

दुसरी बाजू
प्रकाश सावंत
प्रतिभावंत गायकांनी भारतीय संगीतविश्व व्यापलेले असतानाच, त्या प्रभावळीत आपले स्वत:चे स्वरतारांगण निर्माण करून मागील आठ दशके संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजविले आहे, ते स्वरतपस्विनी आशा भोसले यांनी. त्यांचा हा सांगीतिक प्रवास त्यांच्या गाण्याइतकाच प्रवाही, अलवार, अमीट, चैतन्यमयी, गौरवांकित आणि चिरंतन आहे.
गेशकर घराण्याचा अलौकिक सांगीतिक वारसा लाभलेल्या आशा भोसले यांनी आपल्या वैविध्यपूर्ण स्वरशैलीने शब्दांना स्वरसाज चढवून भावनांना अर्थ प्राप्त करून दिला. स्वरांशी भावनिक नाते जोडले. त्यांचा जीवनप्रवास म्हणजे संगीतविश्वातील विविध प्रवाहांचा, प्रयोगांचा आणि काळानुरूप झालेल्या बदलांचा एक जिवंत दस्तावेज आहे.
‘नाच रे मोरा’, ‘गोरी गोरी पान’, ‘झुकझुक झुकझुक आगीन गाडी’, ‘एका तळ्यात होती’ या बालगीतांमधून त्यांनी लहान मुलांच्या निरागस भावविश्वात शिरून साऱ्यांनाच स्वरमोहिनी घातली. ‘त्यांच्या स्वरातील अल्लडपणा मनाला थेट स्पर्शून जातो. भावगीतांमधून त्यांची शब्दांवरील हुकूमत व शब्दमाधुर्यच लक्षात येत नाही, तर त्या गीताचे अर्थही मनाला भिडतात. आवाजाचा पोत बदलून तो लय, ताल, वेग, आवेगानुरूप मृदू करणे किंवा त्यात धार आणणे हे कसब त्यांच्याकडे निसर्गदत्त होते. ‘जीवलगा राहिले रे दूर घर माझे’ किंवा ‘का रे दुरावा’ यांसारखी गाणी ऐकताना त्यांच्या स्वरातील विरह इतका जिवंत वाटतो की, ऐकणाऱ्याची तहानभूक हरपते. ‘धुंदी कळ्यांना’, ‘मलमली तारुण्य माझे’, ‘तरुण आहे रात्र अजूनी’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘चांदण्यात फिरताना’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘का रे दुरावा, का रे अबोला, ‘एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी’ या गाण्यांनी मराठी मनावर जे गारुड केले आहे, ते शब्दातीत आहे.
ज्ञानेश्वरांची विराणी असो किंवा संत जनाबाईंचे अभंग, त्यांच्या स्वरातील सात्विकता मनाला एका वेगळ्याच शांततेच्या आणि मांगल्याच्या प्रदेशात घेऊन जाते. ‘कानडा वो विठ्ठलू कर्नाटक’सारखे गीत गाताना त्यांच्या आवाजात जो असीम भक्तिभाव आणि आदर जाणवतो, तो ऐकताना जणू आपण प्रत्यक्ष पंढरीच्या विठ्ठलासमोर उभे आहोत, असा भास होतो. त्यांच्या आवाजातील कंपने एखाद्या मंदिरातील पवित्र घंटानादासारखी वाटतात, जी मनातले द्वंद्व शमवून मनशांतीचा, मनतृप्तीचा आनंद देतात.
‘उमराव जान’ सिनेमामधील त्यांच्या गजलांनी भारतीय संगीतात एक सुवर्ण अध्याय लिहिला, जो आजही अभ्यासाचा विषय आहे. आशाताईंच्या आवाजातील ती नजाकत आणि तमीज इतकी सुरेख मिसळली आहे की, त्या गझला आजही उच्च दर्जाच्या अभिजात संगीताचे सर्वात मोठे जागतिक उदाहरण मानल्या जातात. ‘दिल चीज क्या है’, ‘इन आँखों की मस्ती’मधील प्रत्येक शब्दाचा उच्चार हा एखाद्या मोत्यासारखा तेजपूंज आहे. गजलेतील तो मखमली स्पर्श आणि विरहाची ती हळुवार धग, उर्दू शब्दांमधील ते गांभीर्य आणि भावनांची गुंफण त्यांनी ज्या कौशल्याने केली आहे, ते निव्वळ लाजबाब. त्याचवेळी ‘निगाहे मिलाने को जी चाहता है’सारख्या कव्वालीमधून त्यांची ठाम आणि रोखठोक गायकी दिसून येते, जिथे त्या सुरांशी खेळताना दिसतात. शब्दांची अदब राखत सुरांची नजाकत पेशकश हीच त्यांच्या अजोड कलेची ओळख आहे.
