अंतर्मुख करणारे आहाराचे राजकारण

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी 'जे मांसाहार करतात ते देशद्रोही आहेत' असे वक्तव्य केले. गेल्या काही वर्षांत राजकीय पटलावर मासांहार करणाऱ्यांबद्दल केली जाणारी अशी वक्तव्यं नवीन नाहीत.
अंतर्मुख करणारे आहाराचे राजकारण
Published on

बुककट्टा

संजय सावरकर

काही दिवसांपूर्वी भाजप नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी 'जे मांसाहार करतात ते देशद्रोही आहेत' असे वक्तव्य केले. गेल्या काही वर्षांत राजकीय पटलावर मासांहार करणाऱ्यांबद्दल केली जाणारी अशी वक्तव्यं नवीन नाहीत. त्यामुळे मांसाहार हा जणू भारतीय प्रकार नसून तो इतर लोकांनी भारतात आणला आहे, असे नंतर पाठ्यपुस्तकात वाचायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको. भारत हा बहुसंख्य मांसाहार करणाऱ्यांचा देश असूनही भारत शाकाहारी आहे हे दाखवण्याचा अट्टाहास गेली काही वर्षं सातत्याने सुरू आहे.

त्याचा परिणाम अर्थातच लोकांच्या जेवणावर झालेला दिसतो. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार वगैरे वारी मांसाहार केला जात नाही. 'आज मंगळवार असून ऑम्लेट खातोस?' असा प्रश्न ऐकणे सवयीचे झाले आहे. सातत्याने शाकाहाराचे महत्त्व लोकांच्या गळी एवढे उतरवले जात आहे की, मांसाहार करणं हेच लोकांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करत आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवरच गेल्या दहा-बारा वर्षांत विविध राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदीचे कायदे करण्यात आले किंवा असलेले कायदे अधिक कडक करण्यात आले. यातून अल्पसंख्यांकांचे झुंडबळीही गेले. हिंसेला लोकांचा पाठिंबा नाही. मात्र गोहत्या व गोवंश हत्या बंदी याला मात्र बहुसंख्यांकांचं समर्थन आहेच. कारण या प्रश्नावर भारताची मानसिकताच जाणीवपूर्वक अशी बनवली गेली आहे की, गाईबद्दल काहीच ऐकून घ्यायची लोकांची तयारी नसते. त्यातून मग हिंदू गोमांस खात नव्हते, केवळ मुस्लिम ते खातात, गाईच्या हत्येने पाप लागते, वगैरे मिथके समाजात जाणीवपूर्वक पसरवलेली आहेत. त्यात सध्याच्या व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीने भरही टाकली आहे. पण या सर्व मिथकांना तोडण्याचे काम संशोधन, मुलाखती आणि प्रत्यक्ष भेटी देऊन श्रुति गणपत्ये यांनी 'गाईच्या नावाने चांगभलं' या पुस्तकाच्या माध्यमातून केले आहे.

हे पुस्तक २०१४ नंतर भारतात गाईच्या राजकारणाच्या वाढत्या प्रभावाची सखोल चिकित्सा करते. त्याची पाळंमुळं ही गेल्या १५० वर्षांत हिंदू राष्ट्रवादाच्या विचारसरणीमध्ये कशी गोवली गेली याचा आलेख मांडत त्यातील इतिहास, राजकारण, गाईच्या पवित्रतेच्या संकल्पनेमागील सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकण्याचे काम हे संशोधनावर आधारित पुस्तक करते.

पुस्तकाच्या प्रारंभात, लेखिका वैदिक काळातील गाईच्या स्थानाचा आढावा घेतात. 'ऋग्वेद' आणि इतर वैदिक ग्रंथांमध्ये गाईंचा यज्ञात बळी देणे आणि मांसाहार करणे याचे असणारे उल्लेख त्या पुस्तकात उद्धृत करतात. उदाहरणार्थ, 'ऋग्वेद' या ग्रंथामध्ये इंद्रदेवासाठी पंधरा ते वीस बैल बळी दिल्याचा उल्लेख आहे. यावरून दिसून येते की, प्राचीन काळात गोवंशाचा मांसाहार हा सामान्य होता. पण जातिव्यवस्था न मानणाऱ्या बौद्ध आणि जैन धर्माने सनातन हिंदू धर्मापुढे मोठे आव्हान उभे केले. त्यातून हिंदूंमधील उच्च जातीच्या काहींनी मांसाहार सोडला. सनातन हिंदू धर्म टिकवण्यासाठी हे पाऊल उचलले गेले.

