ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य

तुमच्यासाठी कसा आहे ऑक्टोबर महिना? जाणून घ्या...
ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य
Published on: 

डॉ. सविता महाडिक, ज्योतिष भूषण

सिंह

ग्रहमानाची उत्तम साथ मिळेल

सिंह राशीवर रवी या ग्रहाची सत्ता चालते. अर्थात सिंह रास ही रवी ग्रहाची रास आहे. रवी ग्रहाचे कारकत्व या राशीवर असते. त्याचप्रमाणे सिंह रास ही स्थिर रास आहे. सिंह रास असलेल्या व्यक्तींना जास्त फिरण्याची आवड नसते. वास्तू अथवा दिवस स्थान ती स्थिर ठेवण्याच्या प्रयत्नात असतात. शक्यतो त्यामध्ये बदल करत नाहीत.

शिक्षण : शिक्षणासाठी ग्रहमान अतिशय चांगले आहे. त्यामुळे केलेले कष्ट फलदायी ठरतील म्हणून कष्ट अथवा परिश्रमामध्ये मागे राहू नका, कंटाळा करू नका, आळस झटका, वेळेचे महत्त्व ओळखून इतरत्र वेळ वाया घालवू नका. अभ्यासाला पूर्ण वेळ देणे अति आवश्यक आहे. वेळेचे नियोजन उपयोगी पडू शकते. शिस्तबद्धतेमध्ये कचराई करू नका. असे केल्यास आपणास चांगले यश प्राप्त होऊ शकते. कला व क्रीडा क्षेत्रात चांगले यश मिळेल.केलेल्या कष्टाचे चांगले फळे मिळेल. आपली ग्रहण क्षमता चांगली राहील. त्यामुळे स्पर्धा परीक्षेतही चांगले यश मिळवता येईल. परदेशासंबंधीच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरवून अपेक्षित यश मिळवू शकाल.

पारिवारिक : या चालू कालावधीमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे आहे. कोणतेही लहान-मोठे आर्थिक निर्णय घेताना ते पूर्ण विचारांती घेणे आवश्यक आहे. घाईगर्दीमध्ये निर्णय घेऊ नका. चुकण्याची शक्यता भरपूर आहे. गरज वाटल्यास कुटुंबातील किंवा परिवारातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या. त्यांचे मार्गदर्शन उपयोगी पडू शकते. कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. आपली क्षमता ओळखा. जोखमीचे आर्थिक व्यवहार करू नका. ते अंगाशी येऊ शकतात. त्याचप्रमाणे आर्थिक मध्यस्थी टाळा. कोणालाही जामीन वगैरे राहू नका. विवाहविषयक समस्या सुटल्यामुळे तरुण-तरुणींचे विवाह ठरतील. ग्रहमान उत्तम साथ देईल. कलाकारांना सदरच्या कालावधीमध्ये आपली कला सिद्ध करण्यासाठी उत्तम संधी प्राप्त होतील. त्यांना उत्तम वाव मिळेल. त्याचप्रमाणे सहकुटुंब देवदर्शनाचे योग घटीत होत आहेत. कुटुंबात असलेली पुत्रचिंता संपुष्टात येईल. शुभवार्ता समजल्यामुळे वातावरण समाधानकारक व आनंदी राहील, मात्र फसवणुकीच्या प्रसंगापासून सावध राहा.

नोकरी, व्यवसाय व धंदा : या महिन्यातील ग्रहमान अनुकूल राहील. वेळ आणि दैव आपल्या बाजूने उभे राहणार आहे. पुढे भाग्य आपल्याला साथ देईल. आपण ज्या ज्या क्षेत्रात हात घालाल तेथे यश मिळेल. त्याचप्रमाणे तुम्हाला केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. परिस्थितीजन्य लाभ होतील. अनेक मार्गांनी धनलाभ होईल. काही अनपेक्षित चांगल्या घटना घडल्यामुळे आपल्या कुटुंबात तसेच आपल्या व्यवसाय क्षेत्रात समाधानाचे वातावरण अनुभवण्यास मिळेल. चालू नोकरीमध्ये काही आर्थिक फायदे होतील. तुमच्या व्यक्तिगत संबंधांमध्ये वृद्धी होणार आहे. नवनवीन संधीचा लाभ झाल्यामुळे आपले प्रयत्नही जास्तीत जास्त होतील. कौटुंबिक आयुष्यात समतोल राखू शकाल. आपणास चांगले उत्पन्न व लाभ मिळेल.

