नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे नोव्हेंबर महिना? जाणून घ्या...
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य
Published on: 

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

कुंभ

वास्तुयोग

कुंभ रास हीसुद्धा शनिमहाराजांची रास आहे. कुंभ राशीवर शनिमहाराजांची सत्ता असते. या राशीमध्ये धनिष्ठा, शततारका व पूर्वाभाद्रपदा ही नक्षत्रे येतात. धनिष्ठा नक्षत्राची देवता वसू आहे. त्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी ‘ॐ वसुदेवताय नमः’ या मंत्राचा नियमित जप करावा. शततारका नक्षत्राची देवता वरुण आहे. त्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्तींनी ‘ॐ वरुणाय नमः’ या मंत्राचा जप करावा. पूर्वाभाद्रपदा या नक्षत्राची देवता अजैकपाद आहे. त्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी ‘ॐ अजैकपादाय नमः’ या मंत्राचा जप करावा. वरील मंत्रांचा जप केल्यास जातकांना प्रगती साधता येईल. त्यांची कामे विनाविलंब पूर्ण होतील आणि जीवनात सुख निर्माण होईल.

शिक्षण : कुंभ राशीच्या जातकांना शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही विभागात शिक्षण घेण्यासाठी ग्रहमान अनुकूल आहे. कला व क्रीडा क्षेत्रातही अनुकूलता लाभेल. साहित्य क्षेत्रात तसेच बुद्धिजीवी वर्गातही चांगले यश संपादित करता येईल. स्पर्धा परीक्षांमध्येही विनाविलंब यश मिळण्याची शक्यता आहे. परदेशासंबंधीच्या शिक्षणासाठी मात्र अधिक प्रयत्न करावे लागू शकतात. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास त्यात यश मिळू शकते.

पारिवारिक : काही शुभ ग्रहांची साथ या कालावधीत आपल्याला मिळू शकते. त्याचा पूर्ण फायदा आपल्याला घेता येईल. कलाकारांचा भाग्योदय होईल. नवीन कामे मिळतील, नवीन करार होतील आणि प्रसिद्धी मिळेल. चालू नोकरीत प्रशंसेस पात्र ठराल. नवीन घराचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना अनुभवता येईल. वास्तुयोग आहेत. पैशाची सोय होऊ शकते; मात्र त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच नवपरिणितांचे प्रश्न सुटतील. कुटुंबातील मुला-मुलींसंबंधीची एखादी चिंता संपुष्टात येईल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील.

नोकरी, व्यवसाय, धंदा : या कालावधीत आपण पूर्वी केलेल्या कामाचे सकारात्मक आणि शुभ फळ मिळेल. निरनिराळ्या क्षेत्रांत आतापर्यंत मिळालेल्या काही प्रमाणातील अपयशामुळे जे नैराश्य येत होते, ते या कालावधीत संपुष्टात येईल. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपतील. त्यांना नवीन मार्ग मिळून मार्गस्थ होता येईल. त्याचप्रमाणे विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. विवाह ठरण्यातील अडचणी दूर होतील.

कुटुंबातील काही महत्त्वाचे निर्णय आपण योग्यरीत्या घेतल्यामुळे आणि ते बरोबर ठरल्यामुळे आपण प्रशंसेस पात्र ठराल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती करता येईल. गुरुजनांचे योग्य वेळी मार्गदर्शन मिळेल. त्याचप्रमाणे मदतही मिळू शकेल. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे मार्ग प्रशस्त होतील. नोकरीविषयक प्रश्न सुटतील. नोकरी मिळवण्यासाठी ओळखी आणि मध्यस्थांचा उपयोग होईल. मदत मिळेल. चालू नोकरीत आतापर्यंत केलेल्या कामाचे फळ मिळेल. अपेक्षित घटना घडू शकतात. पदोन्नती अथवा वेतनवाढ मिळू शकते. आपण केलेल्या कामाचे कौतुक होऊ शकते.त्यामुळे आपण प्रशंसेस पात्र ठराल. व्यवसाय-धंद्यातील उत्पन्न वाढल्यामुळे कर्जफेड करता येईल.

उत्तरार्धात कुसंगतीपासून अलिप्त राहा. कुसंगतीमुळे आपण विनाकारण अडचणीत येऊ शकता. त्याचप्रमाणे चालू प्रेमप्रकरणात गैरसमज निर्माण होऊन मनःस्वास्थ्य बिघडू शकते किंवा विरोध वाढून त्रास होऊ शकतो. त्यामुळे मर्यादा पाळणे क्रमप्राप्त ठरेल.

दाम्पत्य जीवनात जीवनसाथीचा पूर्ण सहयोग मिळेल. जीवनातील प्रत्येक वळणावर आपल्याला जीवनसाथीची साथ मिळेल. उभयतांमधील भावनिक जवळीक वाढेल. कुटुंबातील इतर सदस्यांचेही वाढत्या प्रमाणात सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद आणि उत्सवाचे वातावरण राहील.

