एका झुरळाचे महाभारत

पांडव आणि कौरवांमधील पिढीजात शत्रुत्व, महत्त्वाकांक्षा, मत्सर, अहंकार आणि अन्यायातून महाभारतातील युद्धाची बीजे पेरली गेली होती. आता तसेच महाभारत पुन्हा घडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगार तरुण पदव्या घेऊन रस्त्यावर फिरत आहेत.
एका झुरळाचे महाभारत
एका झुरळाचे महाभारत'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

दुसरी बाजू

प्रकाश सावंत

पांडव आणि कौरवांमधील पिढीजात शत्रुत्व, महत्त्वाकांक्षा, मत्सर, अहंकार आणि अन्यायातून महाभारतातील युद्धाची बीजे पेरली गेली होती. आता तसेच महाभारत पुन्हा घडते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बेरोजगार तरुण पदव्या घेऊन रस्त्यावर फिरत आहेत. त्यांच्या हक्काच्या नोकऱ्याच भ्रष्ट व्यवस्था हिरावून घेत आहे. त्यातच उच्चपदस्थ मंडळी त्यांना 'आळशी', 'परजीवी' किंवा 'झुरळ' म्हणून हिणवत आहेत. या अस्वस्थतेतून जन्माला आलेली 'कॉकरोच जनता पार्टी' हे केवळ एक उपरोधिक व्यासपीठ नाही, तर ती या देशातील तरुणाईच्या मनात साचलेल्या असंतोषाची अभिव्यक्ती आहे.

'कॉकरोच जनता पार्टी' चा (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके याचा पूर्वइतिहास पाहिला तर तो मूळचा हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिंपरी गावचा. त्याने पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले. पुढे तो 'आम आदमी पार्टी'च्या सोशल मीडिया टीममध्ये कार्यरत झाला. जनमानसाची नाडी कशी ओळखावी आणि डिजिटल माध्यमांचा वापर करून व्यवस्थेला कसे धारेवर धरावे, याचे अचूक कसब त्याने आत्मसात केले. पदव्युत्तर शिक्षणासाठी तो अमेरिकेच्या बोस्टन शहरात गेला. तेथे राहूनही त्याचे भारतातील घडामोडींकडे बारीक लक्ष होते. देशातील तरुणाई 'बेरोजगारी' चे चटके सोसत आहे. सामान्य माणूस 'महागाई'चा मार खात आहे. भ्रष्टाचाराने कहर केला आहे. आर्थिक मंदीने देशाला घेरले आहे. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या या वेदनांनी तो अस्वस्थ होत होता. त्यातच सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी बेरोजगार, आळशी युवकांना झुरळ, परजीवी संबोधणारी विधाने केली व त्याचा लागलीच इन्कारही केला.

या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बेरोजगार तरुणांना कस्पटासमान मानणाऱ्या व्यवस्थेविरोधात त्याने 'कॉकरोच जनता पार्टी'ची स्थापना केली. अवघ्या दोन-तीन दिवसांत जवळपास दीड कोटी तरुणाईने त्याच्या पार्टीला तुफान प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद सत्ताधारी पार्टीच्या फॉलोअर्सपेक्षा अधिक होता. परिणामी, व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या 'कॉकरोच जनता पार्टी' चे एक्स खातेच बंद करण्यात आले. तेव्हा त्याने 'कॉकरोच इज बॅक' सांगून नवे खाते सुरू केले. त्यालाही दोन कोटी फॉलोअर्सनी उचलून धरले. ही आकडेवारी सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारी ठरली. ज्या झुरळाला कमी लेखले, ज्याला उकिरड्यावरचा कीडा म्हणून हिणवले, ज्याची तुलना आळशी, बेरोजगार, परजीवी युवकाशी केली, ते झुरळ आता कमजोर न होता बलशाली होऊन महाशक्तीच्या साम्राज्यालाच हादरे देऊ लागले आहे. या झुरळक्रांतीने भल्याभल्यांची झोप उडवली आहे. कारण यात आहे अन्यायाविरुद्धची चीड आणि भ्रष्ट, बलाढ्य व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे असामान्य धाडस.

देशात नोटाबंदीचा प्रयोग फसला. त्यातून काळा पैसा कधीच बाहेर पडला नाही. या देशात 'एक देश, एक कर' संकल्पना प्रत्यक्षात उतरलीच नाही. जग कोरोनाच्या महामारीने हैराण असताना कधी टाळ्या, कधी थाळ्या वाजव असा अवैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला गेला. शेतमालाला हमीभाव देण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला असता त्यालाही अतिरेकी संबोधण्यात आले. महागाई, भ्रष्टाचाराने कहर केला. रुपयाने सर्वकालिक नीचांक गाठला. अर्थव्यवस्था अभूतपूर्व संकटात सापडली. ही सर्व परिस्थिती सावरण्याऐवजी देशात हिंदू-मुस्लिम वादाला खतपाणी घालण्यात आले. मणिपूरमधल्या वांशिक संघर्षाला हवा देण्यात आली. सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, नोकरशाही एवढेच काय, मीडियाला सुद्धा आपल्या हातचे बाहुले करण्याचे प्रयत्न झाले. देशात सध्या जे पक्षपाती, सूडबुद्धीचे राजकारण केले जात आहे, ज्या प्रकारे आमदार, खासदारांचा घोडेबाजार भरवला जात आहे, ज्या प्रकारे विरोधकांच्या सत्ता उलथवल्या जात आहेत, ज्या प्रकारे भ्रष्ट भणंगांना सत्तेत मंत्रिपदे दिली जात आहेत, ज्या प्रकारे घटनात्मक संस्थांचे पावित्र्य नष्ट केले जात आहे, ज्या त-हेने ठराविक उद्योगपतींचीच पाठराखण केली जात आहे, ज्या प्रकारे निवडणुका घेतल्या जात आहेत, त्या व्यवस्थेतील बजबजपुरीलाच अभिजीत दिपके याचा मुख्य आक्षेप आहे. हा आक्षेप त्याने आपल्या मुलाखतींमधून, सोशल मीडियातील पोस्टमधून उघडपणे व्यक्त केला आहे. त्याने देशातील 'नीट'च्या पेपर फुटीने अस्वस्थ झालेले २२ लाख विद्यार्थीच नव्हे, तर शेतकरी, कष्टकऱ्यांच्या वर्तमानाचा आवाज बुलंद केला आहे.

