

दुसरी बाजू
प्रकाश सावंत
सध्या विकासाच्या गोंडस नावाखाली झाडे जंगलांची बेसुमार कत्तल केली जात असल्याने विसाव्याला सावली, पोषक अन्न, निर्मळ जल, प्राणवायू, समृद्धी, आनंद, सुख, शांती देणारा निसर्गच मृत्युपंथाला लागण्याचा धोका आहे. हे झाडांचे संभाव्य मरण रोखण्यासाठी धडपडणारा, झाडांच्या वेदनांनी तळमळणारा, ‘झाडे जगली तर माणूस जगेल’ हा विचार पेरणारा, झाडांचे जतन, संवर्धन, पुनर्रोपण करण्याच्या भूमिकेत जगणारा, झाडांच्या मानसन्मानासाठी झपाटलेला ध्येय्यवेडा माणूस म्हणजे पर्यावरणस्नेही कार्यकर्ते व अभिनेते सयाजीराव शिंदे.
झाडे जाळण्यापेक्षा, मारण्यापेक्षा ती लावण्यातच नवनिर्मितीचा, मनसमृद्धीचा, मनसुखाचा, मनशांतिचा आनंद आहे. हा क्रांतिकारी विचार मनभावन असाच. या विचारासोबतच निसर्गदेवतेला, देवरायांना पूजणारा, त्यांना मानसन्मान देऊन जनमानसात आदराचे स्थान निर्माण करणारा अवलिया म्हणजे अर्थातच सयाजीराव शिंदे. केवळ नावच पुरेसे. त्यांच्या भेटीचा योग अचानक जुळून आला. ते दैनिक ‘नवशक्ति’च्या स्टुडिओत आले. त्यांच्याशी निसर्ग गप्पा रंगल्या. या गप्पा जितक्या विचारप्रवर्तक तितक्याच मनस्वी आनंद देणाऱ्या ठरल्या. त्यांच्याशी झालेला हा मुक्तसंवाद.
आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचा ऱ्हास थांबवायला हवा असे सांगून सयाजीरावांनी सण-उत्सवामागची मूळ संकल्पना स्पष्ट केली. ते म्हणाले की, पानगळीनंतर औषधी गुणधर्म असलेल्या काटेसावरीचे झाड निष्पर्ण होते. हे झाड सुकल्याचे समजून तोडले जाते. तथापि हे झाड ओलेच असते. नव्या फुलांसाठी आतुर झालेले असते. या झाडावर फुले लागतात, तेव्हा तिथे नानाविध पक्ष्यांचे संमेलनच भरते. म्हणूनच निसर्गाची सुंदरता असलेल्या झाडांना फुलापरी जपायला हवे. होळी ही होळीच असते. उंच उंच होळी करून त्यात झाडांची आहुति देण्यापेक्षा लहान होळी केली तरी ती पुरेशी असते. होळी किती मोठी यापेक्षा, तिची मनोभावे केलेली पूजा व श्रद्धाच अधिक महत्त्वाच्या असतात. ‘सुक्यासोबत ओले जळते’, त्यात पर्यावरणाची किती हानी होते, याचा विचार करणार कोण?
पर्यावरणाविषयीची बेफिकिरी, अनास्था ठायी ठायी दिसून येत असल्याबद्दल तीव्र चिंता नापसंती व्यक्त करताना ते म्हणाले की, ‘निसर्गात फिरण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. तो अमूल्य असला तरी विनामूल्य उपलब्ध आहे. म्हणूनच त्याला मोल उरलेले नाही. निसर्गच गतप्राण झाला, तर प्राणवायूअभावी प्राणच तळमळतील. तेव्हाच मरणपंथाला लागलेल्या निसर्गाचे महत्त्व पटेल. बाळाच्या बारशासाठी लाकडाचा पाळणा हवा. घरबांधणीसाठी झाडे हवीत. चुलीवरचे चमचमीत मटण खाण्यासाठी लाकडे हवीत. अन्नपाण्यासाठी झाडे हवीत. प्राणवायूसाठी झाडे हवीत. पर्यटनासाठी झाडे हवीत. एवढेच काय, सरणावर जाण्यासाठी झाडे हवीत. जन्मापासून मरण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर निसर्गाने बहरलेली झाडे, पाने, फुले, फळे हवीत. आनंद, दुःखाच्या भावभावना अन वेदनासंवेदना व्यक्त करण्यासाठी जल, जंगल, जमीन हवी. आम्हाला फुकटात मिळेल ते सारे काही हवे आहे; परंतु आम्हाला झाडे नकोत, आम्ही झाडे लावणार नाही, हे कसे चालेल? एक काळ असा होता की झाडे तोडून शेती केली जात होती. घरे उभारली जात होती. आता काळच असा येऊन ठेपलाय की घरे, लोकवस्त्या पाडून त्या ठिकाणी जंगले वाढवावी लागतील. भविष्यात अशी वेळ येईल की घर, गाडी, बंगला, नोकरचाकर, पैसाअडका, प्रसिद्धी हे काहीही नको, फक्त हवीय निरव मन:शांति.