शुभ दिनांक : ३,१०,१२,२१,२५,२६,२९

अशुभ दिनांक : ५,७,९,१३,२०,२२,२४,२७, ३०

नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा कुंभ आणि मीन राशीचे भविष्य
नोव्हेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य

मीन

संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान

मीन रास ही गुरूची रास आहे. गुरूचे कारकत्व या राशीवर असते. मीन राशीमध्ये पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती अशी तीन नक्षत्रे येतात. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राची देवता अजैकपाद असल्यामुळे या नक्षत्राच्या जातकांनी ‘ॐ अजैकपादाय नमः’ या मंत्राचा जप करावा. उत्तराभाद्रपदा नक्षत्राची देवता अहिर्बुध्न्य आहे. त्यामुळे या नक्षत्राच्या व्यक्तींनी ‘ॐ अहिर्बुध्न्याय नमः’ असा जप करावा. रेवती नक्षत्राची देवता पूषा आहे. म्हणून या नक्षत्राच्या जातकांनी ‘ॐ पूष्णे नमः’ या मंत्राचा नियमित जप करावा. नियमित जप केल्यास उत्तम फलप्राप्ती होते आणि जीवन सुखमय होते.

शिक्षण : सध्याचा कालावधी मिश्र स्वरूपाच्या ग्रहमानाने व्यापलेला असल्यामुळे कष्टाशिवाय पर्याय नाही. परंतु या कष्टांचे चांगले फळ मिळण्यासाठी प्रामाणिकपणाही तेवढाच गरजेचा आहे. अधिक कष्ट करावे लागतील. त्याचप्रमाणे परिश्रमातील निष्काळजीपणा नुकसानीस कारणीभूत ठरू शकतो, हे लक्षात ठेवावे आणि योग्य दिशेने प्रयत्न करत राहावेत. अभ्यासावर मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करावा. इतरत्र वेळ वाया घालवू नये. इतर गोष्टींकडे लक्ष विचलित होऊ देऊ नये. तसेच कुसंगतीपासून अलिप्त राहणे गरजेचे आहे. कला व क्रीडा क्षेत्रातही अधिक सराव करणे आणि संधीची वाट पाहणे महत्त्वाचे ठरेल. परदेशी शिक्षणाच्या बाबतीत इतरांची मदत उपयोगी पडू शकते.

पारिवारिक : या कालावधीत आपल्याला चांगलेच सावध राहणे आवश्यक आहे. कोणताही लहान-मोठा निर्णय घेताना शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे. विशेषतः आर्थिक बाबतीत वेळ पडल्यास तज्ज्ञांचा सल्लासुद्धा घ्यायला हरकत नाही. इतरांचे मार्गदर्शन उपयोगी पडू शकते. विशेषतः खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये फसवणुकीची शक्यता आहे. तसे प्रसंग घडू शकतात. त्यामुळे विशिष्ट प्रकारचे नुकसान होऊ शकते.

मात्र, न्यायालयीन प्रकरणे सुरू असतील, तर त्यांचा निकाल आपल्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिलासा मिळू शकतो. वादग्रस्त वसुली होऊ शकते. परंतु कुटुंबात नातेवाइकांबरोबर वादविवाद टाळणे हिताचे ठरेल. त्याचप्रमाणे स्वतःच्या आरोग्याची आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. भाऊबंदकीचे प्रश्न जपून हाताळावे लागतील.

नोकरी, व्यवसाय, धंदा : आपल्या कार्यक्षेत्रात, व्यवसाय-धंद्यात तसेच नोकरीत आतापर्यंत केलेल्या कष्टांचे चीज होईल. आतापर्यंत जे आर्थिक प्रश्न भेडसावत होते, ते आता सुटतील. जीवनात आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. जुन्या गुंतवणुकी भरघोस आर्थिक फायदा मिळवून देऊ शकतात. नवीन गुंतवणूक करण्यासाठीही अनुकूलता आहे. शेअर बाजार आणि सट्टाबाजाराशी संबंधित व्यवहारांमध्ये फायदा होऊ शकतो.

व्यावसायिकांची जुनी आणि दीर्घकाळ रखडलेली येणी वसूल होतील. त्यामुळे व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल.

व्यवसायात भांडवली खर्च करू शकाल. परिणामी, उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणातही वाढ होईल. भागीदारांचे उत्तम सहकार्य मिळेल. त्यामुळे उत्पन्नातही वृद्धी होईल. व्यावसायिकांना मोठी तेजी अनुभवता येईल.

ज्या जातकांचे वास्तुविषयक प्रश्न असतील, ते सुटतील. तसेच ज्यांनी स्वतःच्या मालकीच्या घराचे स्वप्न पाहिले आहे, त्यांचे स्वप्न साकार होईल. मात्र, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे आवश्यक आहे. पैशाची सोय निश्चितपणे होईल.

कुटुंबात तरुण-तरुणींचे प्रश्न सुटून वैयक्तिक आयुष्यात मोठ्या सुवार्ता मिळतील. त्याचप्रमाणे विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाह ठरण्यातील अडचणी दूर होतील आणि विवाह निश्चित होतील. कुटुंबातील मुला-मुलींचा भाग्योदय होईल.

मात्र, उत्तरार्धात नोकरीविषयक काही चिंता निर्माण होऊ शकतात. अस्वस्थता जाणवू शकते. बदलीची टांगती तलवार निर्माण होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या आरोग्याची चिंता निर्माण होऊ शकते. त्यामुळे दक्षता घेणे अपरिहार्य ठरेल. खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. तसेच प्रवासात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करणे हिताचे ठरेल.

शुभ दिनांक : १,२,१०,१२,१६,२१,२५,२६,२९

अशुभ दिनांक : ५,७,९,१३,२०,२२,२४,२७,३०