आशाताईंनी चित्रपट संगीतात जे चैतन्य निर्माण केले, तो खऱ्या अर्थाने सुरांचा एक मोठा झंझावात होता, ज्याने जुन्या परंपरा मोडीत काढल्या. ओ. पी. नय्यर यांच्या ठेक्यातील गाण्यांपासून ते आर. डी. बर्मन यांच्या पॉप आणि रॉक संगीत संस्कृतीपर्यंत, आशाताईंनी प्रत्येक शब्दलयीवर स्वार होत त्यावर आपली स्वतंत्र मोहोर उमटवली आहे. ‘पिया तू अब तो आजा’ किंवा ‘दम मारो दम’सारख्या गाण्यांमधून त्यांनी पाश्चात्य संगीताचा जो आधुनिक बाज भारतीय रसिकांसमोर मांडला, तो आजही तितकाच ताजा, टवटवीत आणि अवीट वाटतो. अभिनेत्री हेलनच्या नृत्याला जेव्हा त्यांचा आवाज लाभतो, तेव्हा तो केवळ पडद्यावरील अभिनय उरत नाही, तर तो सुरांचा एक जिवंत नृत्याविष्कार ठरतो. एखादी अभिनेत्री पडद्यावर जे काम आपल्या चेहऱ्याने आणि डोळ्यांनी करते, तेच काम आशाताई आपल्या गळ्याने आणि श्वासाने करतात, हेच त्यांच्या सांगीतिक यशाचे सर्वात मोठे गमक आहे.
ज्या काळात चित्रपटसृष्टीत नायिकेने केवळ साचेबद्ध, गंभीर आणि हळवी गाणी गावीत असा एक अलिखित संकेत होता, त्या काळात आशाताईंनी आपल्या आवाजातील ‘नखरा’ आणि ‘अदा’ वापरून संगीतात एक नवे धाडस आणले. ‘रात अकेली है’ किंवा ‘चुरा लिया है तुमने’मधील त्यांच्या आवाजातील ते श्वास, त्या मुरक्या आणि शब्दांना दिलेला नजाकतभरा पीळ हे सर्व त्यांच्या अफाट स्वरप्रतिभेचे अलौकिक लेणे आहे. त्यांनी रिमिक्सच्या आधुनिक काळातही आपले अढळपद कायम राखत नव्या पिढीच्या संगीतकारांनाही आपल्या जादुई स्वरांची भुरळ घातली. आशाताई म्हणजे सुरांच्या विश्वातील एक असे विद्यापीठ आहे, जिथे केवळ तंत्रापेक्षाही भावनेला, अभिव्यक्तीला आणि सतत शिकण्याच्या वृत्तीला अधिक महत्त्व दिले गेले आहे. आशा भोसले यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांची गायकी नेहमीच चिरतरुण आणि उत्साही राहिली आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर त्यांच्या आवाजात थकवा जाणवला नाही, उलट तो काळानुसार अधिक तजेलदार, धारदार आणि प्रगल्भ होत गेला आहे.
मराठी मातीतील भारुड, पोवाडा, गोंधळ, कोळीगीते आणि लावणी यांसारख्या पारंपरिक कलाप्रकारांना त्यांनी आपल्या आवाजाचा साज चढवून जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. ‘बुगडी माझी सांडली गं’ किंवा ‘या रावजी’सारख्या लावण्यांमधील तो ठसका, ती लचक आणि ‘रेशमाच्या रेघांनी’मधील नजाकत आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. लोकसंगीत, सुगम संगीत आणि शास्त्रीय संगीत या तिन्ही प्रवाहांना त्यांनी आपल्या सुरांच्या त्रिवेणी संगमात इतक्या सहजतेने सामावून घेतले आहे की, ते ऐकताना मन केवळ मंत्रमुग्ध होत नाही, तर एका दिव्य स्वरप्रतिभेच्या अनुभूतीने भारून जाते.
मंगेशकर घराण्याच्या या लेकीने आपल्या अलौकिक स्वरकर्तृत्वाने संगीताच्या दरबारात स्वतःचे एक अढळ, अजेय आणि अद्वितीय सिंहासन निर्माण केले आहे. आशा भोसले यांच्या गायनाचा हा देदीप्यमान प्रवास म्हणजे एका महान भारतीय संगीत परंपरेचा आणि स्त्रीशक्तीच्या अतूट चिकाटीचा, जिद्दीचा, मेहनतीचा सन्मान आहे. जोपर्यंत या जगात संगीत राहील, तोपर्यंत आशा भोसले यांचे हे चैतन्यमयी स्वर विश्वाच्या कानाकोपऱ्यात घुमत राहतील. त्यांचे प्रत्येक गाणे आपल्या जगण्याला एक नवा अर्थ आणि नवी उमेद देत राहील. ही स्वरतपस्विनी केवळ एका पिढीची नाही, तर ती येणाऱ्या अनंत काळाची सांगीतिक सोबती आहे. त्यांच्या आठ दशकांच्या प्रवासात त्यांनी जे अजरामर स्वरनक्षत्रांचे अनमोल देणे जगाला दिले आहे, ते मानवजातीसाठी सदैव प्रेरणादायी ठरेल. अशा या ऋषितुल्य स्वरतपस्विनीला मानाचा मुजरा!
prakashrsawant@gmail.com