इमर्जन्सी म्हणजे घाबरायचं नाही, सजग राहायचं!

कसे आहात मित्रांनो?? धमाल मस्ती चालू असेलच ना? टीव्ही, मोबाईल, पत्ते, सिनेमे, बालनाट्य, क्रिकेट, खेळ, गिर्यारोहण, किंवा झोपा काढणे या व्यतिरिक्त अजून काय- काय करतात ते सांगा…हो, पुस्तकं तर तुम्ही आवडीने वाचता हे मला माहिती आहे, त्यामुळे ते विचारलं नव्हतं. असो तुम्ही टीव्ही बघतात, तर त्यावर नेमकं काय बघता? कार्टून नेटवर्क, सीरिअल्स, सिनेमे की बातम्या? आता तुम्ही म्हणाल की...
इमर्जन्सी म्हणजे घाबरायचं नाही, सजग राहायचं!
Published on

खुल जा सिम सिम

ज्योती कपिले

कसे आहात मित्रांनो?? धमाल मस्ती चालू असेलच ना? टीव्ही, मोबाईल, पत्ते, सिनेमे, बालनाट्य, क्रिकेट, खेळ, गिर्यारोहण, किंवा झोपा काढणे या व्यतिरिक्त अजून काय- काय करतात ते सांगा…हो, पुस्तकं तर तुम्ही आवडीने वाचता हे मला माहिती आहे, त्यामुळे ते विचारलं नव्हतं. असो तुम्ही टीव्ही बघतात, तर त्यावर नेमकं काय बघता? कार्टून नेटवर्क, सीरिअल्स, सिनेमे की बातम्या? आता तुम्ही म्हणाल की, बातम्या ऐकणं हे तर बाबा किंवा आजोबांचा फेव्हरेट काम आहे. तर बरोबर आहे. आपल्या राज्यात, देशात, विदेशात अर्थात आपल्या आजुबाजूला काय चालले आहे हे आपल्याला माहिती पाहिजेच. मला एक सांगा, कधी एखादी महत्त्वाची बातमी टीव्हीवर दाखवत असतील, तर तुमच्या घरातील मोठी व्यक्ती तुम्हाला ती बातमी बघायला बोलावते का? बोलवत असेल, तर उत्तम… पण बोलवत नसेल, तर आता तुम्ही जाऊन बाबांना, आजोबांना आवर्जून सांगा की, मलाही बातम्या बघायच्या आहेत. तुम्ही मोठे होत आहात. मग तुम्हालाही आपल्या अवती-भवती काय काय चाललं आहे हे माहिती हवंच.

सध्या बघा दुकानांना, हॉटेलला आग लागण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. आता तुम्ही म्हणालं की, मग आम्ही थोडे आग विझवायला जाणार? कबूल आहे की, तुम्ही आग विझवायला जाणार नाही. पण चुकून आपल्या जवळपास आग लागलीच, तर काय करायला पाहिजे, काय काळजी घ्यायला हवी हे महत्त्वाचं आहे. म्हणजे कधी आपण एखाद्या दुकानात असू, तिकडे आग लागली तर…. खरंतर अशी वेळ कोणावर यायला नको. पण चुकून आलीतर… आपण आपलं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचे संरक्षण कसे करायला हवं हे माहिती पाहिजे ना.

आता आग कशामुळे लागते बरं…तर बऱ्याच वेळा आग ही ज्वलनशील पदार्थ, शॉट सर्किटमुळे किंवा आपल्या दुकानाचे, हॉटेलचे फायर ऑडिट केलेलं नसतं म्हणून लागते. याचा अर्थ आपण आपल्या दुकानाची, तत्सम जागेची नियमित स्वरूपात पाहणी करून सर्व आलबेल आहे की नाही हे बघणे. गरजेचे आहे.

आता सगळी काळजी घेऊनही आग लागली, तर जसे आपण पोलिसांची मदत हवी असल्यास १०० या नंबरवर डायल केल्यानंतर आपल्याला पोलिसांची मदत मिळते. याच पद्धतीनेअग्निशमन दलाची , फायरब्रिगेडची मदत हवी असल्यास आपल्याला १०१ हा नंबर डायल करावा लागतो. आगीची घटना घडल्यानंतर १०१ नंबरवर कॉल केल्यानंतर फायर ब्रिगेडची टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचत असते.

पण आतातर देशभरात आपत्कालीन परिस्थितीत त्याचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने एक देश एक आपत्कालीन नंबर (देशभरात एकच इमर्जन्सी नंबर) ११२ लॉन्च केला आहे. ही फोन सेवा २४ तास आणि आठवड्यातील सातही दिवस काम करते. आपत्कालीन नंबर ११२च्या द्वारे ऑन द स्पॉट फायर ब्रिगेड, मेडिकल आणि पोलीस तुमची मदत करू शकतात. तुम्ही ज्या राज्यात आहात तेथील स्थानिक भाषेचा अथवा इतर भाषेचा वापर करून तुम्ही बोलू शकता. हिंदी व इंग्रजी तुम्ही मदत मागू शकता.

