

प्रासादिक म्हणे
प्रसाद कुळकर्णी
कोकणच्या लाल मातीतून उगम पावलेला 'देवगड हापूस' म्हणजे केवळ फळांचा राजा नसून रसिक खवय्यांसाठी एक उत्सव आहे. पु.ल. देशपांडे यांनी ज्याला "सगळ्यांचो बापुस" म्हणून गौरवले, त्या देवगड हापूसचा सुगंध आणि गोडवा जगावेगळा आहे.
सध्या सारीकडे आंब्यांचा मोसम सुरू आहे. या मोसमात इतर फळांना थोडे वाईट दिवसच येतात. प्रत्येकजण आपल्याला आवडणारा आणि खिशाला परवडणारा आंबा विकत घेऊन त्याच्या चवीचा कुटुंबासमवेत आनंद घेत असतो. आज आपण मात्र जाणार आहोत देवगड हापूसच्या सुमधुर प्रवासाला.
देवगड हापूस हा केवळ आंबा नसून, तो कोकणच्या मातीतील एक अमृताचा ठेवा आहे. मूळ देवगड हापूस आंबा, हे प्रकरण काय आहे, हे ज्याने तो एकदा खाल्लाय त्यालाच कळू शकतं. पुलंनी उगाच नाही त्याला "सगळ्यांचो बापुस" असं म्हटलंय. एकदा का देवगड हापूस मुखात गेला, की इतर सगळे आंबे त्याच्यापुढे अगदी फिके वाटू लागतात. त्याचं रूप, त्याची कांती अगदी वेगळी असते. सुरकुतलेला , थकलेला, मरगळलेला देवगड हापूस असूच शकत नाही. तुकतुकीत कांतीचा, पिवळाजर्द रंगाचा, तजेलदार असतो देवगड हापूस. त्याचा गंध, सुवास तुम्हाला मंतरल्यासारखा आपल्याजवळ खेचून घेतो. तो नाकाला लावू त्याचा सुवास घ्यावा लागतच नाही. बाजारात फिरताना अगदी लांबूनही तो सांगतो, "मी इथे आहे".
त्या गंधाच्या दिशेने वाट काढत पोहोचल्यावर तो हमखास भेटतो. देवगड हापूसची फोड खाताना त्याची अत्यंत पात्तळ साल, अलगद तुटून तोंडात येते आणि कुठेही न अडखळता गराबरोबर अगदी सहज पोटात जाते.
आजकाल प्रत्येक आंबा विक्रेता म्हणत असतो, "आमचा देवगड हापूस ."
पण त्याच्या बोलण्यातला खरेपणा अस्सल देवगडकराच्याच लक्षात येऊ शकतो, कारण त्याचं देवगड हापुसशी नातं पंचेंद्रियानी जोडलेलं असतं.
कानांवर देवगड हापूस आल्याची गोड बातमी पडते, घरात पेटी उतरते. पेटीतून बाहेर पडण्याआधीच त्याचा दैवी सुगंध नाकाने घेतलेला असतो. पेटी उघडते आणि त्याच्या पहिल्या दर्शनाने डोळे आनंदाने भरून येतात. अलगद त्यातल्या एकाला उचलून हातात घेताच त्याचा तुकतुकीत स्पर्श त्वचेला आणि मनाला मोहून टाकतो. आणि अखेर त्याच्या फोडीचा पाहिला घास जिभेवर उतरतो, त्यापुढे मात्र ब्रह्मानंदी टाळी लागते, दोघांमधला द्वैत भाव सरून दोघंही एक होऊन जातात. आता हा देवगड हापूस नुसताच खावा की कापून की रसाच्या माध्यमातून ??
यावर प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. चोखून खायला मज्जाही खूप येते. पण चोखून खाण्याआधी त्याच्या वरच्या देठकढचा भाग आधी काढायचा, आणि थोडा पिळून घ्यायचा. त्यानंतर त्याला हातावर गोल गोल फिरवत बोटानी छान मऊ करून घ्यायचा आणि....मग मुखात घेऊन त्याचा रस ओढून घ्यायचा. देवगड हापूसची चव मुखात उतरताच जो काही आनंद मिळतो त्याला कशाचीही सर येऊ शकत नाही. आता कुणी म्हणेल आम्हाला छान शिरा कापून खायला आवडतो. पण गंमत म्हणजे, शिरा दातांनी ओढून खाण्यात मजा आहे त्यापेक्षा देवगड हापूसचा बाठा खाण्यात अधिक मज्जा येते. चारही बाजूंनी बाठ्यावरचा गर खाऊन संपला की तो टाकून नाही द्यायचा. चोखत चोखत त्याचा लाल केशरी रंग जाऊन तो पार पांढरा पडला की बाठा चोखून संपला असं म्हणायचं. अस्सल आणि अट्टल हापूस खाणारे बाठ्याला पसंती देतात आणि डोळे मिटून त्याचा आनंद मनापासून घेतात.
