीचे भागीदाराबरोबर असलेले नाते अधिक दृढ होईल. गैरसमज दूर होतील. भागीदारीच्या व्यवसायातील उत्पन्न वाढेल नवीन नवीन संकल्पना वापरू शकाल त्याचप्रमाणे स्पर्धकांवर मात करू शकाल महिन्याच्या पूर्वार्धा मध्ये शुभ ग्रहांच्या योगांच्यामुळे अनुकूलता दाटलेली असेल कुटुंब परिवारात मोठ्या सुवार्ता मिळतील विवाह योग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील राहत्या घराविषयी चे प्रश्न असल्यास सुटतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद लागतील तसेच वडिलोपार्जित संपत्ती विषयीचे प्रश्न संपुष्टात येतील. प्रवासात खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. अन्न पाण्यातील संसर्ग जपा त्याचप्रमाणे काही वेळेस विचित्र खर्चाचे प्रसंग उद्भवू शकतात त्याचप्रमाणे काही वेळा शारीरिक वेदना त्रास देऊ शकतात.
शुभ दिनांक : १, ५, १५, १९, २०, २४, २६, २७
अशुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १७, १८, २२, २३