आग कोणत्या कारणामुळे लागली हा नंतरची गोष्ट भाग; मात्र आगीच्या ठिकाणी जर आपण उपस्थित असू तर तत्काळ तिथून आपल्याला बाहेर कसं पडता येईल, याबद्दल प्रयत्न करणं आवश्यक असतं. प्रत्येक इमारतीमध्ये इमर्जन्सी एक्झीट असते. अशावेळी लिफ्टचा वापर न करता जिन्याच्या वापर करून आपण तत्काळ तेथून बाहेर पडणं आवश्यक असतं. अशावेळी आग लागलेली इमारत जर घर असेल, तर बाहेर पडताना गॅस, लाईटचे स्वीच वगैरे सर्व बंद आहेत का? याची खात्री करून घेणं अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. कारण अशी कोणती गोष्ट चालू राहिली, तर आगीचा भडका होऊन आग आणखीन वाढण्याची शक्यता वाढते.

पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिस्थितीमध्ये घाबरून न जाता संयमाने आणि धीराने तिथून बाहेर पडणे आवश्यक आहे. तुम्ही आहात त्या ठिकाणी धुराचे प्रमाण जास्त असेल, त्याचा तुम्हाला त्रास होत असेल, तर ओला कपडा तोंडावर बांधून त्याच्यापासून आपलं संरक्षण करावं. धूराचे प्रमाण जास्त असेल, तर जमिनीवरून रांगत-रांगत जाऊन त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा.

आजकाल इमारतच असेल की, मॉलमध्ये आपल्या सुरक्षेचे अनेक यंत्र लावलेली असतात. त्याच ठिकाणी रिसेप्शन एरियामध्ये संपूर्ण नकाशा असतो. त्या नकाशाचा वापर करून तुम्ही तिथून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

एखाद्या ठिकाणी आग लागल्याची माहिती तुम्हाला मिळतात त्यासंबंधीची माहिती तेथील सुरक्षा अधिकाऱ्यांना तत्काळ द्या. ती माहिती देताच त्यासंबंधीच्या उपाय योजना लवकरात लवकर सुरू करून अनेकांचा जीव वाचविण्यास आपण मदत करू शकतो आणि आग आटोक्यात येऊ शकते. अनेक ठिकाणी फायर अर्लाम असतात ते दाबून इतरांनाही धोक्याची सूचना देता येऊ शकते, असं केल्याने स्वतःच्या जीवासोबत इतरांचेही प्राण वाचवले जाऊ शकतात.

अनेकदा परिस्थिती अशी असते की, आपल्याला अपघात टाळता येत नाही; मात्र तरीही अनेकदा स्वतःची काळजी घेऊन इतरांना त्यातून बाहेर काढण्यास मदत करता येऊ शकते. अशावेळी पोलीस, अग्निशमन दल यांना तातडीने यासंबंधीची माहिती सुद्धा पण देऊ शकतो. एक सामान्य नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे व सामान्य नागरिक म्हणून आपले सहकार्य मिळालं, तर प्रशासनासही त्या परिस्थितीत नियंत्रण मिळायला खूप मोठं सहकार्य मिळते. इमारतीचे फायर ऑडिट होणे सुद्धा तेवढेच गरजेचे आहे. ज्या पद्धतीने आपण इतर गोष्टींची काळजी घेतो त्याच पद्धतीने याची काळजी घेणे सुद्धा तितकचं महत्त्वाचं आहे. या व अशा अनेक गोष्टींची काळजी घेऊन आपण नक्कीच आग लागण्याचे प्रमाण आणि त्यानंतर होणारी हानी मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो.

अनेक पाश्चिमात्य देशांमध्ये किंवा आपल्याकडील हॉटेल्समध्ये सुद्धा काही कारणांमुळे धूर झाला, तर लगेच अलार्म अॅक्टिव्हेट होतो. त्यामुळे तिकडे संभाव्य धोका निर्माण होत आहे का, यासंबंधी सूचना लगेचच प्रशासनास मिळत असते आणि संभाव्य धोका कमी होतो.

आता फोनवर आग लागण्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी जी लाल रंगाची असते. त्यावर शिड्या असतात. पाण्याचे टँकर असतात. ती सुरू होते आणि चालू पडते. त्यावेळी अग्निशमन दलाचे लोकं पटकन चालत्या गाडीवर चढतात. पूर्वी गाडीला घंटा बांधलेली असायची. आता इलेक्ट्रिक घंटेचा गजर चालू असतो. जेणे करून रस्त्यावरील इतर गाड्या बाजूला होऊन आग विझवणाऱ्या गाड्या आग लागलेल्या ठिकाणी आधी पोहोचतील आणि गाडी तिकडे घटनास्थळी पोहचली की, फायरमन लगेच आगीवर पाण्याचे फवारे मारायला सुरुवात करतात. तर काही फायरमन कधी शिडीवर चढून, तर कधी जिन्यावरून जाऊन तिकडे अडकलेल्या लोकांना सोडवतात. अगदी आपले प्राण संकटात घालून ते आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्यांना सोडविण्याचा प्रयत्न करतात. हे प्रशिक्षण त्यांना नोकरी लागली की सुरू होते आणि नियमित स्वरूपात त्याची तयारी, पूर्वतयारी ते करत असतात.

म्हणून असं वाटतं की, अगदी शाळा, कॉलेजमध्ये असल्यापासून आग किंवा इतर संकटात आपण कसं वागायला हवं, याचं ट्रेनिंग घ्यायला, द्यायला हवं. आपत्ती व्यवस्थापनाचे धडे द्यायला हवेत. म्हणजे कुठलीही परिस्थिती आवाक्यात राहते.

तेव्हा अशी आपत्कालीन परिस्थिती सावरण्यासाठी प्रत्येकालाच शारीरिक आणि मानसिक स्थिती भक्कम ठेवायला हवी. बरोबर ना?

jyotikapile@gmail.com

logo
marathi.freepressjournal.in