मुळात २०१४ नंतरच्या गोहत्या बंदीचे कायदे कडक करताना देशभर गाईंच्या कत्तली सुरू असल्याचे एक चित्र उभे करण्यात आले होते. पण लेखिकेने जेव्हा माहिती अधिकाराच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यांमधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र राज्य सरकारांकडे या हत्यांबाबत फारशी माहिती नसल्याचे समोर आले. मात्र या कायद्यांचे खोल परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात झालेले दिसतात. उदाहरणार्थ, काही शेतकऱ्यांनी गाईंच्या देखभालीतील अडचणींमुळे आणि भीतीमुळे गाईंची खरेदीच थांबवली आहे. त्यामुळे गाईंचा बाजारभाव हा खाली आला. प्राणी गणनेनुसार, गोहत्या बंदीच्या चळवळीमुळे गाईंचे रक्षण करण्याचे दावे केले जात असले तरी त्यांच्या संख्येत खूप वाढ झालेली नाही.

पुस्तकात गाईंच्या संरक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचारावरही चर्चा आहे. उत्तर प्रदेशातील अखलाखच्या हत्येपासून सुरू झालेली गुन्ह्यांची साखळी अजून संपलेली नाही. हॉलिवूड सिनेमात दिसणाऱ्या आधुनिक काऊबॉइजसारख्या गोरक्षकांच्या टोळ्यांना काही राज्य सरकारांनीच "तपास करणे, धाडी घालणे" असे अधिकार कायद्याने दिले आहेत. त्यांनी केलेल्या हिंसेच्या घटना अधूनमधून वाचायला मिळतात. परंतु राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरोकडे (NCRB) गोहत्या किंवा गोमांसाशी संबंधित गुन्ह्यांची आकडेवारी उपलब्ध नाही. त्यामुळे या विषयी विश्वासार्ह माहितीचा अभाव आहे. शिवाय, अनेक राज्य सरकारांनी गोशाळांसाठी निधी जाहीर केला असला, तरी त्याच्या वापरावर योग्य देखरेख नाही. सरकारी अनुदानित गोशाळांमध्ये जनावरांची स्थिती चिंताजनक आहे, कारण निधीची कमतरता आणि देखरेखीचा अभाव आहे. असे अनेक विषय या पुस्तकाच्या निमित्ताने पुढे आले आहेत.

बंदीच्या या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडले. त्यात हिंदूही भरडले गेले. गाईने दूध देणे बंद केल्यावर आणि बैलाने शेतात काम करणे थांबवल्यावरही त्यांना पाळण्याचा खर्च हा शेतकऱ्याला आता जबरदस्तीने उचलावा लागतो. त्यामुळे तो अनेकदा हे निरुपयोगी प्राणी मोकाट सोडून देतो. त्यातून अपघात, पिकांचे नुकसान या नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. तसेच कत्तलखाने बंद केल्याने लहान व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. पण मोठ्या कंपन्या मात्र आजही उत्तर प्रदेश, महाराष्ट्रासारख्या राज्यांतून म्हशीच्या मांसाची मोठ्या प्रमाणात निर्यात करतात.

पुस्तकाचा शेवट करताना लेखिकेने अन्न आणि सामाजिक जडणघडण यावर सविस्तर चर्चा केली आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभर लादल्या जाणाऱ्या अन्नाच्या बंदी या धार्मिक कमी आणि राजकीयच जास्त असतात. गोमांस बंदीही त्याला अपवाद नाही. उलट शाकाहाराच्या नावाखाली अन्नाच्या विविधतेवर एकसंधतेची बंधनं लादल्याने आपली संस्कृतीच आपण विसरून चाललो आहोत. अन्न हा वैयक्तिक निवडीचा विषय आहे आणि त्यावर बंधने आणल्यास सामाजिक तणाव वाढू शकतो. पण राजकीय फायद्यासाठी केवळ धर्माच्या आडून लोकांमधली दरी वाढवण्याचे कामच या बंदीने केले आहे.

एका वाक्यात सांगायचे तर लेखिकेने गाईविषयीचा इतिहास, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी आणि राजकारण अशा विविध मुद्द्यांचा सर्वांगीण आढावा घेतला आहे. पुस्तकाची भाषा सोपी आणि प्रवाही आहे. पुस्तकाची विभागणी देखील या विषयासंदर्भात असणाऱ्या गैरसमजांना केंद्रस्थानी ठेवून केली आहे. यामुळे वाचकांना विषय समजण्यास मदत होते. राजकारणाशी थेट संबंध नसलेल्याही वाचकांना हे पुस्तक नक्कीच विचार करण्यास प्रवृत्त करते. कारण संस्कृती असे म्हणताना अनेक गोष्टी आपल्याला माहीतच नसतात याची जाणीव या संशोधनात्मक पुस्तकातून आपल्याला होत राहते.

या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकामध्ये आलेल्या घटना आणि आकडेवारी यांचे विस्तृत संदर्भ दिले आहेत. त्यामुळे हे पुस्तक हा एक दस्तऐवज देखील ठरते.

पुस्तक गाईच्या नावानं चांगभलं

लेखिका : श्रुति गणपत्ये

प्रकाशक : लोकवाङ्मयगृह

sanjaysavarkar@yahoo.com

logo
marathi.freepressjournal.in