नाशिकच्या तपोवनातील झाडे जोपासण्यापेक्षा झाडे तोडण्याची भूमिका मान्यवर मंत्री घेत असल्याबद्दल त्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, अनिवार्य विकासकार्यासाठी झाडे तोडूच नका असे काही माझे म्हणणे नाही. खरे तर, एका भागात मोकळी जागा उपलब्ध असताना ती जागा सोडून त्या लगतची वृक्ष संपदा तोडणे हा अक्षम्य अपराध आहे. सरसकट झाडे तोडण्याची भूमिका अधिकार पदावरील व्यक्तीने घेणे अधिक धोकादायक आहे.
मागील काही वर्षात राज्यातील वृक्षराजी झपाट्याने कमी होत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की,‘चुलीवरचे मटण हा अविचारी खाद्यसंस्कृतीमधून आपण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करीत आहोत. या चुका वेळीच सुधारून आपल्याला पुढे जावे लागणार आहे.
राज्यातील कोणत्याही गावात वृक्ष लागवड करण्यासाठी आमची ‘सह्याद्री देवराई’ तत्पर असल्याचे सांगून ते म्हणाले की, देवराया म्हणजे देवासाठी लावलेली झाडे. देवाचा अधिवास. निसर्गचा अनमोल ठेवा. तो श्रद्धेने जपला व जोपासला जायला हवा. साईबाबांच्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांनी बहुपयोगी कडुनिंबाचे झाड लावावे. शंकराच्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांनी बहुगुणी बेलाचे झाड लावावे. कोणत्याही प्रार्थनास्थळांना भेटी देणाऱ्या भाविकांनी अभिषेक केल्यावर देवाचा प्रसाद म्हणून एक रोप जरूर लावावे. या झाडांच्या फुलाफळांमधूनच नवी पिढी फुलणार आहे. झाडे जगण्यासाठी पोषणमूल्य देऊन जीवनात आनंदाची बहार आणतील. झाडांशी गुजगोष्टी करणे ही एक आनंदाची जीवनयात्राच आहे. झाड तोडणे हा स्वार्थाचा, तर झाड जगवणे हा माणुसकीचा धर्म आहे.
आपले मंत्री कोटी कोटी झाडे लावण्याचा नुसत्या वल्गना करतात याविषयी आपली परखड मते त्यांनी नोंदवली. ते म्हणाले, कोणत्याही सामाजिक कार्याचा उद्देश प्रामाणिक हवा. झाडे लावा, झाडे वाढवा हा सरकारी कार्यक्रम बहुतांशी कागदावरच असतो व तो प्रसिद्धीतून अधिक डोकावतो. मुळात, आपण लावलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे पुढे काय झाले याचा सरकारस्तरावर आढावा घेतला जात नाही. तसेच, झाडांच्या संवर्धनाचा कुणी पाठपुरावा करत नाही. म्हणूनच झाडांचे जतन, संवर्धन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ति गरजेची आहे.
आपल्याकडील काही जाणत्या, नेणत्या वृक्षांनी केवळ पशूपक्ष्यांनाच अधिवास दिला नाही, तर त्यांना फुले फळेही दिली आहेत. त्यामुळे जुन्याजाणत्या झाडांविषयी समस्त मानवजातीने कृतज्ञ असायला हवे. आपल्या आधीच्या कित्येक पिढ्यांना पाहिलेल्या झाडांविषयी मायाममता, आपुलकीचे नाते रुजायला, फुलायला हवे. प्रत्येकाने किमान दहा झाडे लावली, तरी संपूर्ण गाव सुजलाम, सुफलाम व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही किती झाडे लावली, जगवली त्यावरच गावचे पर्यावरणविषयक समज, कार्य व प्रतिष्ठा ठरणार आहे.
झाडांना सेलिब्रिटीचा दर्जा देण्याविषयी आग्रही मागणी करताना त्यांनी झाडांचे मानवी जीवनातील महत्तम नातेच उलगडून सांगितले. ते म्हणाले, एखादी व्यक्ती जिवंत असताना तिचे महत्व समजून घेण्याचा प्रयत्न कुणी करत नाही. तथापि, ती व्यक्ती गेल्यावर गावजेवण घालतात. तिची स्मारके उभारतात. तथापि, जिवंतपणी त्यांना जपत नाहीत. म्हणूनच १०० वर्षांच्या जिवंत झाडांचे गावोगावी वर्धापन दिन साजरे व्हायला हवेत. त्यांच्या वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ व्हायला हवे. त्या झाडांना ‘सेलिब्रिटी’चा दर्जा मिळायला हवा. हा दर्जाच झाडांची महानता नव्या पिढीसमोर आणेल.
अलीकडचे आपल्या सभोवताली दिसणारे चित्र मन विषण्ण करणारे आहे. आपल्या डोळ्यादेखत कुठे समृद्धी महामार्गासाठी, कुठे शक्तिपीठासाठी, कुठे मेट्रोसाठी, तर कुठे खाणींसाठी झाडे तोडली जात आहेत. गावे, शहरे उजाड, भकास होत आहेत. हे झाडांचे अरण्यरुदन मानवासाठी आत्मघातकी ठरण्याचा धोका अधिक आहे. या धोक्याची तीव्रता कशी कमी करता येईल हाच या घडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे. झाडे जगली, तर प्राणवायू मिळेल. श्वास घेता येईल. पशुपक्षांचे अधिवास टिकवता येतील. त्यासाठी हवे झाड जगवणारे, वाचवण्याचे विचारी व प्रगल्भ मन.
prakashrsawant@gmail.com