

विशेष
श्रुती गणपत्ये
अगोदर वर्तमानपत्र, पुस्तकं, भाषण करण्याचे मंच हे मर्यादीत होते आणि उच्चवर्णीयांची त्यावर मक्तेदारी होती. आता या खुल्या मंचावर काही जण नियंत्रण करू पाहत असतील तर ते शक्य नाही. मुलांच्या शिवराळ भाषेवर आक्षेप घेणाऱ्यांना आपल्या भाषेवर पहिल्यांदा नियंत्रण आणावं लागेल. नाहीतर वास्ते गुना हुय्या... सारखी नवीन भाषा तुम्हांला आउटडेटेड करत राहणार!
“पोलीस अंकल, वास्ते गुना हुय्या...”
“कुचूपुचू तुम कहाँ हो?...”
“आय एम ए गुड गर्ल ऑफिसर...”
“दीज आर माय प्रायवेट पार्ट्स....”
“युएनसी प्रो मॅक्स”
अशी अनेक वाक्यं, शब्द, शिव्या, अर्थपूर्ण आणि अर्थहीन भाषा गेली काही दिवस आपल्या कानावर आली असेल. अर्थात त्यासाठी इन्स्टाग्राम फॉलो करत असाल तरच. काही वर्षांपूर्वी दुनिया व्हॉट्अपवर होती. पण ती आता इन्स्टाग्रामवर गेली आहे आणि तुम्ही त्याचा भाग नसाल तर नक्कीच आजच्या जेन झी पिढीला समजून घेऊ शकत नाही. या सगळ्या चर्चेचं कारण ठरलं ते नीट आणि इतर काही परीक्षांमध्ये झालेला गोंधळ, पेपरफुटी, करिअरच्या तणावामुळे मुलांच्या आत्महत्या, सरकारी पातळीवरील उदासीनता. त्यात तरुणांना झुरळ म्हणून हिणंवणं खूप महागात पडलं. त्यामुळे चिडलेल्या तरुणांनी कोक्रोच जनता पार्टी स्थापन करून सरकारच्या कारभाराविरोधात रस्त्यावर उतरणं पसंत केलं. त्याचा परिणाम अनपेक्षित होता तो म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा.
मूळात वायफाय, इंटरनेट, स्मार्टफोनच्या काळात जन्माला आलेली ही जेन झी कधी रस्त्यावर उतरेल हे कोणाला खरंही वाटलं नसतं. कारण त्यांचं आयुष्यच ऑनलाइन आहे. अनेकदा ते एकमेकांशी प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा ऑनलाइन कम्युनिकेट करणं पसंत करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांना, शिक्षकांनाही त्यांच्या मनात काय सुरू आहे हे सांगणं कठीण असतं. अशावेळी त्यांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या भाषेत आणि त्यांच्या पद्धतीने केलेला सरकारचा निषेध हा अनेकांना समजलाच नाही. कारण निषेध करणं, मोर्चा काढणं, आंदोलन करणं, उपोषण हे आपल्या देशासाठी नवीन नाही. पण त्याचा एक साचा ठरलेला आहे. महात्मा गांधींपासून, मेधा पाटकर, शर्मिला इरोम अशा अनेकांचं उपोषण आपण पाहिलं आहे. अनेक दिवस, महिने अन्नं-पाणी न घेता हे नेते राहतात. पण एका जेन झीला उपोषणाबद्दल विचारलं तर तो म्हणाला, हो गेले १५ मिनिटं मी उपोषण करतोय, बर्गर खाऊन. इतर आंदोलनांप्रमाणे जेवण बनवणं किंवा घेऊन येण्याची त्यांना गरजच नव्हती. मुलांनी जंतरमंतरवर ऑनलाईन खाणं मागवलं, एक-दोन जण तर प्रोटीन पावडर वाटत होते, तिथे व्यायाम, योगासनं, डान्स, गाणी या सगळ्याची रेलचेल होती. त्यांची लाइफस्टाइल रस्त्यावर आली एवढंच. पोलिसांनी लाठीमार केला तर त्यांनी आपलं ढुंगण आणि छातीवर हात ठेवून “दीज आर माय प्रायवेट पार्ट्स....” म्हणून गाणं सुरू केलं. किंवा राष्ट्रगीत म्हणत पोलिसांना “स्टॅच्यू” केलं. पोलिसांची टर उडवण्यासाठी “आय एम ए गुड गर्ल ऑफिसर...” गाणं म्हणत त्यांच्यावरच व्हिडिओ बनवले. “ऑफिसर, वास्ते गुना