गणेशोत्सवाचा वैदर्भीय रंग

गणेशोत्सव म्हटला की, सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो ताे मुंबई आणि मुंबईचा भाग असलेला कोकण प्रांत. पण महाराष्ट्राच्या इतर प्रांतांमध्येही तिथल्या स्थानिक वैशिष्ट्यांनुसार गणेशोत्सव साजरा होत असतो.
गणेशोत्सवाचा वैदर्भीय रंग
Published on

नोंदवही

सुनीता झाडे

गणेशोत्सव म्हटला की, सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतो ताे मुंबई आणि मुंबईचा भाग असलेला कोकण प्रांत. पण महाराष्ट्राच्या इतर प्रांतांमध्येही तिथल्या स्थानिक वैशिष्ट्यांनुसार गणेशोत्सव साजरा होत असतो. विदर्भातही गौरी, गणपती आणि महालक्ष्मी यांच्या आगमन-विसर्जनाने हा उत्सव साजरा होतो. विदर्भातील अष्टविनायक आणि तिथला हाडपक्या गणपती या उत्सवामध्ये खास वैदर्भीय रंग भरतात.

जुलै, ऑगस्ट महिन्यातील पाऊस शेतामातीत मुरला की केना, कनेर, आघाडा, दुर्वा, जाई, जास्वंद, बेल, पिंपळ या पत्रींचा ओला सुगंध वातावरणात दरवळायला लागतो आणि गणपतीची रुणझुणती चाहूल लागते. सोबत हरितालिकेचीही. विदर्भात हरितालिकेला गौरी म्हणून पुजले जाते. अशी गौरी-गणपतीची चाहूल लागताच घराघरात त्यांच्या स्वागताची लगबग सुरू होते. हरितालिकेसाठी एक सहा-सात दिवस आधीच परडीमध्ये मोकळी जागा सोडून गौर पेरली जाते. सहा-सात दिवस मोठ्या टोपलीखाली ठेवून तिची काळजी घेतली जाते. ती दाट रहावी, हिरवी रहावी म्हणून वेळोवेळी तिला हवा-पाणी दिले जाते.

हरितालिकेच्या दिवशी गावातल्या जवळच्या नदी, तलाव किंवा विहिरीवर या परडीतल्या गौरी नेतात. तिथे या परडी पाण्यातून काढतात. नंतर तिथेच किनाऱ्यावर तिची पूजा मांडतात. गौरीच्या मध्ये तिथल्या वाळूची पिंड तयार करून, वर छोटी हळदीची पिंड ठेवून शिव-पार्वतीच्या प्रतीकात्मक रूपांची पूजा केली जाते. मग घरी येऊन या गौरीची स्थापना केली जाते. यासाठी आदल्या दिवशी विशेष सजावट करून आरास तयार केली जाते. हार, फुलं, फुलोरा, प्रसाद, नैवेद्य, दिवे, समई...असा जामानिमा करत गौराईची पूजा सजवली जाते. घरोघरी लहानमोठ्या स्त्रिया मोठ्या उत्साहाने या पूजेत सहभागी होतात. उपवास ठेवतात.

संध्याकाळी गौरीला सोळा किंवा एकवीस पत्रीच्या जुड्या वाहिल्या जातात. पूजा, आरती, हळदीकुंकू, भजन, मध्यरात्रीपर्यंतचे जागरण, प्रसाद असे सगळे सांस्कृतिक कार्य घरच्या घरी केले जाते. दुसऱ्या दिवशी सकाळची पूजा, नैवेद्यासह गौरीचे जवळच्या पाणवठ्यावर विसर्जन केले जाते. प्रसादात देवीला वाहिलेल्या काकडी, कणीस, खोबरं, फळं यांना सोलून भिजवलेल्या चण्याच्या डाळीसोबत एकत्र करून प्रसाद तयार केला जातो. तो घरोघरी दिला जातो. या सर्वांचा एकत्रित रुचकर सुगंध आणि चव मनाला अलौकिक समाधान देणारी असते.

लहान असताना आईसोबत हरितालिकेच्या दोन्ही दिवशी नागपूरच्या शुक्रावरी तलावावर जायचे तेव्हा संपूर्ण तलावाची पाळी गौरीमुळे कंच हिरवी आणि गौरीसारख्या नटलेल्या बायांमुळे वेगवेगळ्या रंगांनी फुललेली बघितल्याचे आठवते. आता ते चित्र दुर्मिळ झाले आहे.

गौरी विसर्जनानंतर गणपती

हरितालिकेच्या गौरीचे विसर्जन झाले की गणपतीची लगबग सुरू होते. काही घरी सोयीचे म्हणून गणपतीची मूर्ती आदल्या दिवशीच घरी आणून ठेवली जाते. बाकी या दिवशी बाजारात गणपतीला लागणाऱ्या वस्तूंनी सारा बाजार सजलेला असतो. गणपतीसाठी स्वतंत्र आरास, पूजेसाठी लागणारे साहित्य, नैवेद्य, मोदक या साऱ्यांच्या तयारीसाठी घरातही धावपळ सुरू असते.