तिसरा प्रकार म्हणजे आमरस. आता आमरस म्हणजे आजकाल बाजारात केरिनो रस या नावाने मिळतो तो अजिबात नाही बरं, स्वच्छ हात धुवून, मघाशी म्हटल्याप्रमाणे पाच सहा देवगड हापूस निवडून त्यांचा एका मोठ्या टोपात पिळून आमरस काढायचा. साल चांगली पिळून त्याला लागलेला सगळा रस काढून घ्यायचा. संपूर्ण पंजा गराने भरून जायला हवा. बाठ्याचा सगळा गर काढून घ्यायचा, आणि मग भांड्यातील सगळा रस छान एकजीव करायचा. एक पथ्य आवर्जून पाळायचं, काढलेल्या रसातल्या गुठळ्या अजिबात मोडू द्यायच्या नाहीत, किंवा तो रस मिक्सरमध्ये घालून एकजीवही करायचा नाही. हवी असल्यास थोडी साखर आणि दूध मिसळायचं. पण शक्यतो साखर मिसळूच नये. देवगड हापूसची मूळ गोडी त्यामुळे मारली जाते. घरच्या लोण्याच्या कढवलेल्या साजूक तुपाचा एक चमचा आमरसात सोडायचा, आणि छान एक ताट घेऊन दोन तीन पोळ्या हापूस आंब्याचा काढलेला रस, चव बदलायला लोणचं किंवा चटणी वाढून घ्यायचं.......आणि मग जराही इकडे तिकडे न पहाता पोळीचे तुकडे रसात पूर्णपणे बुडवून हाणत सुटायचं. देवगड हापूस आणि पायरी एकत्र करून रस बनवला तर चव अजूनही बहारदार लागते. शहरात, आपण भाव करून पारखून निरखून याला विकत घेतो. गावाला गेल्यावर घरच्या एका खोलीत देवगड हापूसची रास पडलेली असते, आड्या लावलेल्या असतात. मनाला वाटलं की त्या खोलीत यायचं, निवडून आंबा घ्यायचा आणि मुखाला लावायचा.
आता, प्रत्येकाला आपल्याकडच्या आंब्याचं कौतुक असतं म्हणा. म्हणजे गोव्याच्या मंडळींना आपल्या मानकुराद किंवा फर्नांडिस आंबाच उत्तम वाटतं, गुजरातचा केसर तर उत्तर प्रदेशी म्हणणार आमचा लंगडा, दशहरा खाऊन पहा. कर्नाटकात मिळणारा बदामी असे आंब्याचे अनेक प्रकार आणि त्यांची मधुर चव.
आमचं मूळ गाव देवगड. त्यामुळे कुणी विक्रेत्याने कितीही म्हटलं, तरी सुगंधावरून अस्सल देवगड हापूस लगेच ओळखता येतो. गावाला लावलेली हापूसची कलमी झाडं आणि त्यांना लगडलेले अगदी सहज हाताला लागणारे हापूस आंबे पहाताना मिळणारा अवर्णनीय आनंद मी स्वतः अनुभवलाय.
देवगड हापूस आंब्याचा मुख्य हंगाम (सीझन) साधारणपणे मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून सुरू होऊन मे महिन्यापर्यंत चालतो. फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात देवगड हापूस बाजारात येण्यास सुरुवात होते. आजकाल सुरवातीच्या काळात देवगड हापूसचा भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतो. तरीही अस्सल हापूस खवय्या भाव कमी होण्याचा संयम पाळत खाईन तर तुपाशी या उक्तीला जागत पहिली चव घेतो ती देवगड हापूसची.
|| इति देवगड हापूसोध्याय: सुफळ संपूर्ण ||
kprasad1959@gmail.com