

विशेष
प्रवीण बांदेकर
मराठीतील एक महत्त्वाचा कादंबरीकार असलेल्या भाऊ पाध्ये (प्रभाकर नारायण पाध्ये) यांनी साठ-सत्तरच्या दशकांतील मुंबईसारख्या महानगरातील जगण्याचे ताणेबाणे, त्यातील बारकाव्यांसहित आणि महानगरीय स्लँगचा अप्रतिम वापर करत, मराठी साहित्यात पहिल्यांदाच आपल्या कथात्म साहित्यातून मांडले. आपल्या वाट्याला आलेल्या काळाच्या तुकड्याच्या आणि महानगरीय अवकाशाच्या मर्यादेत राहून भाऊंनी लेखन केले असले तरी भाऊंच्या मोकळ्याढाकळ्या बेधडक शैलीचे आणि जीवनदृष्टीचे वारसदार पुढच्या पिढीतही मराठीत दिसत आहेत. ६ नोव्हेंबरपासून भाऊंचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यानिमित्त कादंबरीकार म्हणून असलेले भाऊंचे वेगळेपण मांडणारा हा लेख.
१९६० साली भाऊ पाध्ये यांची पहिली कादंबरी ‘डोंबाऱ्याचा खेळ’ प्रसिद्ध झाली. त्यानंतर पुढच्या सुमारे दोन दशकांच्या काळात त्यांच्या आणखी दहा कादंबऱ्या प्रकाशित झाल्या. भाऊ पाध्येंच्या या सर्वच कादंबऱ्यांमधून व्यक्त होणारी जीवनदृष्टी मराठी साहित्यविश्वाच्या दृष्टीने अनोखी अशीच होती. मराठी वाचकांच्या नैतिकतेच्या पारंपरिक कल्पनांना धक्का देणारी आशयसूत्रे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वातील आदिमतत्त्वाप्रमाणे जगू पाहणाऱ्या, नैसर्गिक अंतःप्रेरणांना प्रतिसाद देऊ पाहणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तिरेखा हे या सगळ्या कादंबऱ्यांचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येते.
अंत:प्रेरणेने जगणारी मिसफिट पात्रे
भाऊ पाध्येंनी चित्रित केलेले सगळे नायक-नायिका म्हणजे राग-लोभ-विकार-वासना-स्वार्थ अशा मानवी भावभावना नैसर्गिकपणे व्यक्त करणारी हाडामांसाची, स्खलनशील अशी सर्वसामान्य माणसे होती. नैतिक आचरणासंबंधीची समाजातील रूढ बंधने, कायदेकानून यांचे काटेकोरपणे पालन करण्याऐवजी आपल्या अंतःप्रेरणेने जगणे त्यांना जास्त महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच ही पात्रे आपल्या जगण्याशी, भाववृत्तीशी प्रामाणिक असतात. समाजातील खोटे, दांभिक वा तोंडदेखले वागणे त्यांना आवडत नाही. आपल्या वागण्यामुळे आपण या तथाकथित नैतिक समाजात मिसफिट ठरतोय, याची जाणीव त्यांना नेहमीच असते, असेही दिसत नाही. हे नायक-नायिका वेगवेगळ्या सामाजिक वा सांस्कृतिक स्तरातली वास्तव जगात कुठेही सहजपणे दिसणारी सर्वसामान्य माणसं असल्याने भाऊ पाध्ये यांचे हे नायक अर्थातच कर्तृत्ववान, यशस्वी, धीरोदात्त, देखणे, सद्गुणी, प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे वगैरे नाहीत किंवा त्यांच्या नायिकाही इंद्रधनुष्याकृती भुवया असलेल्या- सौंदर्यवती, मर्यादाशील, शालीन वगैरे वगैरे नाहीत. समाजात आसपास कुठेही दिसणाऱ्या त्या सर्वसामान्य स्त्रिया आहेत. साहजिकच त्यांच्या शारीरिक तपशिलांच्या वर्णनामध्ये पाध्येंना रुची नाही. मात्र या नायिकाही आपापल्या अंतःप्रेरणेनुसार जगू पाहणाऱ्या आहेत. भाऊ पाध्येंच्या कादंबऱ्यांतील पात्रांच्या जगण्यातील या अस्सलपणामुळेच या कादंबऱ्या तोपर्यंत लिहिल्या गेलेल्या कादंबऱ्यांपेक्षा सर्वस्वी वेगळ्या ठरलेल्या दिसतात.
