

आरजे ज्ञानेश्वरी वेलणकर
आई आणि मुलीचं नातं कसं असतं ? या प्रश्नाचं उत्तर कदाचित कोणत्याही एका व्याख्येत बसणार नाही. माझं आणि माझ्या आईचं नातंही असंच काहीसं आगळंवेगळं आणि मजेशीर आहे. आमच्याकडे पाहिलं तर आम्ही कधी जगातील सर्वात घट्ट मैत्रिणी वाटतो, तर कधी एकमेकींच्या झिंजा उपटू अशा भांडणाऱ्या बहिणी ! आमच्यात संवाद जसा आहे, तसाच हक्काचा वादही आहे. पण या सगळ्या पलीकडे जाऊन जेव्हा मी शांतपणे विचार करते, तेव्हा मला जाणवतं की माझी आई ही केवळ एक व्यक्ती नाही, तर ती एक 'जाणीव' आहे. मी सुरक्षित असल्याची, माझ्या पडत्या काळात मला सावरणारे कुणीतरी खंबीर हात पाठीशी असल्याची आणि माझ्या जगण्याला खऱ्या अर्थाने दिशा देणारी ती एक शक्ती आहे.
आयुष्याच्या प्रवासात असे अनेक वळण येतात जिथे आपण स्वतःला हरवून बसतो. माझ्याही आयुष्यात असा एक काळ आला होता, जेव्हा मी पूर्णपणे खचले होते. पराभवाचं ओझं इतकं मोठं होतं की माझ्यातली उमेद जणू संपलीच होती. अशा त्या हरलेल्या आणि हरवलेल्या क्षणी, माझ्या आईने जे केलं ते मी कधीच विसरू शकणार नाही. ती स्वतः आतून कदाचित घाबरली असेल, पण बाहेरून तिने तिच्यातल्या 'आई'ला कमालीचं खमकं ठेवलं. ती तुटली नाही, ढळली नाही. उलट, तिने तिच्या मायेच्या पंखाखाली मला असं काही सावरलं की, माझ्यातल्या लेकीला एक नवीन आयुष्य, एक नवीन उमेद मिळाली. आईचं ते खंबीर असणं त्यावेळी माझं औषध ठरलं.
ती कायमच माझं आभाळ बनून राहिली आहे. असं आभाळ, ज्याने माझं संपूर्ण अस्तित्व व्यापून टाकलं आहे. ज्या आभाळाकडे मान वर करून बघावं आणि जगण्याची नवी स्फूर्ती घ्यावी, अशी ती माझी प्रेरणा आहे. अनेकदा जेव्हा मी एखाद्या समस्येने ग्रासलेली असते, तेव्हा ती सहजपणे म्हणते, "चलता हैं गं, काही नाही, सगळ्यांसोबत कधीतरी असं होतंच, हरून जायचं नाही!" सुरुवातीला तिचे हे शब्द ऐकले की मला राग यायचा. मला वाटायचं की, हिला माझं दुःख खरंच कळतंय का? हिला हे इतकं सोपं का वाटतंय? पण काळानुसार मला उमजत गेलं की, ती हे सहजपणे म्हणू शकते कारण तिने स्वतःच्या आयुष्यात अनेक चटके सोसले आहेत. तिला माझं दुःख कळत नाही असं नाही, तर माझ्या शब्दांशिवाय, केवळ माझे डोळे बघून माझी मनस्थिती समजू शकणारी ती या जगातील एकमेव व्यक्ती आहे.
मला आणि माझ्या आईला एक गोष्ट एकत्र करायला खूप आवडायची ती म्हणजे एखाद्या मॉलमध्ये बसून शांतपणे लोकांचे निरीक्षण करणं. कदाचित हे ऐकायला विचित्र वाटेल, पण आईमुळेच मला यातली मजा कळली. समोरून जाणाऱ्या माणसांकडे बघून 'हा माणूस कुठे जात असेल ?', 'ती व्यक्ती आयुष्यात काय करत असेल?' किंवा 'ह्या बाईचा चेहरा इतका त्रासिक का असावा?' अशी गमतीशीर अनुमानं काढण्यात आम्हाला अतिशय मजा यायची.
काही गोष्टी फक्त आईसोबतच करण्यात एक वेगळाच जिवंतपणा असतो. एखादं प्रदर्शन बघायला जाणं असो किंवा मॉलमध्ये फिरणं; तिच्याशिवाय गेलं की सगळं अगदी ओकंबोकं वाटतं. लहानपणी मला आईच्या पोटावर झोपायला खूप आवडायचं, आजही ती ऊब खूप आठवते; फक्त आता आम्हा दोघांचेही वय आणि वजन वाढल्याने ती गोष्ट शक्य होत नाही, पण त्या आठवणी मात्र मनात घर करून आहेत. या मातृदिनानिमित्त मला तिला इतकंच सांगायचं आहे की, आई आहे म्हणून माझ्या अस्तित्वाचा हा कॅनव्हास इतका रंगीत आहे.