

महेश्वरी
डॉ. महेश केळुसकर
मराठी साहित्यातील प्रस्थापित संकेतांना छेद देत महानगरीय वास्तव आणि उपेक्षितांचे जगणे परखडपणे मांडणारे बंडखोर लेखक भाऊ पाध्ये यांचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. 'वासूनाका' फेम या सिद्धहस्त लेखकाने पत्रकारिता आणि साहित्यातून समाजातील विदारक सत्ये आणि मानवी संघर्षाचा अनन्यसाधारण दस्तावेज मागे ठेवला आहे.
१९४५ ते १९५३ या काळात जे १ नवशक्ति चे संपादक होते त्यांचं नाव प्रभाकर आत्माराम पाध्ये आणि सध्या ज्यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे ते 'वासूनाका' वाले पाध्ये म्हणजे भाऊ पाध्ये. हे भाऊ पाध्ये म्हणजे प्रभाकर नारायण पाध्ये. भाऊंनीही 'नवशक्ति'मधून दहा वर्षे पत्रकारिता केली. पण ते काही 'नवशक्ति'चे संपादक नव्हते. अधिक करून 'नवशक्ति'मधून त्यांनी फिल्मी पत्रकारितेला उठाव दिला. भाऊंनी 'हिंद मजदूर', 'नवाकाळ', 'झूम' साप्ताहिक आदी वृत्त नियतकालिकांमधूनही खूप पत्रकारिता केली. पण भाऊ पाध्ये गाजले ते बंडखोर लेखक म्हणून. १९६० आणि ७०च्या दशकातील मुंबईच्या बकाल बेरोजगार पिढीला, अभावग्रस्तांना, तुच्छता आणि बदनामी वाट्याला आलेल्यांना ज्यांनी सखोल सहानुभावानं आणि सहृदयतेनं आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून समजून घेतलं, असे त्या काळामध्ये दोनच लेखक सर्वात वादग्रस्त आणि वाचकप्रिय होते- ते म्हणजे हिंदी-ऊर्दूमध्ये 'सआदत हसन मंटो' आणि मराठीत फक्त 'भाऊ पाध्ये.'
भाऊ पाध्येंचा जन्म झाला २९ नोव्हेंबर १९२६ रोजी दादर मुंबई येथे. अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता आणि प्रतिभा लाभलेला हा एक साहसी लेखक होता. मुंबई विद्यापीठाची अर्थशास्त्रामधली पदवी १९४८ साली उच्च गुणवत्तेने प्राप्त केलेले भाऊ पाध्ये त्या काळात एखाद्या मोठ्या बँकेमध्ये लठ्ठ पगाराच्या अधिकारी पदावर पोहोचले असते. पण त्यांनी झोकून दिलं कामगार चळवळीत. १९४९ ते ५१ या काळात त्यांनी कामगारांच्या अनेक प्रश्नांसाठी लढाई दिली. लेखनाचा नाद भाऊंना पूर्वीपासूनच होता. १९६० साली कामगार चळवळीमधल्या आपल्या अनुभवांवर आधारित भाऊंनी आपली पहिली कादंबरी 'डोंबाऱ्याचा खेळ' प्रसिद्ध केली. त्यानंतरच्या २० वर्षांमध्ये भाऊंच्या तब्बल दहा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आणि त्यामधून परिवर्तनवादी बंडखोर विचारधारेचा झेंडा भाऊंनी फडकत ठेवला. तत्कालीन मराठी साहित्यामध्ये सुसंस्कार, नैतिकता, पारंपरिक मूल्ये, उपदेश आणि बोध यांचा खूप बोलबाला होता. त्या सगळ्याला नकार देऊन भाऊंमधला लेखक थेट जगण्यातल्या वास्तवाशी भिडला. रोजच्या आयुष्यात संघर्ष करणारी, दोन देत-दोन घेत जगत राहणारी, प्रसंगी पराभूत होणारी, स्खलनशील होणारी, पण व्यवस्थेच्या खोटेपणाशी ढोंगबाजीशी पंगा घेणारी प्रामाणिक माणसं भाऊ पाध्येंनी आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून आणली. 'वैतागवाडी' मधला घराची समस्या असणारा कारकून सोहनी, 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर'मधला वकिली बंद करून जगण्यातल्या खरेपणाचा शोध घेऊ पाहणारा तरुण अनिरुद्ध, 'राडा'मधला बापाच्या श्रीमंतीवर लाथ मारून सहज नैसर्गिक जगू पाहणारा मंदार अण्णेगिरी या सगळ्या नायकांच्या जीवनचित्रांमधून भाऊ पाध्येंनी मराठी साहित्याला जीवनसन्मुखतेकडे वळवलं.