परिवर्तनवादी, बंडखोर विचारधारा
भाऊ पाध्ये ज्या विचारांच्या स्कूलमधून पुढे आले होते ती विचारधारा मराठी साहित्यातील परिवर्तनवादी, बंडखोर विचारधारा होती. तत्कालीन लघुनियतकालिकांच्या चळवळीने प्रस्थापित संकेतशरण मराठी साहित्याच्या विरोधात जोरदार बंडखोरी करून नवे संकेतव्यूह मांडायला सुरुवात केली होती. चित्रे-कोलटकर-ढसाळ-सुर्वे यांच्यासारखे कवी जे कवितेच्या क्षेत्रात करीत होते, तेच भाऊ पाध्ये-नेमाडे यांनी कादंबरीच्या क्षेत्रात करायला सुरुवात केली होती. साहित्याचा संबंध थेटपणे जगण्याशी आणि जगण्यातल्या वास्तवाशी जोडून घेणारी ही मंडळी होती. त्यामुळेच पाध्यांच्या कादंबऱ्यांमधील पात्रेही अशीच वास्तव जगण्यातली, रोजमर्रा जिंदगीशी संघर्ष करणारी, पराभूत होणारी, स्खलनशील प्रवृत्तींची माणसे आहेत. शिवाय ज्या व्यवस्थेच्या विरुद्ध बंड करायचे होते त्या व्यवस्थेतील खोटेपणा, ढोंगबाजी उघड करणाऱ्या आणि प्रामाणिकपणे आपल्या व्यक्तिमत्त्वातील न्यूनत्वाचाही स्वीकार करणाऱ्या पिढीचे ते नायक-नायिका आहेत.
वास्तव जगातील नायक-नायिका
पाध्ये यांच्या ‘डोंबाऱ्याचा खेळ’ या कादंबरीचा नायक सामान्य कामगारांच्या हितासाठी झटणारा एक सच्चा कार्यकर्ता आहे, तर ‘वैतागवाडी’चा नायक श्रीकांत सोहनी घराच्या समस्येने हैराण झालेला, मेटाकुटीला आलेला सामान्य कारकून आहे. बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर हा वकिली बंद करून सच्चेपणाच्या जगण्याचा शोध घेऊ पाहणारा तरुण आहे, तर ‘राडा’मधील मंदार अण्णेगिरी बापाच्या पैशांवर लाथ मारून नैसर्गिकपणे जगू पाहणारा, दुनियेच्या दृष्टीने वाया गेलेला तरुण आहे. ‘वासूनाका’ या बहुचर्चित कादंबरीत तर झोपडपट्टीत, बकाल वस्तीत मवालीगिरी करणारी, कामपूर्तीसाठी हपापलेली तरुण पोरांची गँगच आहे. याशिवाय तुरुंगवास भोगून आलेले, बेकार जगणारे, कलंदर बेछूट वृत्तीचे असेही नायक त्यांच्या कादंबऱ्यांमधून भेटतात. फडके-खांडेकर-माडखोलकर वगैरेंच्या नायकांप्रमाणे समाजासाठी आदर्शवत, स्फूर्तिदायी ठरावेत असे कोणतेही विशेष गुण भाऊ पाध्ये यांच्या या नायकांमध्ये नाहीत. याचं मुख्य कारण म्हणजे, झपाट्याने बदलणाऱ्या काळात आदर्श, संस्कार, बोध यांसारख्या गोष्टींमागील फोलपणा लक्षात येऊ लागल्यावर असे अवास्तव, खोटे नायक रंगवणे ही कादंबरीकाराच्या दृष्टीने स्वतःचीच फसवणूक ठरू शकत होती. पाध्ये यांची जीवनदृष्टी त्यांच्या काळाला साजेशी असल्यामुळेच मराठीतील कलावादी कादंबऱ्यांनी चितारलेल्या नायकांप्रमाणे जीवनविन्मुख नायक चितारणे त्यांनी टाळावे, हे साहजिकच होते.