हुय्या...” म्हणत पोलिसांना संभ्रमित करून सोडलं. या वाक्याला खरंतर काहीच अर्थ नाही. पण सोशल मीडियावर हे वायरल झालंयं. “कुचूपुचू” नावाचं एक एआय कार्टून इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध आहे. त्यातली मुलगी सारखी “कुचूपुचू तुम कहाँ हो?...” असं विचारत असते तोच प्रश्न त्यांनी पंतप्रधानांपासून सर्वांना विचारला. पंचप्रधानांनाही शेवटी इन्स्टाग्रामवर येऊन संदेश द्यावा लागला. पण “फ्रेंड रिक्वेस्ट रिजेक्टेट” म्हणून त्याची पोरांनी खिल्ली उडवली. पेपर लीकवर उपाय म्हणून काहींनी सॅनिटरी पॅड, लहान मुलांचे डायपर वाटले. इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मिलोनी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिंगपिंग यांना फोन करून भंकस केली. “टीअर गॅस नाही का”, “आज लाठी मारणार नाही का”, “रेन डान्सासाठी वॉटर कॅनन आणा”, असे खोचक प्रश्न विचारून सरकारला हैराण करून सोडलं. बॅरिकेट लावले तर त्याचा वापर लहानपणीच्या स्कूटर-स्कूटर खेळासारखा खेळ केला.
त्यात शिव्या, नवीन शब्द, नवीन कॅरेक्टर, नवीन पद्धती या सगळ्याचा इतका समावेश होता की, सरकार, पोलीस, विरोधीपक्ष या सगळ्यांच्या बुद्धीच्या पलीकडचं होतं. आतापर्यंत जेन झीला हसणाऱ्या, त्यांना निर्बुद्ध समजणाऱ्या अनेकांनी त्यांच्यापुढे हात जोडले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा त्याचाच परिपाक होता. याआधी मोदी सरकारने लोकांच्या उठावानंतर मंत्र्याचा राजीनामा घेतलेला नव्हता. पण देशभरातल्या तरुणांची भावना खूप तीव्र होती. तसंच अशापद्धतीची आंदोलनं शेजारच्या देशात होऊन सरकार उलथवण्यात आली होती. त्या ताज्या घटना लक्षात घेता हे आंदोलन चिरडून टाकणं शक्यच नव्हतं.
मग आंदोलनावर टीका कशी करणार? तर या मुलांची भाषा, पंतप्रधानांना थेट दिलेल्या शिव्या, शिव्यांनी भरलेल्या घोषणा, फलक याबद्दल अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला. जेन झी यांना आयुष्याचा अनुभव नसेल, पण इंटरनेटमुळे जगाचं ज्ञान सर्वांत जास्त आहे. इन्स्टाग्रामसारखे प्लॅटफॉर्म हे त्यांच्या ज्ञानाचे स्त्रोत आहेत. तिथल्या भाषेवर बंधन नाही. मग ती इंग्रजी असो, फ्रेंच किंवा हिंदी. प्रमाणभाषा ही पुस्तकं, अभ्यासाची पुस्तकं यापुरती मर्यादीत आहे. पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला ती बंधनं नाहीत. “नो फिल्टर्स” म्हणूनच म्हटलं जातं. तिथे एक वेगळी भाषा, चिन्हं, खाणाखुणा वापरल्या जातात. उदाहरणार्थ, आंदोलनामध्ये काही मुलं दोन्ही हाताची तर्जनी (पहिलं बोटं, index finger) जुळवून पोलिसांना काही इशारे करत होती. त्याला मीडियाने अश्लील म्हणत टीका केली. पण मुलांच्या मते, याचा अर्थ पोलिस करत असलेल्या कारवाईने आम्हांला लाज वाटतेय, असुरक्षित वाटतेय, असा आहे. मग अंगठा आणि तर्जनी जुळवत त्यांनी कोरिअन हार्ट पोलिसांना दाखवलं की, आमच्याप्रती थोडं प्रेम दाखवा. अशा अनेक गोष्टी या इतर समाजासाठी अनाकलनीय आहेत. काहींना युएनसी प्रो मॅक्स म्हणत पोलीस आणि राजकारण्यांच्या पिढीला कळणारही नाही अशापद्धतीने त्यांना हिणवलं. युएनसी म्हणजे अंकल.
