

विशेष
गीतेश गजानन शिंदे
हातात स्मार्टफोन आल्याने जग जवळ आलं, पण माणसं मात्र दूर गेली. 'लाईक', 'शेअर' आणि 'सबस्क्राइब'च्या आभासी दुनियेत जगताना वास्तवातील आनंद हरवत चालला आहे.
मध्यंतरी मी दादर चौपाटीला फिरायला गेलो होतो. हळूहळू सूर्य अस्ताला जात होता. सूर्याची केशरी आभा लालसर होत पाण्यावर हलकासा रक्तिमा पसरत होता. वारा केसांतून वाट शोधत सैरावैरा धावत शीळ वाजवत होता. नारळाची झाडं त्या लयीत ठेका धरून झुलत होती. येणारी प्रत्येक लाट आपल्यासोबत नवंचैतन्य घेऊन येत किनार्यावर विरत होती. लोक मोबाईलमधून सूर्यास्त टिपण्याच्या नादात होते. सेल्फी काढताना आपण कसे दिसतोय यावरच त्यांचं लक्षं केंद्रित झालं होतं. आपण प्रत्येक फोटोत सुंदरच दिसायला हवं, किंबहुना कुरुपता हा शापच आहे असं काहीसं मनावर बिंबवलं गेलंय. त्यामुळेच कदाचित सोशल मीडियावर विविधं फिल्टर्स वापरून रंगरंगोटी केलेले फोटो प्रत्येकाकडून अपलोड केले जाताहेत. यासाठी अधिकाधिक मेगापिक्सेल्स असणारे स्मार्टफोन विकत घेतले जाताहेत. पण जगातील कुठल्याही कॅमेरापेक्षा आपल्या डोळ्यांचा कॅमेरा हा सर्वोत्तम आहे हे मात्र आपण विसरतो. त्यामुळं मोबाईलवर क्षण टिपण्याच्या नादात आपण अनुभव घेणंच विसरतोय. असे काही हजार फोटो आपल्या मोबाईल गॅलरीत पडलेले असतात आणि मेमेरी फुल झाल्यावर नव्या आठवणींसाठी जुन्या आठवणींना आपण क्षणार्धात डिलीट करतो. का? तर त्या आठवणींशी आपली नाळच जुळलेली नसते. कारण ती जुळण्यासाठी लागणारा वेळ आपण त्याप्रसंगी दिलेलाच नसतो.
काही दिवसांपूर्वी मी हॉटेलमध्ये एकटाच जेवायला गेलो होतो. तरुण जोडपी आपल्या मुलांसह जेवायला किंवा त्यानिमित्तानं एकत्र वेळ घालवायला म्हजेच तरुणाईच्या भाषेत- टाईम स्पेंड करायला आलेली दिसत होती. जेवण आल्यानंतर सर्वांत आधी जेवणाचे फोटो काढून ते फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅप चॅटवर डकवण्याची आणि फिलींग हंग्री वगैरेचे स्टेटस ठेवण्याची नवरा-बायकोमध्ये जणू स्पर्धाच लागली होती. बरं जेवणावेळी मुलं एकाठिकाणी बसून शांतपणे जेवावीत म्हणून यूट्युबवर डोरेमॉन, छोटा भीम, मोटू-पतलू असल्या अॅनिमेटेड कार्टूनच्या जगात त्यांचं भावविश्व गुरफटवून टाकलेलं होतं. साधारणतः हॉटेल असो वा घर नव्या पॅरेंटींगच्या व्याख्येत मुलांच्या हातात मोबाईल दिला की ती त्या वेळेपुरता का होईना गप्प बसतील आणि आपण आपली कामं करायला मोकळे होऊ अशीच धारणा दिसते. परंतु मुलांच्या आरोग्यासाठी ही गोष्ट किती धोकादायक आहे हे ठाऊकच नसतं. अगदी तीन-चार महिन्यांच्या बाळासमोर ह्या अशा चित्रलहरी आदळत राहतात ज्यासाठी त्यांचे डोळे तयार नसतात. पुढे हट्ट करतो किंवा ऐकतच नाही या सबबीखाली सर्रासपणे मुलांच्या हाती मोबाईल सोपवला जातो. त्याचंही आई-वडिलांना जाम कौतुक असतं. मात्र ह्या कौतुकानं सुन्न व्हायला होतं. पालकांच्या दुर्लक्षामुळे आणि लहान वयात मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये 'लेझी आय सिंड्रोम'चा धोका वाढला आहे. भारतातील १२% (दर ५० मधील १) मुलांना या आजारामुळे एका डोळ्याने कमी दिसणे किंवा दिसेनासे होणे अशा दृष्टिदोषाचा नकळत सामना करावा लागत आहे. कारण चिऊ-काऊच्या गोष्टी सांगत ऊन-ऊन घास भरवायला एक तर घरात आज्जी नाही किंवा मॉर्डन आईवडिलांकडे तितका वेळही नाही.