परात्म होत जाणारे नायक
साठोत्तर दशकातील मराठी साहित्यावर महायुद्धोत्तर काळातील युरोपियन साहित्याचा व कलाव्यवहारात प्रभावी असलेल्या अस्तित्ववादी विचारसरणीचा मोठा पगडा होता. भाऊ पाध्येंच्या ‘वैतागवाडी’, ‘बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर’ यांसारख्या कादंबऱ्या या अनुषंगाने पाहता येतील. आपल्या जगण्यातील निरर्थकता, निवडीचे स्वातंत्र्य गमावून बसल्याची हताश करणारी भावना, वैफल्यग्रस्तता, नकारात्मक व असंबद्ध विचार करण्याची सवय, आत्महत्येचे आकर्षण, आत्मक्लेशातून ‘स्व’चा शोध घेणे, जगाच्या व्यवहारांशी जुळवून घेता न आल्याने तुटत जाणे, परात्म होत जाणे इत्यादी गोष्टी या कादंबऱ्यांच्या नायकांच्या जगण्यामधून दृग्गोचर होत जातात. बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर उच्चविद्याभूषित सनदप्राप्त वकील आहे; तरीही त्याच्या पेशातील खोटेपणा, अनैतिक वातावरण, त्याच्या पत्नीसह अन्य उच्चभ्रू लोकांच्या वागण्यातील दांभिकता त्याला उबग आणणारी वाटते. मी का जन्माला आलो आहे, मी कशासाठी जगतो आहे, असे अस्तित्वाशी निगडित प्रश्न त्याला छळू लागतात. आपली पत्नी किंवा अन्य संबंधित यांच्याकडून खोट्या प्रतिष्ठेसाठी, पैशांसाठी, स्वार्थासाठी आपला वापर करून घेतला जातोय, प्रत्यक्षात आपल्याला नवरा म्हणून, माणूस म्हणून स्वीकारताना या सगळ्यांना खोटेपणाचे बुरखे पांघरावे लागत आहेत, हे जाणवल्यावर तो सर्वांपासून तुटत जातो, एकाकी, परात्म बनतो. जगण्यातील सगळ्या ढोंगी व अप्रामाणिक वातावरणाला वैतागलेला अनिरुद्ध धोपेश्वरकर स्वतःपुरते अंतःप्रेरणेने जगण्याचा प्रयत्न करू लागतो, त्याला ते सच्चे वाटू लागते. त्यामुळेच गळ्यात गोल्ड मेडल अडकवून वसाहतीत फिरण्याची त्याची कृती वरकरणी निरर्थक वा हास्यास्पद वाटली तरी त्यामागील उत्स्फूर्तता सच्ची वाटते.
मानवी जीवनाबद्दल आस्था असणारा लेखक
भाऊ पाध्ये यांना मानवी जीवनाबद्दल अपार कुतूहल आणि तितकीच सहानुभूती आहे याचा प्रत्यय त्यांनी आस्थेवाईकपणे चितारलेल्या उच्च मध्यवर्गीय, मध्यववर्गीय, निम्नस्तरीय अशा सर्व सामाजिक स्तरातल्या नायकांवरून येतो. त्यामुळेच अगदी वासूनाकामधील बकाल वस्तीतील पोक्या वगैरे उनाड पोरांच्या जगण्यातील अतृप्तता, उदासी, भंकस इ.चे चित्रण करतानाही पाध्ये आपला तोल ढळू देत नाहीत. केवळ उद्ध्वस्त वर्तमानकाळ असलेल्या आणि भूतकाळ व भविष्य नसलेल्या या पिढीचे जगणे, त्यांची मानसिकता पाध्ये विलक्षण समजुतीने मांडतात. एकूणच पाध्ये आपल्या सर्व नायकांचे चित्रण सारख्याच सहानुभवातून करतात. कोणत्याही व्यक्तीचे अमुक एक वर्तन चांगले, अमुक एक वाईट अशी सुष्टदुष्ट विभागणी ते करीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांतील व्यक्ती आपल्या नैसर्गिक गुणावगुणासह, वृत्तीप्रवृत्तींसह प्रकट होतात. या व्यक्तींच्या चित्रणातून पाध्ये मानवी जीवनाचा व्यापक पट मांडून माणसांचे राग, द्वेष, मत्सर, प्रेम, विकृती, महत्त्वाकांक्षा, क्रूरपणा, हतबलता वास्तवपणे चित्रित करतात. हे करतानाही आपली भूमिका कुठल्याही पात्रावर लादली जाणार नाही याची ते काळजी घेतात.
लेखक म्हणून आपले भाष्यही कुणा एका पात्राच्या बाजूने येऊ नये, हेही ते कटाक्षाने पाहतात. व्यक्ती जशी जगते तशीच त्यांच्या कादंबरीत येत असल्याने लेखकाची प्रतिक्रिया वा पात्रांच्या नैसर्गिक वर्तनात लेखकाचा हस्तक्षेप अकारण कुठेही येत नाही. त्यामुळे त्यांच्या चित्रणात अकारण भावविवशता, भावनिकताही दिसत नाही. पाध्यांची लेखक म्हणून असलेली संवेदनशीलता कोणत्याच एका ठराविक वर्गाची, जातीधर्माची नाही. त्यामुळे त्यांचे हे नायक समाजातल्या विविध स्तरांतले, भिन्नभिन्न संस्कृती-संस्कारांमध्ये वाढलेले असे दिसतात.