आरतीचा जोश आणि प्रसादाचा गोडवा

बहुतेक घरी संध्याकाळी अगदी साध्या घरगुती पद्धतीने पूजाअर्चा करून गणपतीची स्थापना केली जाते. त्यानंतर दणक्यात आरती होते. मग प्रसादवाटप. कुठे पाच आरत्यांचा पण असतो. कुठे दोन, कुठे एक... कोणी आरतीची टेप वाजवतो. कोणी आरती म्हणणाऱ्याला पैसे देऊन भाड्याने आणतो. पण आरती जोशात केली जाते. सगळे विधी आनंदी वातावरणात पार पाडले जातात. त्यानंतर प्रामुख्याने पुरणाच्या मोदकाचा प्रसाद असतो. रवा-बेसनाच्या लाडवाचाही प्रसाद विदर्भात लोकप्रिय आहे. काही घरी पिठाची करंजी आणि पातीचा फुलोरा असतो. दररोजच्या प्रसादात वैविध्य असते. दोन्ही वेळी घरातील चारही ठाव शिजवलेल्या अन्नाचा नैवेद्य असतो.

पूर्वी घरगुती गणपतीचे प्रमाण कमी होते. पण जसजशी कुटुंबं विभक्त व्हायला लागली, कुटुंबांची संख्या वाढली तसतसे नवस म्हणून, प्रथा म्हणून, आपल्या घरचा बाप्पा आणायचा म्हणून घरी गणपती आणण्याचे प्रमाण वाढायला लागले. आता जवळपास चार घरं सोडून प्रत्येकाकडे गणपती बसताना दिसतो. त्यामुळे या काळात विदर्भातही दहाही दिवस घरातल्या आणि बाहेरच्या गणपतीमुळे सगळे वातावरण बाप्पामय झालेले असते. दहाही दिवस दर्शन आणि प्रसादाची रेलचेल असते. ज्यांच्याकडे गणपती बसतात ते बाप्पांच्या आगमनाप्रीत्यर्थ जेवण ठेवतात. पूर्वी जेवणावळीच व्हायच्या, आता सोयीसाठी बुफे ठेवला जातो.

मूर्ती घडवतानाचा सोहळा

आताशा मातीच्या मूर्तीबाबतची जागरूकता वाढल्याने विदर्भातही मातीच्या गणेश मूर्ती बसवण्याकडे विशेष कल दिसतो. बहुतांश गणपती नागपूरच्या चितारआळीतून तयार केले जातात. आता काळानुरूप त्या-त्या जिल्ह्यातल्या मूर्तिकारांचेही प्रस्थ वाढले आहे.

चितारआळीतील मूर्तिकार मात्र चार महिन्यांआधीपासून गणपती उत्सवाच्या तयारीला लागतात. माती, तणस, लाकूड, सजावटीचा सारा लवाजमा जमवून ते ज्या पद्धतीने मूर्ती साकारतात तो सोहळा अनुपम असतो. कलाकाराकडून एक-एक मूर्ती संपूर्ण साकार होत त्यात प्राण फुंकताना बघण्यात खरा आनंद असतो.

गणेशाचं उत्साही आगमन

“ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी, झाड येली पानासंगी फुल तू सुगंधी, भगतांचा पाठीराखा गरीबाचा वाली, माझी भक्ती तुझी शक्ती एकरूप झाली..

मोरया…. मोरया…. मोरया…. मोरया….”

भक्तीच्या लाटेमधून अशी गाज ऐकायला येऊ लागते. तिकडे ढोलताशांसह मिरवणुकीतून सार्वजनिक गणपतीचे आगमन होते. मंडळातील जाणकार अनुभवी व्यक्तीची रोजच्या पूजा-आरतीसाठी निवड केली जाते. बाकी कार्यकर्ते दहाही दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांची, सजावटीची बाजू सांभाळतात. विदर्भातही अमरावती, नागपूर या शहरांमधील काही मंडळे मोठ्या आकारांच्या गणपतीसाठी, सजावटीसाठी, विशेष देखाव्यांसाठी प्रसिद्ध आहेत.

महालक्ष्मी पूजनाची परंपरा

गणपतीच्या मधल्या दिवसांत विदर्भातील बहुतांश घरांत महालक्ष्मी बसवल्या जातात. ज्येष्ठ, कनिष्ठ गौरी आवाहन, पूजन, प्रसाद, विसर्जन मुहूर्तानुसार केले जाते. विदर्भाला महालक्ष्मी पूजनाची मोठी वैभवशाली परंपरा लाभलेली आहे.