दुसर्या टेबलावर कॉलेज गोईंग मुलामुलींचा थवा बसला होता. ऑर्डर देईपर्यंत सुरू असलेला त्यांचा किलबिलाट हळूहळू कमी झाला आणि जो-तो आपापल्या मोबाईलमध्ये गुंगला. त्यावेळी मला माझे कँटिनमधले मित्रमैत्रिणींसोबतचे दिवस आठवले. खिशात वडापाव, मिसळपाव किंवा सामोसा खाण्याइतकेच पैसे असायचे, पण गप्पांमध्ये सर्व शेअर करण्यात त्यास काय चव यायची. तासन्तास एक वडापाव आणि कटिंगवर आम्ही गप्पा झाडत असू. पण ही मुलं मात्र सोबत असूनही एकेकटीच वाटली मला.
दोन-तीन टेबलं जोडून वडिलांची सत्तरी साजरी करायला आलेलं एक कुटुंब बसलं होतं. सगळे जण एकमेकांसोबत फोटो काढण्यात मश्गूल होते. पण त्या आजोबांकडे पाहिल्यावर लक्षात आलं की ते इतक्या माणसातही असूनही अगदी एकटेच होते. म्हणजे स्मार्टफोन माणसाची जागा घेऊ शकत नाही हे सत्य अधोरेखित होतं. त्यावेळी मला आठवलं की बालपणी मी खूप प्रश्न विचारायचो. त्या प्रश्नांची उत्तरं वडील न कंटाळता द्यायचे, अगदी मुंगीच्या चिकाटीनं. पण आज त्यांच्या प्रश्नांची उत्तर द्यायला माझ्याकडं मात्र वेळ नसतो. कारण मी दिवसभर वेगवेगळ्या भिंतींवर, विडोंतून, चॅट बॉक्सवर सदा न कदा ऑनलाईन असतो. सकाळ, दुपार, संध्याकाळ- त्रिकाळ ग्रुप्समध्ये, कम्युनिकेटरवर, फोरम्सभर.. भरा भर उत्तरं देत राहतो.. दिवसभर कामानंतर घरी परतलेला मी थकवा आणि वर्कलोडच्या ताणातून वडिलांशी अरेरावीने बोलतो. यामुळे स्वतःतील एकाकीपणा दूर करून मुलाशी संवाद साधू पाहणारे वडील गप्प होतात आणि त्यांच्यातील संवादाचा शेवट होतो. मग यावर मला माझ्याच एका कवितेतल्या ओळी आठवतात की,
खरं तर मलाही
बोलायचं असतं बरंच काही
पण सुटत नाही शब्दांचं मौन,
उत्तरासाठी अजूनही वडीलांना
हाताळता येत नाही स्मार्टफोन...
इन्स्टाग्रामवर रिल्स पाहण्यात आणि कोण किती सो-कॉल्ड सुखात आहे हे तपासण्यात आपला बराचसा वेळ वाया चाललाय. बर्याच ठिकाणी कमरेखालचे विनोद पाहताना आपली विनोदबुद्धी तळ गाठतेय. तर महिलांनी जणू आपल्या शरिराचं प्रदर्शनच मांडलंय. फॉलोअर्स वाढवण्याची चढाओढच लागलेली दिसतेय. अशावेळी म्हणावसं वाटतं की,
‘करून हावभाव चित्रविचित्र
अपलोड कर तुझं रिळाचरित्र...’