सामाजिक पर्यावरणाचा विस्तृत पट
कादंबरीतील आशयाशी संबंधित नायक वा नायिकेच्या भोवतीच्या सामाजिक पर्यावरणाचा पटही पाध्ये चित्रित करतात. त्या समूहाचे सामाजिक, भाषिक, सांस्कृतिक पर्यावरण ते वाचकासमोर ठेवतात. पाध्येंच्या कादंबरीतील पात्रे ज्या वातावरणात, समूहात, सांस्कृतिक पर्यावरणात, माणसांच्या गोतावळ्यात वावरतात त्या संबंध अवकाशासह त्यांच्या कादंबरीत चित्रित होतात. त्यामुळे व्यक्तिदर्शनाबरोबर समाजदर्शन हेही त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणता येते. एकेका व्यक्तिरेखेच्या आधारे समग्र मानवी जीवनाचे आकलन मांडण्याचा प्रयत्न करणे, काळाचा एकेक पट उभा करू पाहणे, मानवी जीवनाला भेडसावणाऱ्या एकेका समस्येला भिडणे पाध्ये यांना सहजशक्य झालेले दिसते.
भाऊ पाध्ये यांचे हे नायक व्यावहारिक जगाशी फटकून वागत असल्याने त्यांच्या कृतीउक्तीमुळे अनेकदा ते वरकरणी चक्रम, विक्षिप्त, तिरकसच वाटत राहतात. प्रत्यक्षात मात्र ते अव्यवहारी, भाबडे, आपल्या इंपल्सप्रमाणे वागण्याच्या नादात नादान ठरलेले असे असतात. बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर फुलांचा हार आणि गोल्ड मेडल गळ्यात घालून त्यावर ‘आयडियल हजबंड’ असे लिहून वसाहतीतून फिरतो. श्रीकांत सोहनी बायकोला सकाळी चहाऐवजी ताक करायला सांगतो, तर होमसिक ब्रिगेडचा नायक निळू आपल्याला मुंबई, महाराष्ट्र वगैरे गोष्टींचा अभिमान नसल्याचे स्पष्ट सांगतो. हे सर्व नायक वरवर विक्षिप्त वाटले तरी त्यांच्या वागण्यामागे, बोलण्यामागे एक स्पष्ट आणि व्यापक जीवनदृष्टी आहे. ही जीवनदृष्टी अर्थातच भाऊ पाध्ये या लेखकाचीही नवनैतिक अशी जीवनदृष्टी आहे. लेखकाला या नायकांच्या माध्यमातून तत्कालीन समाजवास्तवावर काही एक भाष्य करायचे आहे, काही भूमिका मांडायची आहे, हे स्पष्टपणे जाणवते. या नायक-नायिकांच्या चित्रणापाठीमागे कार्यरत असलेला पाध्यांचा व्यापक मूल्यभाव पात्रांच्या जगण्यातून ठसठशीतपणे वाचकांसमोर येतो. त्यातूनच हे नायक-नायिका परंपरेला छेद देणारे आहेत, याचा प्रत्यय येतो. भाऊ पाध्येंच्या या नायकांच्या जीवनदृष्टीमधून साठोत्तरी पिढीतील बंडखोर लेखक-कलावंतांची जीवनदृष्टीही व्यक्त होताना दिसते. ही जीवनदृष्टी अर्थातच प्रस्थापित व्यवस्थेतील दांभिकतेला नकार देत प्रामाणिक जगण्याची आस बाळगणाऱ्या साध्या सरळ सर्वसामान्य माणसाची जीवनदृष्टी असल्याचे सांगता येते. या अर्थाने भाऊ पाध्ये यांचे हे नायक सर्वसामान्य माणसांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे नायक ठरतात.
भाऊ पाध्ये यांचा व्यापक सहानुभाव, माणसांच्या जगण्याविषयीची आस्था व मानवतावादी भूमिका त्यांच्या कादंबऱ्यांमधून, त्यातील पात्रचित्रणांमधून जाणवत राहते. एकूणच मराठी कादंबरी व त्यातील नायकाची संकल्पना बदलण्याचे महत्त्वपूर्ण काम पाध्ये यांनी केले आहे, असे म्हणता येते.
ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक विषयांवरचे भाष्यकार