कमलीची करामत

कमलीने छोटा ढोल वाजवायची सुरुवात केली होती. तर तिची आई इतर तयारी करू लागली होती. त्यांच्या खेळाची. कसला खेळ?
कमलीची करामत
Published on

कथा

ईशान पुणेकर

कमलीने छोटा ढोल वाजवायची सुरुवात केली होती. तर तिची आई इतर तयारी करू लागली होती. त्यांच्या खेळाची. कसला खेळ?

कमली डोंबारी होती. ती एक छोटी मुलगी होती. सात- आठ वर्षांची. पण चुणचुणीत. दोन वेण्या घातलेली. पण तिचे केस मात्र भुरभुरत होते . आता ती त्यांचा खेळ सुरू करणार होती. वेगवेगळ्या उड्या, कोलांट्या उड्या आणि शेवटी दोरीवरची कसरत. दोन बाजूंना दोन-दोन बांबू आणि त्याला बांधलेला जाड दोरखंड. कमली त्या बांधलेल्या दोरावरून चालायची. अगदी सहज. तोल सांभाळण्यासाठी हातात एक छोटा बांबू . बस इतकंच. मग खेळ संपला की ती दोरावरून खाली उतरायची आणि थाळी घेऊन लोकांना पैसे मागायची . तिच्या मेहनतीचे पैसे. नुसती भीक मागण्यापेक्षा हे बरं.

तो एक मोठा रस्ता होता. आतल्या बाजूचा. दोन्ही बाजूंना बिल्डिंग्ज. आईचे बांबू बांधून झाले. मग आई ढोल वाजवू लागली. कमली दोरीवर चढली. एकदम बिनधास्त. एवढ्या उंचावरून, पाय पुरणार नाही अशा त्या दोरावरून चालताना ती डगमगत होती. पण मुळीच घाबरत नव्हती.

फार लोक जमले नव्हते. थोडीफार मुलं होती. काही बायका खिडकीतूनच पाहत होत्या. काही मुलं टेरेसवरून पहात होती. खेळ संपला. कमली खाली उतरली. लोक पांगायला लागले. तिला कोणीही पैसे दिले नाहीत. ती हिरमुसली.

त्यांनी खेळ थांबवला. कमली इकडेतिकडे फिरू लागली. फिरत फिरत ती पलीकडच्या गल्लीमध्ये गेली. त्या गल्लीमध्ये एक वेगळीच गडबड चालू होती.

एक मोठी भिंत होती. भिंतीच्या मागे एक घर होतं आणि त्याला असलेल्या छपराजवळच्या एका कट्ट्यावर छोटीशी माऊ होती. काळ्या-पांढऱ्या ठिपक्यांची, नाजूक, गोड. तिथे कशी पोहोचली होती कोणास ठाऊक; पण आता तिला खाली उतरायचं होतं. नीटसा आधार नव्हता की वाट नव्हती. त्यात ती छोटी. बिचारी घाबरत होती. उडी मारायला ती तयार नव्हती.

खाली तिची छोटी मालकीण तिला हाक मारत होती. तिचं नाव रमा. बरोबर रमाची छोटुकली मित्रमंडळी. मोठी माणसं कोणी नव्हती. आता काय करायचं? माऊला रडता येत असतं तर ती रडली असती; पण मांजरं रडत नाहीत. रमाला मात्र रडू येऊ लागलं होतं.

आता यावर उपाय म्हणजे आईला बोलवणे; पण आई तिलाच ओरडली असती- एक माऊ सांभाळता येत नाही! मी तुला कशी सांभाळते ? रमाचं रडू पाहून कमलीला वाईट वाटलं. तीही तिच्याच वयाची ना. पण ती तरी काय करू शकणार होती ?

क्षणभर तिला वाटलं, काहीतरी करून माऊ खाली यावी. असं तर सगळ्याच पोरांना वाटत होतं. पण करायचं काय, कसं आणि कोणी ?

त्या भिंतीच्या आतलं घर बंद होतं. जवळपास मोठी माणसं नव्हती. शिडीवरून त्या माऊला खाली आणता आलं असतं. पण तिथे आसपास कुठे शिडी नव्हती. वर जायचं कसं ?

आणि कमलीची ट्यूब पेटली. ती पळतपळत तिच्या आईकडे गेली. त्या दोघी त्यांचं 1 साहित्य घेऊन पुन्हा इकडे आल्या. तिचं आणि तिच्या आईचं काही बोलणं झालं.