उत्सवातला राजकीय रंग

आता पक्ष वाढले, पुढारीपण वाढले तशी इथेही गणपती मंडळं वाढली आहेत. अप्रत्यक्षपणे राजकीय शक्तिप्रदर्शनाच्या आखाड्यांचा रोब वाढला आहे. दहाही दिवस आरत्यांसाठी नेत्यांची हजेरी असणे हा प्रकारही वाढला आहे. बाकी व्यावसायिक हितसंबंधांची रेलचेलही नजरेत यावी इतकी वाढली आहे. आरतीसाठी वाट पहात असलेले गणपती, रांगेत ताटकळलेले दर्शनार्थी अशीही रीत वाढू लागली.

अशा दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या भव्यदिव्य स्वरूपांच्या स्पर्धेत, एखाद्या नवसाला पावणाऱ्या गणपतीची पाटी गर्दी खेचून जाते आणि आपल्या लक्ष लक्ष रूपात विखुरलेला गणपती कुठेतरी हरवल्यासारखा दिसतो.

देखाव्यांची रेलचेल

विदर्भात बऱ्याच ठिकाणी राजकीय, सामाजिक समस्यांशी सुसंगत देखावे तयार केले जातात. काही ठिकाणी पौराणिक कथांचे देखावे तयार केले जातात. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेले देखावे बघणाऱ्यांना अधिकाधिक आकर्षित करतात. गणपती मंडपाला लागून प्रदर्शनही भरवले जाते. तसेच आकाशपाळणे, वेगवेगळ्या प्रकारचे झुले, खेळ, मनियारींची (मण्या-मोत्यांचे दागिने विकणारी) दुकाने सजलेली असतात.

मुंबईतील लालबागच्या राजाच्या धर्तीवर आता विदर्भातही प्रत्येक जिल्हाचा एक राजा असे बरेच मंडळाचे राजे मोठमोठ्याला मंडपांमध्ये विराजमान होतात. अस्सल वैदर्भीय पद्धतीने त्यांची सरबराई चाललेली असते.

विदर्भातील अष्टविनायक

महाराष्ट्रातील अष्टविनायक मंदिरांप्रमाणे विदर्भातील अष्टविनायकही प्रसिध्द आहेत. विदर्भातील अष्टविनायक म्हणजे विदर्भातील आठ प्रमुख गणपतीची मंदिरे. यात नागपूरचा टेकडी गणपती, आदासाचा शमी विघ्नेश, रामटेक येथील अष्टदशभुज, भंडारा मेंढा येथील भृशुंड, पवनी येथील सर्वतोभद्र, वर्धा केळझर येथील सिद्धिविनायक, यवतमाळ कळंब येथील चिंतामणी, चंद्रपूर भद्रावती येथील वरदविनायक यांचा यात समावेश आहे. गणपतीच्या दहाही दिवसात विदर्भातील अष्टविनायकांना भक्तांची गर्दी असते.

विदर्भातील खास हाडपक्या गणपती

अनंत चतुर्दशीला गावागावातील गणपती विसर्जित होत असताना नागपुरात मात्र हाडपक्या गणपतीची धुमधाम सुरू होते. नागपुरात गणेश विसर्जनानंतरच्या पितृपक्षामध्ये हाडपक्या गणपतीची स्थापना केली जाते. विदर्भात पितृपक्षाला हाडपकाचा महिना म्हणतात. हाडपक महिन्यात स्थापना केली जाते म्हणून हा हाडपक्या गणपती. नागपूरचे राजे असलेल्या भोसल्यांच्या वाड्यामध्ये या गणपती बाप्पाची स्थापना होत असते. तसेच काही विशेष गणपती मंडळांमध्येही हाडपक्या गणपतीची स्थापना होते. त्या अनुषंगाने वैदर्भीय लोकपरंपरा जपणारे कार्यक्रम घेतले जातात.

हाडपक्या गणपतीची स्थापना पहिल्यांदा १८८७ साली झाल्याची नोंद आहे. जवळपास २४० वर्षांची परंपरा लाभलेला हा गणपती आहे. १८८७ मध्ये पश्चिम बंगालवर मोठं संकट आलं होतं. त्या काळात नागपूरचे राजे चिमाजी भोसले हे बंगालवर स्वारी करायला गेले. त्या ठिकाणावरून ते विजय प्राप्त करून आल्यानंतर गणेश चतुर्थीचा उत्सव संपलेला होता. मात्र राजांनी गणपतीला विजयाचा नवस केलेला होता आणि तो विजयाचा नवस फेडण्यासाठी हाडपकामध्ये या गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून हाडपक्या गणपतीची परंपरा सुरू झाली. एकूणच विदर्भातील गणपती उत्सवाला प्राचीन एतिहासिक परंपरा लाभलेली आहे.

मुक्त पत्रकार

logo
marathi.freepressjournal.in