शिव्या या रागाने, त्वेषाने वापरल्या जातात. कोणत्याही भाषेचा तो अविभाज्य भाग असतात. या आंदोललनातही मुलांच्या मनातला राग, खदखदच बाहेर आली. जगात सर्वांत जास्त तरुण लोकसंख्या असलेला देश म्हणून आपण मिरवतो. पण त्यांच्या करिअरची वाट लावून त्यांचं भविष्य अंधारात ढकललं जात असताना या तरुणांनी केवळ जय श्रीरामचा जप करायचा का? तसंच तरुणाईमध्ये शिव्या या मित्रत्वाच्या नात्याने वापरल्या जातात. एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला हाक मारण्यासाठी शिव्या वापरल्या जातात आणि त्यात कोणालाच काही गैर वाटत नाही. अगदी मुलीसुद्धा सहज शिव्या देतात. काही वर्षांपूर्वी आई-बहिणीवरूनच शिव्या दिल्या जातात म्हणून अनेक स्त्रीवादी कार्यकर्त्या आक्षेप घ्यायच्या. पण आता तो आक्षेपही जुना झाला. कारण नव्या पिढीने जेंडर न्यूट्रल शिव्या शोधून काढल्या, नवीन शब्दांची उत्पत्ती केली. काही वर्षांनी ते शब्द सहज भाषेमध्ये समाविष्ट होतील.
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाजप हा संस्कारी पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यांना शिव्यांवर आक्षेप असणं सहाजिक आहे. भाजपसाठी सोशल मीडियावर बसलेले ट्रोल त्यांच्या भाषेवर कधीच कोणी आक्षेप घेत नाहीत. ते तर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विरोधी पक्ष, महिला, पत्रकार यांच्यावर तुटून पडतात. बरखा दत्तसारख्या अनेक वरिष्ठ पत्रकार महिलांच्या सोशल मीडियावर लिंगाचे फोटो टाकण्यापासून ते त्यांच्या आई-वडिलांचा उद्धार करण्यापर्यंत अनेक प्रकार गेले काही वर्षे सातत्याने सोशल मीडियावर सुरू आहेत. खुद्द सत्तेत बसलेल्या अनेकांनी अश्लील शब्दांचा केलेला वापर याचा एक शब्दकोषच बनेल. या संस्कारांमध्ये जेन झी तयार झाली आहे. त्यांना वेगळा न्याय कशासाठी? गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मिडियाच्या माध्यमातून जे पेरलं गेलं तेच आता त्यांना परत मिळतंय. मग ती भाषा असो, विचार असो की द्वेष. सोशल मीडिया हा खुला मंच आहे. त्यामुळे लोकांना आपले विचार मांडण्यासाठी व्यासपीठ मिळालं. त्याआधी वर्तमानपत्र, पुस्तकं, भाषण करण्याचे मंच हे मर्यादीत होते आणि उच्चवर्णीयांची त्यावर मक्तेदारी होती. आता या खुल्या मंचावर काही जण नियंत्रण करू पाहत असतील तर ते शक्य नाही. मुलांच्या शिवराळ भाषेवर आक्षेप घेणाऱ्यांना आपल्या भाषेवर पहिल्यांदा नियंत्रण आणावं लागेल. नाहीतर वास्ते गुना हुय्या... सारखी नवीन भाषा तुम्हांला आउटडेटेड करत राहणार!
लेखिका मुक्त पत्रकार आहे
shruti.sg@gmail.com