मुलं पाहू लागली. आता काहीतरी चमत्कार घडणार होता. काहीतरी गंमत होणार होती. कदाचित- कदाचित माऊ खाली येणार होती.

मुलांना कळलं, कमली डोंबारी आहे. आता ती बहुतेक दोरी बांधेल आणि दोरीवरून चालत माऊकडे जाईल आणि तिला खाली आणेल. पण सगळं एवढं सोपं असतं का ?

कमलीच्या आईने वेगळीच ट्रिक वापरली. तिने एक बांबू घेतला. फक्त एक बांबू. तो तिने भिंतीला टेकवला व घट्ट धरला. त्या एका बांबूवरून कमली सरसर वर चढली. भिंतीवर पोचली. आता भिंतीवरून माऊकडे पोचायचं होतं. आणि तेच अवघड होतं. कारण ती भिंत अतिशय अरुंद होती. भिंतीवरून खाली पडलं तर काही खरं नव्हतं. भिंत दहाएक फूट उंच होती. पण कमलीला त्यात काय अवघड ! ते तर तिचं रोजचंच काम. कमली आरामशीर त्या भिंतीवरून चालत पलीकडे गेली. दोरीपेक्षा भिंत बरी. ती माऊला घ्यायला खाली वाकली, तर माऊ लांब पळाली. कमली तिच्यासाठी अनोळखी होती. ती काही तिच्याकडे येईना. आता काय करायचं ?

मग रमाचं डोकं चाललं. ती घरी गेली. घरून एक फिकट हिरवी बास्केट घेऊन आली. ती बास्केट म्हणजे माउचं घरच होतं. त्याच्यामध्ये झोपायला तिला खूप आवडायचं.

कमली परत मागे आली. रमाने त्या बास्केटला दोरी बांधली आणि दोरी फिरवून वर उभ्या असलेल्या कमलीकडे टाकली. पण ती दोरी तिच्या हातामध्ये आली नाही. असं दोन-तीन वेळा तरी झालं. एकदा दोरी धरण्याच्या नादात कमली खालीच पडणार होती. त्यावेळी तिची आई ओरडली आणि तिने ती बास्केट स्वतःच्या हातात घेतली आणि एका हाताने दोरी एका झटक्यात वर कमलीकडे फेकली. तिने ती सहजपणे धरली आणि ती बास्केट वर घेतली. मग ती बास्केट हातात घेऊन कमली त्या भिंतीवरून चालू लागली. माऊजवळ पोचली आणि तिने माऊला हाक मारली. ती बास्केट दाखवली. माऊताई खुश ! तिचं घर आलं होतं. मग ती आली आणि टुणकन उडी मारून तिच्या बास्केटमध्ये बसली. मग कमली परत ती बास्केट घेऊन भिंतीवरून उलट चालत आली आणि जिथे तिची आई उभी होती तिकडे तिने ती बास्केट हळूहळू दोरीने खाली सोडली. बास्केट खाली पोचली आणि रमाने माऊला जवळ घेतलं.

अजून एक गंमत होती. रमा बास्केट घेऊन आली तेव्हा तिच्यामागे तिची आईसुद्धा आली होती. कारण ही पोरगी बास्केट घेऊन चालली कुठे ? असा प्रश्न तिला पडला होता.

आईने तिथे आल्यावर ते सगळं दृश्य पाहिलं होतं. पण यावेळी ती रमाला ओरडली नाही. आईने माऊला जवळ घेतलं. माऊला आईजवळ जास्त आवडायचं. तिला ते जास्त सुरक्षित वाटायचं. तुम्हाला तुमच्या आईकडे वाटतं तसं. ती आईला बिलगली. नाजूकपणे ओरडली. ते पाहून रमाही आईला चिकटली.

आणि नंतर काय झालं माहितीये ? आईने कमलीला पाचशे रुपये बक्षीस म्हणून दिले. आजचा दिवस कमलीसाठी भारी होता. आधी तर तिला काहीच पैसे मिळाले नव्हते.तिच्या नजरेत एक वेगळीच चमक होती. आणि तिच्या आईच्या डोळ्यांत पोरीचं कौतुक. कमली आईला चक्क ‘थँकू’ म्हणाली.

माऊसुद्धा मनातल्या मनात कमलीला थँकू म्हणाली असावी. तुम्हाला काय वाटतं ?

पुरस्कारप्राप्त लेखक.

Bip499@hotmail.com

logo
marathi.freepressjournal.in