१९६५ साली 'वासूनाका' ही कादंबरी आल्यावर तर भाऊंच्या बाजूने आणि विरोधात एकच राळ उठली. या कादंबरीत झोपडपट्टीतली बकाल वस्तीत मवालीगिरी करणारी, वासनापूर्तीसाठी हपापलेली आणि त्यातच जगण्याचा आधार शोधणारी नाक्यावरच्या पोरांची एक गँग आहे. यातली व्यवस्थेशी टक्कर घेणारी मुंबईची चकल्लस भाषा भाऊंच्या आधी आणि नंतरही कोणी आजतागायत वापरलेली नाही. साहित्यातील भाषा विषयक सगळ्या संकेतांना भाऊंनी फाट्यावर मारलं आणि त्या पोरांच्या जगण्याची जी भाषा होती त्याच भाषेत जीवनातील भयाण आणि कुरूप बाजूचं दर्शन घडवलं.
भाऊ पाध्ये यांची भाषा आणि कथन शैली सर्वसामान्य लोकांना जवळची वाटत असली तरी त्यांची कलात्मक उद्दिष्टं ही बहुरंजनवादी किंवा करमणूक प्रधान नव्हती. भाऊंच्या वाङ्मयात व्यक्त झालेली जीवनसत्ये अस्वस्थ करणारी, सामाजिक व्यवस्थेतल्या पिळवणुकीवर बोट ठेवणारी, मानवी विकृतीचं दर्शन घडवणारी अशी क्लेशदायक सत्ये आहेत. त्यावेळच्या मध्यमवर्गीय वाचकांमध्ये भाऊ पाध्येंच्या कथा आणि कादंबऱ्या फारशा प्रिय झाल्या नाहीत. उलट भाऊ पाध्ये वाचणं म्हणजे अभिरुचीहीन, अशा प्रकारचं कथन पसरविण्यात आलं होतं. याचं कारण म्हणजे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ वर्गीय माणसांच्या दैनंदिन जीवनातली हिंसा, त्याच्या वाट्याला येणारं वैफल्य, त्याच्या आयुष्याची वास्तविक व्यवस्थेत होत असलेली परवड याचीच जाणीव भाऊ पाध्ये करून देतात. त्यांच्या कादंबऱ्यांमधून महानगरातल्या जगण्याचा सर्वांगीण भकासपणा आणि निरर्थकता प्रकट होते. महानगरीय वाचकांना वास्तवाची इतकी भेसूर जाणीव सोसत नसते. त्या वास्तवापासून पलायन करण्यासाठी मध्यमवर्गीय वाचकाला, भूल पाडणारी खोटी मधाळ भाषा आणि तशाच कथा-कादंबऱ्या दिलासा म्हणून हव्या असतात. भाऊंनी नेमकं याच्या उलट असं लेखन केलं आणि स्वतःला लिहायचं तेच लिहिलं, जे मराठी वाङ्मयाच्या इतिहासात काळाचा दस्तावेज म्हणून नोंद झालं.
भाऊ पाध्ये यांच्या साहित्यातील स्त्रीविश्वाचं चित्रण हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल. स्त्रीचं अमुक एक वर्तन चांगलं आणि तमुक वर्तन वाईट असा भेदभाव करून भाऊ आपल्या कथा-कादंबऱ्यांमध्ये स्त्रिया आणि त्यांचे जीवन रंगवत नाहीत. तर जे काही घडतं ते जसंच्या तसं मांडत, स्त्री ही सुद्धा एक माणूस आहे हे लेखक म्हणून भाऊ सांगू पाहतात. एका विशाल मानवतावादी व्यापक सहानुभवानं ते स्त्रीच्या जगण्याचं संपूर्ण आकलन मांडतात. भाऊ पाध्ये हे बहुआयामी असे समग्रपणा कवेत घेणारे लेखक होते. आपल्या भाषेमधून त्यांनी प्रस्थापित सांकेतिक साहित्यव्यवस्थेला धक्का तर दिलाच, पण ज्या माणसांच्या आयुष्याचं त्यांनी चित्रण केलं ते त्या काळात आणि आजही वाङ्मय इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कथा, कादंबरी, नाटक, कविता, चित्रपट परीक्षण, विविध विषयांवरील स्तंभलेखन अशा वैविध्यपूर्ण समृद्ध लेखनानं भाऊंनी आपली कारकीर्द गाजवली. मराठी साहित्य आणि साहित्य व्यवहार यांनी खूप काळ भाऊंसारख्या मोठ्या लेखकाला दूर ठेवलं याची अनेक अभ्यासकांनी खंत व्यक्त केली आहे. या जन्मशताब्दी वर्षांमध्ये तरी भाऊंच्या समग्र साहित्यावर सविस्तर चर्चा आणि त्यांच्या कथा-कादंबऱ्यांमधील निवडक भागांचं अभिवाचन करण्यासाठी एखादी संस्था पुढे येईल अशी आशा आहे.
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com