

कथा
हार्दिका
स्वतःचा स्वीकार सांगणारी ही एक अत्यंत भावुक आणि हृदयस्पर्शी गोष्ट
वाकडची संध्याकाळ तशी भारीच असते. नदीकाठची झाडं आणि त्यांच्या सावल्या पाण्यात रेंगाळत असायच्या. गावातली सगळी मुलं तिथे लंगडी, विटीदांडू किंवा सूरपारंब्या खेळायला जमायची. पण या गदारोळात एक कोपरा नेहमी शांत असायचा. तिथे एका मोठ्या दगडावर बसलेला असायचा रवी.
रवी १२-१३ वर्षांचा, अतिशय गोड डोळ्यांचा मुलगा. पण रवी इतरांसारखा नव्हता. जन्मापासूनच त्याचा उजवा पाय थोडा आखूड आणि अशक्त होता. त्यामुळे तो इतरांसारखा सुसाट पळू शकत नव्हता, झाडावर सरसर चढू शकत नव्हता. मुलं जेव्हा खेळात दंग असायची, तेव्हा रवी फक्त त्यांच्याकडे बघून हसायचा. त्याला कधी राग यायचा नाही, पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात एक सळसळणारी रुखरुख कायम असायचीच.
‘रवी, अरे चल रे, आज आपण लंगडी खेळू!’ त्याचा मित्र बंडू ओरडला.
रवीने आपला पाय थोडा मागे ओढला, कपडे नीट केले आणि हसून म्हणाला, ‘नाही रे बंडू, तुम्ही खेळा. मी इथूनच बघतो. मी आलो की तुमचा खेळ रेंगाळतो रे.’
रवीचं हे बोलणं ऐकून बंडू काही बोलला नाही, पण रवीच्या मनात काहीतरी तुटत होतं. ‘मी का असा वेगळा आहे? देवाने मला सगळ्यांसारखं का नाही बनवलं?’ हा प्रश्न त्याला रोज रात्री छळायचा. तो स्वतःला आरशात बघायचा आणि त्याचे डोळे भरून यायचे. त्याला स्वतःच्याच पायाची लाज वाटायला लागली होती. तो स्वतःलाच गुन्हेगार मानायचा.
एक दिवस गावात नदीच्या जवळपास मोठी जत्रा भरली. जत्रेत मुलांसाठी पळण्याची आणि उंच उडी मारण्याची स्पर्धा होती. रवीची खूप इच्छा होती की त्यानेही काहीतरी करावं, पण स्वतःच्या त्रुटीची जाणीव त्याला मागे खेचत होती. तो जत्रेच्या एका कोपऱ्यात, एका झाडाखाली बसून राहिला. तिन्हीसांजा झाल्या, दिव्यांची रोषणाई झाली. खेळ संपले, बंडूला पळण्याच्या स्पर्धेत पहिलं बक्षीस मिळालं. सगळी मुलं बंडूचं कौतुक करत होती. रवी दूरूनच हे सगळं बघत होता. त्याच्या डोळ्यातून घळघळा पाणी वाहत होतं. तो स्वतःचा पाय हाताने दाबत म्हणाला, ‘हा पाय असा नसता, तर आज मी पण तिथे असतो...’
तो उदास होऊन तिथून उठला आणि नदीकाठच्या त्या शांत दगडावर जाऊन बसला. वारा सुटला होता. रवीने आपल्या खिशातून एक छोटी लाकडी बासरी काढली. ही बासरी त्याच्या आजोबांनी त्याला दिली होती. रवी जेव्हा खूप दुःखी असायचा, तेव्हा तो बासरी वाजवायचा.
त्याने बासरी ओठाला लावली आणि एक सूर छेडला. त्या सुरांमधून रवीच्या मनातील सगळं दुःख, त्याचा एकटेपणा आणि ‘मी इतरांसारखा का नाही’ ही त्याची वेदना बाहेर पडत होती. बासरीचा आवाज इतका आर्त आणि सुंदर होता की नदीचं पाणीही शांत झालं. झाडावरची पाखरंही त्यांचा किलबिलाट थांबवून तो सूर ऐकू लागली. रवी डोळे बंद करून पूर्ण मनापासून वाजवत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि बासरीच्या छिद्रांवर पडत होते.
तेवढ्यात तिथून गावातील विठोबा माऊलींचे एक जुने कीर्तनकार, हरी बाबा चालले होते. विठूची बासरी ऐकून त्यांचे पाऊल थांबले. ते स्तब्ध होऊन रवीच्या पाठीशी उभे राहिले. रवीची बासरी संपली, त्याने डोळे पुसले. हरी बाबांनी रवीच्या खांद्यावर हात ठेवला. रवी दचकला आणि लगबगीने उभा राहण्याचा प्रयत्न करू लागला.
