

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण
मिथुन
सरकारी धोरणातून लाभ
मिथुन राशीमध्ये मृग अद्रा व पुनर्वसु नक्षत्र यांचा समावेश होतो. मृग नक्षत्राचा आराध्य वृक्ष खैर आहे. या झाडाचे पान, फूल, फळ, साल, मूळ हे जवळ ठेवल्यास जातकाचे आरोग्य व मानसिकता चांगली राहते. खैरवृक्ष औषधीही आहे. ही झाडे लावणे व संगोपन करणे हितकारी आहे. आद्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष कृष्णा गुरू आहे. हा वृक्ष कडू, तिखट, स्निग्ध गुणांनी युक्त आहे. या वृक्षाला अगोलाचा या नावानेही संबोधन दिले जाते. या वृक्षाचा अनेक छोट्या मोठ्या व्याधींवर उपयोग होतो. या झाडाची पाने, फुले, साल, मूळ यातील काहीही एक जवळ ठेवल्यास त्याने जातकाची प्रगती होते. पुनर्वसू नक्षत्राचा आराध्य वृक्ष वेळू आहे. वेळू या झाडाची पाने, फुले, मूळ व साल अर्थात वेळूची कांडे जवळ ठेवल्यास चांगले परिणाम प्राप्त होतात. आपल्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष जो असेल त्या वृक्षाचे पान, फळ, फूल, साल, मूळ जवळ ठेवल्याने सकारात्मकतेमध्ये भर पडते व प्रगती होते आरोग्यही चांगले राहते.
शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमधील शिक्षण घेण्यासाठी अनुकूल कालावधी आहे. प्रगती करू शकाल. ग्रहमान आपल्याला साथ देईल तसेच योग्य प्रयत्नांनाही चांगले यश प्राप्त होईल. कला व क्रीडा क्षेत्रातील जातकांची प्रगती होईल. नवनवीन संधी प्राप्त होतील. त्या संधींचा योग्य तो फायदा घ्या. आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. साहित्य क्षेत्रातील जातकांनाही अनुकूल कालावधी आहे. परदेशासंबंधी शिक्षणासाठी चांगले योग आहेत.
पारिवारिक : परिवारातील सदस्यांना आपले कार्य करण्यासाठी वेळ लागण्याची तसेच कंटाळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामात उशीर होण्याचा संभव आहे. अशा वेळेस कामाचे नियोजन करण्याची सक्त आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्हाला आपल्या अंगी शिस्त स्वीकारावी लागणार आहे. लहान मोठ्या कारणांनी कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद घडण्याची शक्यता, परंतु मन शांत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे घरातील शांतता टिकून राहू शकते. घरामध्ये शुभ वार्ता समजतील. घरातील वातावरण सुख व आनंद देईल. आर्थिक आवक चांगली राहील. त्यामुळे सर्व गरजा पूर्ण होतील, मात्र घरातील शांतता टिकवण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : बदलत्या सरकारी धोरणांमुळे व्यापार, व्यवसाय किंवा धंद्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे लाभ मिळू शकतात. नोकरीमध्ये परिस्थितीजन्य लाभ मिळतील. वेतनवृद्धी अथवा बढती मिळू शकते. मित्रमंडळींच्या वर्तुळामध्ये प्रिय व्हाल. नवनवीन ओळखी होतील. समाजातील सन्माननीय व्यक्तींचे सहाय्य मिळेल, त्याचबरोबर मार्गदर्शन व मदत मिळू शकते. व्यवसायासाठी त्याचा चांगला उपयोग होईल. व्यवसाय-धंद्यात प्रगती करू शकाल. व्यापार, व्यावसायिकांना नवीन पर्यायांमधून चांगले उत्पन्न मिळेल. आपल्या छंदातून चांगले उपक्रम हाती घ्याल. नोकरीत अपेक्षित कार्य होतील, प्रगती करू शकाल. कुटुंबात शुभ वार्ता मिळतील.
