आयुष्याचा डोलारा

आई... हा फक्त एक शब्द नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सावरून धरणारी एक अफाट शक्ती आहे.
आयुष्याचा डोलारा
आयुष्याचा डोलारा
Published on

कविवर्य प्रवीण झावरे

आई... हा फक्त एक शब्द नाही, तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला सावरून धरणारी एक अफाट शक्ती आहे. जग कितीही मोठं असलं, तरी आपल्या लेकरासाठी आईचं मन हे त्याहूनही विशाल असतं. तिच्या मायेच्या सावलीतच आपण जगायला शिकतो आणि ठेच लागल्यावर पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळवतो.

माझा जन्म एका साधारण मराठी कुटुंबात झाला. परिस्थिती हलाखीची होती आणि प्रत्येक दिवस हा एक नवा संघर्ष होता. पण त्या संघर्षांच्या झळा माझ्या आईने कधीच मला सोसाव्या लागणार नाही याची काळजी घेतली. घरात अडचणींचा डोंगर असायचा, पण माझ्या शिक्षणाच्या बाबतीत तिचा निर्धार मात्र हिमालयासारखा अढळ होता. स्वतःच्या गरजांना मुरड घालून तिने मला उत्तम शिक्षण मिळावं म्हणून अतोनात कष्ट केले. कधी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, तर कधी परिस्थितीशी दोन हात केले, पण माझ्या स्वप्नांच्या आड तिने कधीच गरिबीची भिंत उभी राहू दिली नाही.

बारावी पूर्ण झाल्यावर मी शिक्षणासाठी पुण्यात आलो. पहिल्यांदाच घराचा उंबरा ओलांडून इतक्या लांब राहत होतो. नवीन शहर, नवीन माणसं आणि हाताशी असलेलं स्वातंत्र्य, अशा वेळी मन भरकटण्याची शक्यता असते. पण त्या वेळी आईचं एक वाक्य माझ्या कानात कायम घुमत राहिलं "एक वेळ देव चुकला असेल हे मी मान्य करेन पण माझा मुलगा कधी चुकेल हे मला मान्य होणार नाही."

हे केवळ शब्द नव्हते, तर तिने माझ्यावर ठेवलेली ती नितांत श्रद्धा होती. त्या विश्वासाने मला आयुष्यात अनेक चुकीच्या वाटांवरून मागे खेचलं. कोणताही निर्णय घेताना मनात एकच विचार यायचा "काहीही झालं तरी आईचा विश्वास तुटता कामा नये." कदाचित माझ्या आयुष्यातील यशाचं आणि सुसंस्कारांचं सर्व श्रेय त्या एका वाक्यालाच जातं.

आजही पुण्यातला तो एक प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा उभा राहतो, सुरुवातीचे दिवस होते आणि खिशात पैशांची ओढाताण होती. एका रात्री अचानक माझी तब्येत बिघडली, तापाने अंग फणफणत होतं. हॉस्टेलच्या त्या छोट्याशा खोलीत मी पूर्णपणे एकटा होतो. बाहेर पावसाची संततधार सुरू होती आणि आत माझ्या डोळ्यांतून पाणी वाहत होतं. रात्री उशिरा आईचा फोन आला. मी आवाजातला अशक्तपणा लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आईला लेकराच्या मनातलं कधी लपून राहिलंय का ? ती फक्त एवढंच म्हणाली, "बाळा, स्वतःची काळजी घे... तू खंबीर राहिलास तरच माझं जग सुरक्षित राहील." त्या क्षणी शेकडो किलोमीटर दूर असलेली आई जणू माझ्या उशाशी येऊन बसल्याचा भास झाला. त्या रात्री औषधांपेक्षा तिच्या मायेच्या शब्दांनीच माझी वेदना कमी केली.

आई म्हणजे काय ? आई म्हणजे आपल्या प्रत्येक वेदनेवर फुंकर घालणारा मायेचा स्पर्श, आई म्हणजे भरकटलेल्या अंधारातही "मी आहे ना" असं सांगणारा धीराचा आवाज, आणि आई म्हणजे स्वतः जळून लेकराच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारी सात्विक समई !

माझ्या लेखन प्रवासाबद्दल खरं सांगायचं तर, स्त्रियांवर लिहिणं हा निवडलेला विषय नाही, तर माझ्या आयुष्यानेच मला दिलेला एक अंतर्मनातून आलेला प्रवास आहे. लहानपणापासून मी पाहिलंय एक स्त्री किती शांतपणे जग सांभाळते, किती न बोलता सगळ्यांचं ओझं स्वतःवर घेत असते. तिच्या डोळ्यांमध्ये थकवा असतो, पण त्या थकव्यापलीकडे एक तेज असतं ते तेज शब्दांत उतरवावं असं वाटतं.

माझी खरी प्रेरणा म्हणजे माझी आई. तिने मला कधी मोठमोठ्या गोष्टी शिकवल्या नाहीत, पण तिच्या साधेपणात आणि सामर्थ्यातून मी आयुष्याचं खऱ्या अर्थाने शिक्षण घेतलं. ती रागावायची, काळजी करायची, पण तिच्या प्रत्येक कृतीत एक निःस्वार्थ प्रेम असायचं. तिने शिकवलं- 'कोणावरही अन्याय करू नकोस, समजून घे, कारण प्रत्येकाच्या पाठीमागे एक कथा असते.' आज जेव्हा मी स्त्रियांवर लिहितो, तेव्हा माझ्या प्रत्येक शब्दामागे तिचा आशीर्वाद असतो. स्त्री म्हणजे फक्त एक व्यक्तिरेखा नाही, ती भावना आहे, ती प्रेरणा आहे, ती प्रत्येक जगण्याचं मूळ आहे.

आईनं मला शिकवलं की, जगातलं खरं सामर्थ्य माणसाच्या आवाजात नाही, तर त्याच्या सहनशक्तीत आणि ममतेत असतं आणि ते गुण स्त्रीमध्ये सर्वाधिक असतात. म्हणूनच, जेव्हा मी स्त्रियांवर लिहितो, तेव्हा मी फक्त त्यांचं कौतुक करत नाही मी माझ्या आईचं प्रतिबिंब शोधत असतो.

एकंदरीत सांगायचं तर 'माझ्या लेखणीतली प्रत्येक स्त्री ही माझ्या आईच्या संस्कारांची सावली आहे.' आजच्या दिवशी मला एवढंच सांगावंसं वाटतं खिशाला छिद्र होतं, तरी आईने स्वप्नं कधी फाटू दिली नाहीत, परिस्थितीची चटके सोसले, पण माझ्या वाटेवरची सावली हटू दिली नाही. तिच्या काळजाचा तुकडा मी, माझ्यासाठी ती देवाहून थोर आहे, माझ्या आयुष्याचा सारा डोलारा, तिच्याच आशीर्वादावर उभा आहे!

logo
marathi.freepressjournal.in