‘बस, बस रवी बाळा, उठू नकोस,’ बाबा मऊ आवाजात म्हणाले. ‘काय वाजवलंस रे! माझं काळीज भरून आलं. इतकी सुंदर बासरी तर तरबेज कलाकारालाच जमते.’
रवीने मान खाली घातली आणि हळूच म्हणाला, ‘काय फायदा बाबा या बासरीचा? मी बंडूसारखा पळू शकत नाही. मी धावण्याच्या स्पर्धेत कधीच जिंकू शकणार नाही. देवाने मला वेगळं आणि अपूर्ण बनवलंय. मला स्वतःचाच राग येतो.’
हरी बाबा हसले. त्यांनी रवीच्या बाजूला बसून त्याचा हात आपल्या हातात घेतला. ते म्हणाले, ‘रवी, एक गोष्ट सांगतो, नीट ऐक. देवाने निसर्गात किती वेगवगेळी झाडं बनवली आहेत रे? आंब्याचं झाड गोड आंबे देतं. पण आंब्याचं झाड कधी बांबूच्या झाडासारखं उंच आणि लवचिक असतं का? बांबूला कधी आंबे येतात का?’ रवीने नकारार्थी मान हलवली.
‘मग बांबूचं झाड रडत बसतं का, की मला आंबे का नाही आले? नाही ना! बांबू स्वतःचा स्वीकार करतो आणि जेव्हा वारा येतो, तेव्हा त्याच बांबूतून देवाची बासरी बनते. रवी, तू इतरांपेक्षा वेगळा आहेस, कारण देवाने तुला पळण्यासाठी नाही, तर लोकांच्या मनाला स्पर्श करण्यासाठी बनवलं आहे. तुझा हा पाय तुझी कमजोरी नाही, तर ती तुझी ओळख आहे. जोपर्यंत तू स्वतःच्या या त्रुटीचा स्वीकार करणार नाहीस, तोपर्यंत तुला तुझ्या आत दडलेला हा सुंदर सूर गवसणार नाही. स्वतःला ओळख, स्वतःवर प्रेम कर.’
बाबांचे शब्द थेट रवीच्या काळजाला भिडले. त्याला जाणवलं की तो आजपर्यंत नसलेल्या गोष्टीसाठी रडत होता, पण जे त्याच्याकडे आहे- ती अद्भुत कला त्याची त्याला किंमतच नव्हती. त्याने स्वतःच्या पायाकडे बघितलं. पहिल्यांदाच त्याला त्या पायाचा राग आला नाही. त्याने मनोमन स्वीकारलं, ‘हो, मी वेगळा आहे, मी पळू शकत नाही, पण मी रवी आहे आणि मी सुंदर बासरी वाजवू शकतो.’
पुढच्याच रविवारी गावात पुन्हा भजन होतं. हरी बाबांनी रवीला बोलावून घेतलं. संपूर्ण गाव गोळा झालं होतं. रवी मध्यभागी बसला. त्याने डोळे मिटले, स्वतःच्या मनातील सगळी भीती आणि न्यूनगंड काढून टाकला. त्याने स्वतःला जसा आहे तसा स्वीकारलं होतं. त्याने बासरी ओठाला लावली आणि वाजवायला सुरुवात केली. यावेळच्या सुरांमध्ये दुःख नव्हतं, तर एक अथांग आनंद आणि शांतता होती. बासरीचा तो गोड आवाज ऐकून जत्रेत पळणारा बंडू, खेळणारी सगळी मुलं आणि गावातील मोठी माणसं स्तब्ध झाली. कित्येकांच्या डोळ्यातून पाणी आलं. रवीची बासरी थेट देवाच्या गाभाऱ्यात पोहोचली होती.
बासरी संपली आणि पूर्ण गावात टाळ्यांचा कडकडाट झाला. बंडू पळत आला आणि त्याने रवीला घट्ट मिठी मारली, ‘रवी, तू तर कमाल आहेस रे! आम्हाला पळता येतं, पण असं वाजवता येत नाही आणि अनेक मनं जिंकताही येत नाही. तू जिंकलंस रे!’
रवीच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आज त्याला स्वतःचा खूप अभिमान वाटत होता. त्याने स्वतःच्या त्रुटीचा स्वीकार केला होता आणि त्याच स्वीकारातून त्याला त्याचं वेगळेपण, त्याचं अस्तित्व मिळालं होतं. तो मनातून मुक्त झाला होता.
krantip183@gmail.com