शुभ दिनांक : १, ५, ७,१९, २०, २६, २७,२८,२९,३०,३१
अशुभ दिनांक : २, ३, ४, १०, ११, १७,१८,२२,२३
कर्क
व्यावसायिक धनवर्षाव
कर्क राशीमध्ये पुनर्वसू पुष्य व आश्लेषा या नक्षत्रांचा समावेश होतो. पुनर्वसू नक्षत्राचा आराध्य वृक्ष वेळू हा आहे. पित्त, कफपासून होणाऱ्या त्रासासाठी या झाडाचा औषधी उपयोग होतो. याचे पंचांग म्हणजेच पान, साल, फळ, फूल, मूळ जवळ ठेवल्यास सकारात्मकता निर्माण होते. पुष्य नक्षत्राचा आराध्य वृक्ष पिंपळ आहे. पिंपळ वृक्षावर लक्ष्मीनारायणाचा वास असतो असे मानले जाते. पिंपळाच्या झाडाचे अनेक औषधी गुण आहेत. पिंपळाच्या छायेत गारवा असतो. त्याने एक प्रकारचे समाधान व शांतता लाभते. या नक्षत्राच्या व्यक्तींनी झाडाचे पान, साल, मूळ जवळ ठेवल्यास त्यांना सकारात्मकता मिळून प्रगती होते. आश्लेषा नक्षत्राचा आराध्य वृक्ष नागचाफा आहे. नागचाफ्याचा सुगंध मनमोहक असतो. मनाला प्रसन्नता देतो. विश्वज्वलावर या वृक्षाच्या सालीचा काढा काढून तो रुग्णाला देतात. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानेच याचा उपयोग करावा. या झाडाचे अनेक औषधी उपयोग आहेत. या झाडाचे पान, फूल, साल, मूळ जवळ ठेवल्यास अश्लेषा नक्षत्रांच्या व्यक्तींना नक्कीच फायदा होतो. ज्या त्या नक्षत्राच्या आराध्य वृक्षाचे त्या त्या व्यक्तींनी त्यांचे पंचांग जवळ ठेवल्यास सकारात्मकतेमध्ये वृद्धी होऊन चौफेर प्रगतीकडे वाटचाल होते.
शिक्षण : चालू कालावधीमध्ये काही वेळेस शिक्षण क्षेत्रात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपणास अभ्यासात सातत्य ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रामाणिक कष्ट करायला हवेत. प्रयत्न योग्य दिशेने करणे महत्त्वाचे ठरेल, शिवाय गर्दीत निर्णय घेऊ नयेत, शांतपणे व स्थिरतेने अभ्यासाची गरज आहे. अडचणींवर आपण मात करू शकाल. अभ्यास लक्षात राहण्यासाठी ध्यानधारणा करायला पाहिजे. कला व क्रीडा क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल तसेच परदेशासंबंधी शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळू शकते. त्यामध्ये परिवाराचा वाटा मोठा असेल.
पारिवारिक : कुटुंबात काही वेळेस आपल्याला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील. त्यासाठी थोडी आर्थिक ओढाताण सहन करावी लागेल. आपल्या कुटुंबात आईचे अथवा आईकडील नात्यातील व्यक्तींमध्ये आजारपणाची शक्यता आहे. त्यासाठी खर्च करावा लागेल. त्याचप्रमाणे स्वतःच्या जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. कोणत्याही लहान मोठ्या आजारपणाकडे दुर्लक्ष करू नये.
नोकरी-व्यापार-व्यवसाय : या महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपल्याला व्यावसायिक तेजी जाणवेल. पूर्वी केलेले नियोजन प्रत्यक्ष उतरेल. काही वेळेस बाहेरील व्यक्तींची मदत घ्यावी लागेल. अशी मदत घेणे व्यवसायासाठी पोषक ठरेल. व्यवसायामध्ये भागीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. व्यवसायामध्ये नवीन संकल्पनांचा वापर यशस्वी ठरून उलाढाल वाढेल. आपला व्यवसाय नवीन जागेत करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे व्यवसाय विस्तारासाठी अनुकूल कालावधी आहे.
शुभ दिनांक : १,७,१५,१९,२०,२४, २६,२७,२८,२९,३०,३१
अशुभ दिनांक : २,३,४,१०,११, १७, १८,२२,२३