एवढे सारे होत असताना सत्ताधीश आणखी सत्ताप्राप्तीच्या स्वप्नातच मश्गुल राहिले. त्याविरुद्ध त्याने उपरोध, चीड, संताप व्यक्त केला आहे. त्यातूनच त्याच्या 'कॉकरोज जनता पार्टी'चा जन्म झाला. जे विरोधक केवळ दरबारी राजकारण करत राहिले, जे कधी रस्त्यावर उतरून सामान्यांच्या अन्याय, अत्याचाराला वाचा फोडताना दिसले नाहीत, त्यांनाही अभिजीतने सणसणीत चपराक हाणली आहे. किंबहुना त्यांची स्पेस भरून काढण्याची तयारी त्याने चालवली आहे.

आता प्रश्न असा आहे, की या 'केजेपी'ला आपल्या देशात खरोखरच काही परिवर्तन घडवायचे आहे का ? शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काही मूलभूत बदल घडवायचे आहेत का? एकेकाळी एक समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलन छेडले व त्या आंदोलनावर स्वार होत भाजप सत्तेत आला खरा, परंतु ज्यांना भ्रष्टाचाराचे शिरोमणी म्हणून ठरवले त्याच

भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या पक्षात व सत्तेत सहभागी करून भाजपने भ्रष्टाचाराविरुद्धच्या आंदोलनाचा गळाच घोटला आहे. या सत्ताधाऱ्यांनी मागील बारा वर्षांत घटनेने स्थापन केलेल्या आदर्श व्यवस्थेचेच बारा वाजवले आहेत. तरीही सत्ताधारी साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करून सत्तेवर सत्तासंपादन करीत आहेत. या काळाची तुलना अमृत काळ म्हणून ते करीत असले तरी विरोधकांच्या मते हा विषकाल सुरू आहे. तथापि, जनतेच्या प्रश्नावर विरोधक हतबल झाल्याचे दिसून येत आहे. दूरवर कुठेही सामान्य जनतेला अंधुकसा आशेचा किरणही दिसत नव्हता अशा वेळी ज्यांना तुच्छ लेखले तेच झुरळरूपी तरुण आता नवे महाभारत घडविण्यासाठी सज्ज झाले आहेत. या बेरोजगार तरुणाईने झुरळालाच आपले स्वाभिमानाचे हत्यार बनविले आहे. त्याच अपमानाच्या गर्भातून 'कॉकरोच जनता पार्टी'चा जन्म झाला आहे. आता अभिजीत दिपके याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असून त्याची वेबसाईटसुद्धा आता बंद करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा आजवरचा आभासी लढा आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. त्याच्या लढ्याला आता 'भय' नाही, तर 'बदलाची' आस आहे. हा बदल देशाची गरज बनली आहे, मात्र ती कोण पूर्ण करणार हाच एक प्रश्न आहे.

'सीजेपी' ने आपल्या जाहीरनाम्यात जे मुद्दे मांडले आहेत, ते देशवासीयांचीच 'मन की बात' असल्याचे दिसून येत आहे. 'सीजेपी' सत्तेत आल्यास कोणत्याही सरन्यायाधीशाला सेवानिवृत्तीनंतरचे बक्षीस म्हणून राज्यसभेची जागा देणार नाही. कोणत्याही वैध मतदाराचे नाव मतदार यादीतून जाणीवपूर्वक किंवा निष्काळजीपणामुळे वगळले गेले, तर ते देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना थेट 'यूएपीए' सारख्या कडक कायद्यांतर्गत अटक करण्यात येईल. संसदेची सदस्यसंख्या न वाढवता महिलांना थेट ५० टक्के आरक्षण देण्यात येईल. मंत्रिमंडळातही ५० टक्के पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येतील. देशातील बड्या उद्योगपतींच्या मालकीच्या मीडिया हाऊसेसचे परवाने रद्द करण्यात येतील. जनतेची दिशाभूल करणाऱ्या टीव्ही अँकर्सच्या बँक खात्यांची चौकशी करण्यात येईल. कोणताही आमदार किंवा खासदार जर पक्षबदल करेल, तर त्याला पुढील दोन दशके कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही किंवा कोणतेही सार्वजनिक पद भूषवता येणार नाही.

अशाप्रकारच्या तरतुदी 'सीजेपी' च्या जाहीरनाम्यात करण्यात आल्या असून त्यास तरुणाईचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 'नीट' पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मोहीमच 'सीजेपी'ने सुरू केली आहे. ही मोहीम आभासी ठरते, की त्याला देशातील तरुणाईचा प्रत्यक्ष पाठिंबा मिळतो याचे उत्तर येणारा काळच देईल, परंतु एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे या 'झुरळांनी' आता प्रस्थापित व्यवस्थेच्या राजमहालांना धडका देण्यास सुरुवात केली आहे.

prakashrsawant@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in