शुभ दिनांक : 1,4,7,12,16,20,21,26,29

अशुभ दिनांक : 2,8,9,10,11,13,15,17,27,28

ऑक्टोबर महिना कसा जाईल? बघा सिंह आणि कन्या राशीचे भविष्य
आजचे राशिभविष्य, ३ ऑक्टोबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

कन्या

मित्रमंडळींच्या वर्तुळातून लाभ

कन्या राशीचा स्वामी बुध आहे. म्हणजेच बुध ग्रहाचे कारकत्व या राशीवर असते. ही रास द्वीस्वभाव, तसेच बुद्धीची रास आहे. कन्या रास असलेल्या व्यक्तींमध्ये कधी कधी बोलणे व वागणे यामध्ये ताळमेळ नसतो. सतत त्यांचे मतपरिवर्तन होत असते. कोणत्याही एका निर्णयावर ठाम राहत नाहीत. अनेक विषयांचे थोडे थोडे ज्ञान असल्यामुळे ते कोणत्याही विषयावर बोलू शकतात. एखादे काम मी करीन असे म्हटल्यावर ते पूर्ण होण्याची शक्यता कमी असते.

शिक्षण : शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही शाखेमध्ये शिक्षण घेण्यासाठी अनुकूल कालावधी निर्माण झालेला आहे. कला व क्रीडा क्षेत्रात अनुकूलता लाभल्याने आपले कर्तृत्व आपल्याला सिद्ध करता येईल, पण त्यासाठी परिश्रमाची आवश्यकता आहे हे लक्षात ठेवावे. नवनवीन संधी उपलब्ध होतील, परंतु अभ्यासामध्ये सातत्य ठेवणे आपल्या हातात आहे हे लक्षात ठेवणे तितकेच महत्त्वाचे राहील. कुसंगत टाळणे तसेच व्यसनांपासून दूर राहणे अत्यावश्यक ठरेल. परदेशातील शिक्षणासाठी सुद्धा अनुकूल कालावधी आहे. केलेले प्रयत्न यशस्वी ठरवून अपेक्षित यश मिळवू शकाल. स्पर्धा परीक्षेत सुद्धा चांगले यश मिळू शकते. गुरुजनांचे तसेच कुटुंबातून आपल्याला चांगले सहकार्य मिळेल. योग्य प्रयत्न योग्य दिशेने करणे आपल्या हाती आहे हे लक्षात ठेवावे.

पारिवारिक : आर्थिक परिस्थिती चांगली राहिल्यामुळे परिवारातील सर्व सदस्यांच्या वाढत्या मागण्या आपण वेळेसच पूर्ण करू शकाल. घरामध्ये एखादी उंची खरेदी होईल. घरातील भौतिक सुखसुविधा वाढवण्याकडे आपला कल असेल. त्यासाठी मनसोक्त खर्च कराल. त्याचप्रमाणे जुने वाहन बदलून नवीन वाहन खरेदी करू शकाल. व्यवसाय, धंद्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत चांगले ग्रहमान असल्याकारणाने व्यवसाय अत्यंत उत्तम चालेल. व्यावसायिक तेजी अनुभवता येईल. व्यवसायातील उलाढाल वाढून नफ्याचे प्रमाण वाढेल. आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. स्वतःसाठी तसेच घरातील इतर सदस्यांसाठी सुद्धा खर्च कराल. व्यवसायातील उपक्रम यशस्वी होतील, तसेच मित्रमंडळींकडून निरनिराळ्या प्रकारे लाभ मिळतील, मात्र आपल्या आरोग्याकडे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याकडे वेळेतच लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरू शकते. अन्नपाण्यातील संसर्गापासून जपा. चालू नोकरीमध्ये अपेक्षित घटना घटीत होऊ शकतात. भरतीची चाहूल लागू शकते.

नोकरी, व्यवसाय व धंदा : चालू महिन्यामध्ये आपल्याला कार्यक्षेत्रातून तसेच नोकरी, व्यवसाय, धंद्यातून निरनिराळ्या लाभांनी लाभार्थी होता येईल तसेच सरकारी योजनांचा फायदा मिळेल. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणाशीही वाद घालू नका. कुटुंबात तसेच आपल्या व्यवसाय कार्यक्षेत्रात या गोष्टी पाळणे महत्त्वाचे ठरेल. कुटुंबातून आपल्याला सर्व प्रकारचे सहाय्य उपलब्ध होईल. आपल्याला सर्व कार्यात सहज यश प्राप्त होईल. प्रवास फलदायी ठरतील. व्यवसाय, धंद्यात जर आर्थिक मदत लागली तर ती मिळू शकते.

शुभ दिनांक : 1,4,12,16,20,26,29

अशुभ दिनांक : 2,8,9,10,11,13,15,17,27,28

logo
marathi.freepressjournal.in