रोज नवनवा कंटेण्ट टाकण्यासाठी तरुणाईला जंगजंग पछाडलंय. पण ही ग्लॅमरची दुनिया जितकी चकचकीत आहे, तितकीच निसरडी देखील. त्यामुळेच तरुण पिढी मोठ्याप्रमाणात नैराश्याची शिकार होतेय. पण हा सोशल मीडिया निव्वळ भ्रम आहे, हे सांगताना माझ्या ‘सबस्क्राइब’ या कवितेतील काही ओळी आठवतात,
‘एकलकोंडे एकलव्य फेसबुक : गुरू द्रोणाचार्य
दे तूही तुझा थंब खरा नाही, नुस्ता भ्रम
सेल्फी काढून डकव इंस्टाग्राम
ओरड फोटोतून जगाला सांग,
वापर वापर आभासी फिल्टर
चकचकीत आयुष्य जगणं धुसर
बझिंग - ट्रेंडीग नवं साँग
प्लेलिस्टीत बदलते आयकॉन
सावन, गाना ऐक धिंगाणा
दडवून ठेव आतला एकटेपणा...’
हा एकटेपणा घालवण्यासाठी आपण ‘अॅलेक्सा’ला प्रश्न विचारतो किंवा ‘सिरी’शी गप्पा मारतो. गुगलची बाई तर तुम्ही रस्ता चुकूच नये यासाठी सतत बोंबलत असते. पण एवढं करूनही आपला मार्ग चुकतोय याची जाणीव मात्र आपल्या गावीही नसते. पूर्वी अनोळखी माणसांना रस्ता विचारत विचारत पांथस्थ होण्यातही गंमत होती. व्हर्चुअल जगात वावरताना मात्र या आनंदाला आपण मुकलो आहोत. लाईक, शेअर, सबस्क्राईबचा व्हायरस केव्हा आपल्या मेंदूच्या सिस्टीममध्ये घुसला ते कळलंच नाही. या व्हर्चुअल जगातील पोस्टमध्ये दुसरा किती आनंदात आहे याची तुलना करताना आपण वास्तवात केव्हा नैराश्याच्या गर्तेत जातो आहोत हेच उमजेनासं झालंय. पोस्ट केलेल्या लेखातून, कवितेतून तुमची विचारधारा ठरवण्याचा, राजकीय मतं समजून घेण्याचा किंवा सतत एखाद्याबद्दल नकारात्मक, अपप्राचार करून ती बदलण्याचा प्रयत्न केला जातो. जर तुम्ही व्यवस्थेविरुद्ध बोलण्याची हिंमत केली असेल, तर चाळीस पैशांची ट्रोलधाड तुमच्यावर तुटून पडते आणि त्यांना उत्तरं देता देता आपलंच मानसिक संतुलन ढासळतं.
पूर्वी आपण पुस्तकांच्या सावलीत आपण ध्यानस्थ व्हायचो. वाचनामुळे आपल्या कल्पनाशक्तीला धुमारे फुटायचे. पण या स्मार्टफोनमुळे वाचायला वेळच कुठेय अशी सबब दिली जातेय. परंतु व्हॉट्सअॅप युनिव्हरसिटीत तर निरनिराळ्या प्रकारची माहिती आपल्या फोनमध्ये कचर्यासारखी येऊन धडकते. फेसबुकवरही कविता, लेखांचा रतीब असतो. ते वाचताना कितीसा वेळ वाया जातो आणि काय हाताशी लागतं हेही तपासायला हवं. अर्थात सर्वच टाकाऊ असतं असं मला म्हणायचं नाही, पण पुस्तकं वाचण्यात आणि त्यांच्यात रममाण होण्याचा आनंद तर काही औरच! मामाचं पत्रं हरवलं ते कोणाला सापडलं... अशीच आपली गत झाली आहे. इथं पत्राऐवजी नाती हरवलीत. ‘फेसबुकवर पाच हजार मित्रं, पण गल्लीत कोणी ओळखत नाही कुत्रं...’ अशीच आपली गत झालीय. फेसबुकवर व्हर्चुअल भेटण्यापेक्षा फेस टू फेस भेटण्यात गंमत आहे, हेच विसरून गेलो आहोत. त्यामुळे चॅटवर भरभरून बोलणारे फ्रेंड्स मात्र प्रत्यक्षात भेटल्यावर विषय शोधू लागतात असाच काहीसा अनुभव आहे. म्हणूनच म्हणावसं वाटतं की,
‘म्युट झालेल्या नात्यांनाही
करा रे कोणीतरी अपलोड
सबस्क्राइबच्या निमित्तानं तरी
फिरेल मायेचं बोट...’
geeteshshinde@gmail.com
लेखक हे युवा कवी, अनुवादक, संपादक आहेत